मुलांनी करिअर निवडायचं की पालकांनी?

लेख

मुलांनी करिअर निवडायचं की पालकांनी?

मुलांनी करिअर स्वतः निवडावं की पालकांनी? मुलांची आवड, क्षमता, स्वभाव, आर्थिक अपेक्षा आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडण्यासाठी पालकांची भूमिका काय असावी, यावर विचारप्रवर्तक लेख.

डॉ. स्वाती गानू, प्रख्यात शैक्षणिक समुपदेशक, मुंबई 12 Aug 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
डॉ. स्वाती गानू, प्रख्यात शैक्षणिक समुपदेशक, मुंबई                                                                                               मुलांच्या हातात तयार नकाशा देण्याऐवजी त्यांना दिशा दाखवा, रस्त्यातले खड्डे समजावून सांगा आणि निर्णय घेण्याची ताकद द्या. करिअर मुलांनी निवडायचं की पालकांनी? हा प्रश्नच मुळात अपुरा आहे. निवड मुलांचीच हवी, यात शंका नाही. पण ती निवड करताना त्यांना जगाचं वास्तव दाखवणं आणि त्यांच्या समोरची क्षितिजं थोडी रुंदावणं—हे पालकांचं काम आहे. पालकांनी करिअर लादणं जितकं चुकीचं, तितकंच “तुला काय करायचंय ते कर” असं म्हणून हात झटकणंही बेजबाबदारपणाचं आहे. मुलाला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याला तिथे पाठवणं सोपं असतं. कठीण काम असतं ते म्हणजे त्या आवडीमागचं पूर्ण वास्तव त्याच्यासमोर मांडणं.                                                        आवड आणि वास्तव यांच्यातला पूल                                                         माझ्या मुलीचंच उदाहरण घ्या. ती सध्या बारावीत आहे. तिला बेकिंग आणि कलिनरी क्षेत्रात खूप रस आहे. भविष्यात यातच काहीतरी करायचं, असा विचार चाललाय. पण हा अजून अंतिम निर्णय नाही. आम्ही फक्त पर्यायांचा शोध घेतोय. सुरुवातीला हॉटेल मॅनेजमेंटचा विषय निघाला. आम्ही तिला एक साधा प्रश्न विचारला—“हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय गं?” कारण बाहेरून पाहताना सुंदर हॉटेल, शेफचा कडक कोट, आकर्षक वातावरण आणि चमकदार स्वयंपाकघर एवढंच दिसतं. पण प्रत्यक्षात या क्षेत्रात हाऊसकीपिंग, फ्रंट डेस्क, किचन ऑपरेशन्स, ग्राहक सेवा आणि मोठ्या प्रमाणावर शारीरिक व मानसिक श्रम असतात. या कष्टांचं वास्तव समजून घेण्याची आणि त्याचा आदर करण्याची तयारी असावी लागते. सुदैवाने आमची हॉटेल क्षेत्रात गुंतवणूक असल्याने आम्ही तिला संभाजीनगरमधील ‘हयात प्लेस’मध्ये प्रत्यक्ष घेऊन गेलो. तिथे दिवसभर काम कसं चालतं, वेगवेगळ्या विभागांमध्ये लोक कसे काम करतात, कामाची शिस्त काय असते आणि त्या क्षेत्रातील आव्हानं कोणती आहेत, हे तिने स्वतः पाहिलं. कारण करिअरचा निर्णय केवळ इंस्टाग्रामवरची झगमगाट पाहून घेता येत नाही.                                                        एका आवडीमागे अनेक शक्यता                                                          आता तिला फूड बिझनेस किंवा बेकिंगमध्ये जायचंच असेल, तर केवळ “मला बेकिंग आवडतं” म्हणून एखाद्या मर्यादित अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापेक्षा आम्ही थोडा व्यापक विचार करतोय. उदाहरणार्थ, तिने Food Technology सारखा अभ्यासक्रम केला, तर तिच्यासमोर केवळ बेकरीपुरतंच क्षेत्र राहणार नाही. भविष्यात स्नॅक्स, पॅकेज्ड फूड, फूड प्रोसेसिंग किंवा मोठ्या प्रमाणावर अन्नप्रक्रिया उद्योगात व्यवसाय अथवा करिअर करण्याचे पर्यायही उपलब्ध राहू शकतात. ती Food Technologyच करणार, असं ठरलेलं नाही. हा फक्त विचारांचा विस्तार आहे. आणि मला वाटतं, मुलांना असाच विचार करायला शिकवणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणाचा उद्देश फक्त आज आवडणाऱ्या एका कामासाठी तयार होणं नसावा; तर भविष्यात गरज पडल्यास दिशा बदलण्याची ताकद देणं हा असावा.                                                      आजचा ट्रेंड, उद्याचं करिअर?                                                          इथेच आजच्या करिअरच्या चर्चांमध्ये मला एक मोठी त्रुटी दिसते. आज बाजारात कशात नोकऱ्या आहेत? पगार कुठे जास्त मिळतोय? AI किंवा IT मध्ये किती लाखांचं पॅकेज मिळतंय? अशा प्रश्नांच्या आधारे आज अनेक पालक मुलांना करिअरच्या दिशेने ढकलत आहेत. पण एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा—आजची बाजारपेठ चार-पाच वर्षांनंतरही अशीच असेल का? आज तुम्ही ज्या ट्रेंडकडे पाहून मुलाला एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देता, तो मुलगा कदाचित चार वर्षांनी पदवी घेऊन बाहेर पडेल. तोपर्यंत तंत्रज्ञान बदलेल. उद्योग बदलेल. कामाचं स्वरूप बदलेल. काही नोकऱ्या कमी होतील, काही नव्या नोकऱ्या निर्माण होतील आणि अनेक पारंपरिक कामांचं स्वरूपही बदलेल. मग केवळ आजच्या जॉब मार्केटवर आधारित घेतलेला निर्णय उद्या कितपत टिकेल? म्हणूनच फक्त आजच्या मार्केटचा ट्रेंड पाहून करिअर निवडू नये. मार्केट महत्त्वाचं आहेच. पण त्यासोबत मुलाची आवड, क्षमता, स्वभाव, शिकण्याची तयारी, मेहनतीची तयारी, अनिश्चितता पचवण्याची ताकद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—“मला भविष्यात कोणत्या प्रकारचं आयुष्य जगायचं आहे?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.                                                       मुलाचं स्वप्न आणि त्यामागचं वास्तव                                                         माझ्या मुलाची गोष्ट तर याहून वेगळी आहे. तो नववीत आहे. त्याला टेबल टेनिसची प्रचंड आवड आहे. सकाळी साडेचार वाजता उठून प्रॅक्टिसला जायला तो एका पायावर तयार असतो. एक दिवस तो म्हणाला—“मला टेबल टेनिसमध्येच करिअर करायचंय.” पालक म्हणून इथे दोन सोपे मार्ग असतात. पहिला—“खेळून पोट भरतं का? गप अभ्यास कर.” दुसरा—“तुला आवडतंय ना? मग बिनधास्त खेळातच पुढे जा!” आम्ही दोन्ही मार्ग सोडले आणि माहिती घ्यायला सुरुवात केली. आमच्या ओळखीचे जोशी कुटुंब स्पोर्ट्स क्षेत्रात आहे. आम्ही त्यांना भेटलो. आजच्या काळात खेळामध्ये कोणत्या संधी आहेत, हे समजून घेतलं. तेव्हा लक्षात आलं की स्पोर्ट्स म्हणजे आता फक्त ‘खेळाडू’ किंवा ‘कोच’ होण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. स्पोर्ट्स फिजिओथेरपी, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, परफॉर्मन्स ॲनालिसिस अशा अनेक क्षेत्रांचे दरवाजे आता उघडले आहेत. पण ही माहिती मिळाल्यानंतरही आम्ही मुलासमोर एक कठीण सत्य ठेवलं—“तुला खेळ आवडतो हे एक सत्य आहे; पण त्यातून व्यावसायिक यश मिळण्याची शक्यता किती, हे दुसरं सत्य आहे.” सचिन तेंडुलकर होण्याचं स्वप्न लाखो मुलं बघतात; पण सर्वोच्च स्तरावर पोहोचतात मोजकेच. मुलाला स्वप्न बघू देणं जितकं गरजेचं आहे, तितकंच त्याला वास्तव आणि पर्यायी वाटांची जाणीव करून देणंही महत्त्वाचं आहे.“तुला काय बनायचंय?” हा प्रश्न पुरेसा नाहीआणखी एक आव्हानात्मक प्रश्न आम्ही त्याच्यासमोर ठेवला. उद्या तुझे मित्र कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर असतील. महागड्या गाड्या घेतील. मोठमोठे पगार कमावतील. आणि तू कदाचित स्पोर्ट्स क्षेत्रात तुलनेने साधं आयुष्य जगत असशील. तेव्हा—“मी चुकीचा रस्ता निवडला का?” असा न्यूनगंड तुझ्या मनात येणार नाही ना? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण मुलांना विचारतो—“तुला काय आवडतं?” पण त्यासोबत हे विचारायला विसरतो— तुला कोणत्या प्रकारचं आयुष्य जगायचं आहे? तुझी पैशांची अपेक्षा किती आहे? तुला किती आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे? अपयश आणि अनिश्चितता पचवण्याची तुझी तयारी आहे का? तुला रोजच्या कामातून समाधान मिळणं महत्त्वाचं आहे की आर्थिक यश? आणि सर्वात महत्त्वाचं—तुझ्या अपेक्षेप्रमाणे अफाट यश मिळालं नाही, तरीही तू शांत आणि समाधानी राहू शकशील का?मोठा पगार म्हणजे मोठं आयुष्य नव्हेआपण नकळत मुलांच्या डोक्यात एक चुकीची व्याख्या बिंबवतो—मोठा पगार + महागडी गाडी = यश + आनंद. पैसा आवश्यक आहे. तो सुरक्षा देतो. तो स्वातंत्र्य देतो. तो अनेक संधी उपलब्ध करून देतो. पण पैसा म्हणजे आनंद नव्हे. आनंद ही मनाची एक अवस्था आहे. म्हणूनच मुलांना फक्त ‘करिअर’ निवडायला शिकवण्यापेक्षा ‘आयुष्य’ समजून घ्यायला शिकवलं पाहिजे.                                                  पालकांनी काय करावं?                                                         एखाद्या क्षेत्रात जायचंय? नक्की जा. पण त्या क्षेत्रातले कष्ट समजून जा. खेळात जायचंय? जरूर जा. पण सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याची स्पर्धा, शक्यता आणि पर्यायी वाटा समजून जा. व्यवसाय करायचाय? आवडीने करा. पण लागणारं भांडवल, जोखीम, स्पर्धा आणि अपयशाची तयारी ठेवून उतरा. एखादा अभ्यासक्रम निवडायचा आहे? तर केवळ पदवी मिळेल का, एवढंच पाहू नका. त्या शिक्षणामुळे भविष्यात किती दारं उघडी राहतील, हेही पाहा.                                                  पालकांनी नकाशा देऊ नये; दिशा दाखवावी                                                        पालक म्हणून आपलं काम मुलांच्या हातात तयार नकाशा देणं नाही. आपलं काम आहे—दिशा दाखवणं, रस्त्यावरचे खड्डे दाखवणं, धोक्यांची जाणीव करून देणं, पर्याय समजावून सांगणं आणि मग निर्णय घेण्याची जबाबदारी मुलाला देणं. रस्ता कोणता निवडायचा, हा निर्णय शेवटी त्यांचाच असला पाहिजे. मुलांनी पालकांच्या अपूर्ण स्वप्नांचा भार वाहू नये. आणि पालकांनीही स्वतःच्या भीतीपोटी मुलांचे पंख छाटू नयेत. “या क्षेत्रात भविष्य नाही” किंवा “इथे खूप पैसा आहे”—या दोन वाक्यांत कोणाचंही आयुष्य बसत नाही.                                                     करिअर हा एकच रस्ता नाही                                                      आजच्या काळात करिअर एकदा निवडलं आणि पुढची चाळीस-पन्नास वर्षं त्याच रस्त्यावर चालत राहिलो, असंही होणार नाही. कदाचित एका आयुष्यात आपल्याला अनेक वेळा दिशा बदलावी लागेल. नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. नवीन कौशल्यं आत्मसात करावी लागतील. कदाचित एखादं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जावं लागेल. म्हणून मुलांना आजच—“तुला नक्की काय बनायचं?” याचं अंतिम उत्तर देण्यासाठी भाग पाडण्यापेक्षा त्यांना निर्णय घेण्याची पद्धत शिकवणं अधिक महत्त्वाचं आहे.                                                                                                                    शेवटी एवढंच...मुलांना रोज विचारू नका—“तुला काय बनायचंय?” त्याऐवजी त्यांना विचारायला सुरुवात करा— “तुला कोणत्या प्रकारचं आयुष्य जगायचं आहे?” कदाचित या एका प्रश्नातून करिअरकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलेल. कारण करिअर हे आयुष्याचा एक भाग आहे. आयुष्य हे करिअरपेक्षा खूप मोठं आहे. आणि कदाचित— खऱ्या करिअरची सुरुवात ‘मला काय बनायचंय?’ या प्रश्नापासून होत नाही; ती ‘मला कसं जगायचंय?’ या प्रश्नापासून होते.