समाजासाठी आयुष्य वेचणारा ‘ज्ञानयोगी’

हटके

समाजासाठी आयुष्य वेचणारा ‘ज्ञानयोगी’

शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका सामान्य मुलाने शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, सहकार आणि समाजकारणाच्या क्षेत्रात असामान्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने निर्माण करून ती पूर्ण करण्यासाठी ज्ञानाची दारे खुली करणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील म्हणजे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर समाजपरिवर्तनाची चालती-बोलती चळवळ होते. शिक्षणाची गंगा ग्रामीण भागातील घराघरांत पोहोचविणाऱ्या या ‘ज्ञानयोगी’च्या निधनाने महाराष्ट्राने एक अष्टपैलू कर्मयोगी गमावला आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि माणूस घडविणाऱ्या प्रवासाचा घेतलेला हा भावस्पर्शी मागोवा...

प्रा. शाहू पाटील, इस्लामपूर 09 Aug 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X

 - प्रा. शाहू पाटील, इस्लामपूर                                                                             काही माणसे जातात तेव्हा केवळ एक व्यक्ती आपल्यातून निघून जात नाही; त्यांच्या जाण्याने एका विचाराची सावली विरळ होते, एका युगाचा आधार हरपतो आणि असंख्य माणसांच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे जाणे हे असेच दुःख आहे. दादा हे केवळ एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते, एका संस्थेचे संस्थापक नव्हते, एका राजकीय पदावर विराजमान झालेले व्यक्तिमत्त्व नव्हते. ते एका विचाराचे वाहक होते. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आणि ग्रामीण मुलांच्या हातात ज्ञानाचे शस्त्र दिले, तर त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते, या विश्वासाने त्यांनी आयुष्यभर काम केले.

आज दादा आपल्यात नाहीत. पण त्यांच्या नावाने उभ्या असलेल्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये, कृषी संस्था, क्रीडा संकुले आणि त्यातून घडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने त्यांचा श्वास अजूनही जिवंत आहे. म्हणूनच दादांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करताना मन वारंवार एका प्रश्नापाशी येऊन थांबते... अशी माणसे खरंच जातात का?

छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीतील या मातीने अनेक कर्तृत्ववान माणसे घडवली. त्याच मातीतल्या आंबप या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात दादांचा जन्म झाला. पुढे याच शेतकरी घरातून निघालेला हा मुलगा शिक्षणाच्या क्षेत्रात इतका मोठा वटवृक्ष उभा करेल, याची कल्पना त्या काळी कोणाला आली असेल? कृषीप्रधान समाजातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या दादांनी आपल्या अनुभवातून ग्रामीण माणसाचे जग जवळून पाहिले होते. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या मुलाच्या डोळ्यांतली स्वप्ने आणि त्याच घराच्या आर्थिक मर्यादा त्यांनी अनुभवल्या होत्या. म्हणूनच त्यांच्या कार्याच्या मुळाशी ‘शिक्षण’ होते आणि त्या शिक्षणाच्या केंद्रस्थानी ‘सामान्य माणूस’ होता.

शेक्सपियरने ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न विचारला. पण दादांच्या बाबतीत मात्र नावातच नव्हे, तर त्या नावाच्या प्रत्येक अक्षरात कार्याची एक कहाणी दडलेली दिसते. ‘ज्ञानदेव’ किंवा ‘ज्ञानेश्वर’ हे नाव उच्चारले की आपल्यासमोर ज्ञानाचा प्रकाश उभा राहतो. मध्ययुगीन काळात संत ज्ञानेश्वरांनी समाजाला अज्ञान, कर्मकांड आणि संकुचित भेदांच्या चौकटीबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानाची दारे सामान्यांसाठी खुली केली. लोकांच्या भाषेत अध्यात्म मांडले. भिंत चालविण्याची अद्भुत आख्यायिका त्यांच्या जीवनाशी जोडली गेली. आणि आधुनिक काळातील या ‘ज्ञानेश्वराने’ वेगळ्या अर्थाने समाज चालविण्याचे काम केले.

ज्ञानाची भिंत त्यांनी उभी केली नाही; त्यांनी ज्ञानाची दारे उघडली. ज्ञानेश्वरांनी ज्ञान लोकांच्या भाषेत आणले; दादांनी ज्ञान लोकांच्या दारात नेले. त्या काळात ज्ञानेश्वरांनी समाजाच्या मनातील अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दीप लावला; या काळात दादांनी ग्रामीण भागातील मुलांच्या हातात शिक्षणाचा दिवा दिला.

म्हणूनच कधी कधी वाटते... नावात काय आहे, हा प्रश्न विचारणाऱ्या शेक्सपियरला दादांचे आयुष्य दाखविले असते, तर कदाचित त्यानेही ‘नावात बरेच काही असते’ असेच म्हटले असते. दादांच्या मनात शेतकरी सतत जिवंत होता. शेतकऱ्याची व्यथा त्यांना कागदावर वाचावी लागली नाही. ती त्यांनी घरातून अनुभवली होती. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील मुलाला शिक्षण घ्यायचे असेल, तर आर्थिक अडचणी त्याच्या पावलांमध्ये बेड्या घालतात, हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी शिक्षणाला केवळ शहरातील मुलांचा अधिकार राहू दिला नाही.

‘शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच झाला पाहिजे,’  या नियतीवादी विचाराला त्यांनी आपल्या कामातून छेद दिला.                      शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो...
  • शेतकऱ्याचा मुलगा अभियंता होऊ शकतो...
  • शेतकऱ्याचा मुलगा कृषी शास्त्रज्ञ होऊ शकतो...
  • शेतकऱ्याचा मुलगा प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो...
  • शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती होऊ शकतो...
  • आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्याचा मुलगा कर्तृत्वाने समाजाला दिशा देऊ शकतो.

ही स्वप्ने दादांनी केवळ भाषणांत मांडली नाहीत; त्यासाठी त्यांनी संस्थांची उभारणी केली. प्राथमिक शिक्षणापासून व्यावसायिक शिक्षणापर्यंतची साखळी उभी केली. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक शिक्षणाच्या संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या संस्थांनी ग्रामीण युवकांना तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. ही केवळ महाविद्यालये नव्हती; ही ग्रामीण स्वप्नांची विद्यापीठे होती. एखाद्या गावातील आई-वडील आपल्या मुलाला घेऊन शहरात आले आणि ‘माझ्या मुलाने शिकावे’ म्हणून दार ठोठावले, तर त्या मुलासाठी शिक्षणाचे दार उघडे असावे, अशी दादांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या शैक्षणिक कार्याचा विस्तार एका विषयापुरता किंवा एका शहरापुरता राहिला नाही. शिक्षणाच्या विविध शाखा एकमेकांशी जोडत त्यांनी ज्ञानाचा मोठा पट उभा केला.

आज त्यांच्या संस्थांमधून बाहेर पडणारा डॉक्टर एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवतो, अभियंता एखादी नवी निर्मिती करतो, कृषी पदवीधर शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा देतो, शिक्षक पुढच्या पिढीला घडवतो. या प्रत्येक यशामागे दादांनी पेटविलेल्या एका दिव्याची ज्योत आहे. म्हणूनच दादा हे केवळ शिक्षणमहर्षी नव्हते; ते शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे साधन मानणारे कर्मयोगी होते.

दादांच्या कार्याचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे क्रीडाप्रेम. कुस्तीच्या मातीत वाढलेल्या महाराष्ट्राला खेळाचे महत्त्व वेगळे सांगावे लागत नाही. कुस्ती म्हणजे केवळ आखाड्यातील दोन शरीरांची झुंज नाही; ती शिस्त, संयम, धैर्य आणि डावपेच शिकवणारी जीवनशाळा आहे. दादांनी कुस्ती आणि क्रीडेकडे याच दृष्टीने पाहिले. जीवनातही प्रत्येक क्षणी एक डाव असतो, एक आव्हान असते आणि त्याला सामोरे जाण्यासाठी शरीराइतकेच मनही मजबूत असावे, हा संदेश त्यांच्या कार्यातून दिसतो.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि क्रीडा अकादमी ही त्यांच्या क्रीडाविषयक दृष्टीची भव्य साक्ष आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुविधा उभ्या करून त्यांनी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या माणसाने मुंबईच्या महानगरीय अवकाशात एवढे मोठे क्रीडाविश्व उभे करावे, ही गोष्टच त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते.

‘अष्टपैलू’ हा शब्द सामान्यतः क्रीडा क्षेत्रात वापरला जातो. पण दादांच्या बाबतीत हा शब्द त्यांच्या संपूर्ण जीवनाला लागू पडतो. शिक्षणात त्यांनी काम केले. आरोग्य क्षेत्रात काम केले. कृषी क्षेत्राशी नाते जोडले. सहकार क्षेत्रात योगदान दिले. क्रीडा क्षेत्रात ठसा उमटविला. समाजकारण केले. राजकारणातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदारीही सांभाळली. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

परंतु या सगळ्या पदांपेक्षा ‘दादा’ हीच ओळख त्यांना अधिक प्रिय होती. कारण पदे येतात आणि जातात. खुर्च्या बदलतात. सत्ता बदलते. पण माणसांच्या मनात निर्माण केलेले स्थान बदलत नाही. दादांनी राजकारण केले, पण ते केवळ राजकारणी बनले नाहीत. त्यांच्या कार्याची दिशा समाजकारणाकडेच राहिली. सत्ता ही साधन आहे आणि समाज हा अंतिम केंद्रबिंदू आहे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. म्हणूनच राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणारी माणसे महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रांत दिसतात. महाराष्ट्राचा इतिहास सांगतो... उंचीने लहान असलेली माणसे कीर्तीने आभाळाएवढी होऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. संकटे त्यांच्या वाट्याला कमी आली नाहीत. पण संकटांच्या सावलीतही स्वराज्याचे स्वप्न त्यांनी डोळ्यांतून जाऊ दिले नाही. त्यांनी माणसे ओळखली. त्यांच्या गुणांचा उपयोग केला. सामान्य माणसातील असामान्य शक्तीला जागवले. म्हणूनच मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्य उभे केले. दादांच्या कार्यातही या विचाराचा प्रत्यय येतो. समाजातील गुणी माणसे शोधायची, त्यांना संधी द्यायची, त्यांच्यातील क्षमता विकसित करायची आणि त्या क्षमतेचा समाजासाठी उपयोग करायचा, हीच त्यांच्या कार्याची एक मोठी बाजू होती.

शिवाजी महाराजांनी माणसे जोडली आणि स्वराज्य उभे केले. दादांनी माणसे घडवली आणि ज्ञानाचे साम्राज्य उभे केले. महात्मा फुले यांनी शिक्षणाला सामाजिक मुक्तीचे शस्त्र मानले. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी आपल्या राज्याची दारे खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा मंत्र दिला. या महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत दादांचे कार्य एका वेगळ्या काळातील, वेगळ्या पद्धतीचे पण त्याच मूलभूत विचाराशी जोडलेले दिसते, शिक्षणातून माणूस उभा करा आणि माणसातून समाज उभा करा. म्हणूनच मला दादा आधुनिक फुले वाटतात. दादा आधुनिक शाहू वाटतात. दादा आधुनिक ज्ञानेश्वर वाटतात. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, दादा आपल्या काळातील कर्मयोगी वाटतात.

आज दादा नाहीत. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांनी उभ्या केलेल्या संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची स्मारके आहेत. दगडात बांधलेली स्मारके काळाच्या ओघात झिजतात; पण एखाद्या मुलाच्या हातात दिलेले शिक्षणाचे पुस्तक पिढ्यान्‌पिढ्या पुढे जाते. एखाद्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात निर्माण झालेले स्वप्न पुढे अनेकांना प्रकाश देते. दादांनी अशीच असंख्य स्वप्ने फुलवली. आज त्यांच्या संस्थांच्या प्रांगणात एखादा विद्यार्थी पुस्तक उघडून बसलेला असेल. एखादा डॉक्टर रुग्णावर उपचार करत असेल. एखादा अभियंता नव्या योजनेचा आराखडा तयार करत असेल. एखादा कृषी विद्यार्थी मातीची भाषा समजून घेत असेल. एखादा खेळाडू मैदानावर घाम गाळत असेल. त्या प्रत्येक क्षणी दादा कुठेतरी जिवंत असतील.

कारण माणूस शरीराने जातो; विचाराने नाही. दादा गेले, पण दादांनी उभा केलेला ज्ञानाचा वटवृक्ष अजूनही हिरवा आहे. त्या वटवृक्षाच्या सावलीत हजारो विद्यार्थी उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांत भविष्य आहे. त्यांच्या हातात शिक्षण आहे. आणि त्यांच्या पाठीशी दादांचा आशीर्वाद आहे.

म्हणून दादांच्या निधनाकडे केवळ एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या अंताच्या रूपाने पाहता येणार नाही. हे एका प्रदीर्घ कार्यप्रवासाचे एका टप्प्यावर थांबणे आहे. त्यांनी पेटविलेली ज्ञानाची, समाजकार्याची मशाल आता पुढच्या पिढीने हातात घ्यायची आहे. त्यांनी उघडलेली ज्ञानाची दारे अधिक व्यापक करायची आहेत. त्यांनी ग्रामीण मुलांसाठी पाहिलेले स्वप्न आणखी मोठे करायचे आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्म घेऊन शेतकऱ्याच्या मुलाच्या डोळ्यातील स्वप्न ओळखणारा हा दादा आयुष्यभर त्या स्वप्नांसाठी झटला. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, असे आपण ऐकतो. पण दादांनी माणसे चालवली. त्यांनी माणसांना ज्ञानाच्या दिशेने चालवले. त्यांनी गावाकडच्या मुलांना शहराच्या संधींपर्यंत चालवले. त्यांनी शिक्षणाला समाजाच्या दारापर्यंत चालवले. आणि म्हणूनच त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे जाणे नाही; तो एका विचाराचा दीप दुसऱ्या हातात देण्याचा क्षण आहे. अशा या अष्टपैलू, कर्मयोगी, शिक्षणमहर्षी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाला माझ्याकडून विनम्र अभिवादन!

दादा, तुम्ही शरीराने आमच्यात नाही. पण तुम्ही उभ्या केलेल्या ज्ञानमंदिरांत, खेळाच्या मैदानांत, रुग्णालयांत, कृषी शिक्षणाच्या प्रयोगांत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांत तुम्ही कायम जिवंत राहाल. अशा या दादांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!