मुलांचे व्हिडिओ गेमचे व्यसन कसे सोडवाल?

हटके

मुलांचे व्हिडिओ गेमचे व्यसन कसे सोडवाल?

मुलांमध्ये वाढत चाललेले व्हिडिओ गेम्सचे व्यसन (Internet Gaming Disorder) किती धोकादायक आहे? त्याची लक्षणे, मानसिक परिणाम, पालकांनी घ्यावयाची काळजी आणि प्रभावी उपाययोजना याविषयी डॉ. स्वाती गानू यांचे सविस्तर मार्गदर्शन.

डॉ. स्वाती गानू, प्रख्यात शैक्षणिक समुपदेशक, मुंबई 03 Aug 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
डॉ. स्वाती गानू टोकेकर                                                          नुकतीच घडलेली एक घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. एका मुलाने व्हिडिओ गेममधील टास्क पूर्ण करण्याच्या प्रयत्नात उंच इमारतीवरून उडी मारली. ही घटना प्रत्येक पालकाला हादरवून टाकणारी आहे. अजून आयुष्य नीट पाहिलेही नाही, अशा कोवळ्या वयातील मुलाचा व्हिडिओ गेम्सच्या विळख्यात अडकून झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक आहे. ही घटना प्रत्येक पालकाने गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
एकेकाळी मुले दूरदर्शनवर कार्टून, रामायण, महाभारत यांसारखे कार्यक्रम पाहत असत. नंतर साधे व्हिडिओ गेम्स खेळण्याची सवय लागली. कालांतराने त्यामध्ये लेव्हल, रिवॉर्ड्स, गिफ्ट्स आणि स्पर्धा वाढत गेली. आजची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे. अनेक व्हिडिओ गेम्समधील हिंसक आणि आक्रमक आशयामुळे मुलांमध्ये आक्रमकता, विध्वंसक वृत्ती आणि असंवेदनशीलता वाढताना दिसते.
आज अनेक मुलांचा दिवसातील मोठा वेळ मोबाईलवरील गेम्समध्ये जातो. ते स्वतःला खोलीत बंद करून घेतात. दात घासणे, आंघोळ करणे, अभ्यास करणे किंवा मैदानी खेळ खेळणे याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर, भावनिक स्वास्थ्यावर आणि बौद्धिक विकासावर होतो. पालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक ठरते. मुलांना या व्यसनातून बाहेर कसे काढायचे, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो.
सध्या मुलांमध्ये व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक मुले दररोज दोन तासांपासून संपूर्ण दिवस गेम्स खेळण्यात घालवतात. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. या अवस्थेला 'इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर (Internet Gaming Disorder - IGD)' असे म्हटले जाते. जागतिक स्तरावर ही मानसिक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या म्हणून ओळखली जात आहे.
हे व्यसन का जडते?                                                          इतर व्यसनांप्रमाणेच गेमिंगही मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय करते. प्रत्येक विजय, लेव्हल पूर्ण करणे किंवा बक्षीस मिळाल्यानंतर मेंदूत आनंदाची भावना निर्माण होते. हळूहळू मुलांना त्याची सवय लागते आणि ते पुन्हा पुन्हा गेम्सकडे आकर्षित होतात. या व्यसनामुळे मुलांमध्ये नैराश्य (Depression), चिंता (Anxiety), सामाजिक दुरावा आणि भावनिक अस्थिरता वाढू शकते. पालकांशी संवाद कमी होतो. वास्तवातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी किंवा ताण कमी करण्यासाठी ते गेम्सचा आधार घेतात.
किशोरवयीन मुलांचा मेंदू अजून पूर्ण विकसित झालेला नसल्याने त्यांना अशा व्यसनाची अधिक सहज लागण होते. त्यांची निर्णयक्षमता, तणाव सहन करण्याची क्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद तुलनेने कमी असते. त्यामुळे ते अधिक धोके पत्करतात. राग, चिडचिड, आक्रमकता आणि सतत रिवॉर्ड मिळवण्याची तीव्र इच्छा वाढत जाते. हा एक गंभीर वर्तनात्मक (Behavioural) मानसिक विकार आहे.

  • मुलांना गेमिंगचे व्यसन लागले आहे हे कसे ओळखावे?
  • मुलांचा बहुतांश वेळ गेमिंगमध्ये जातो.
  • गेम खेळू दिला नाही तर चिडचिड, अस्वस्थता किंवा चिंता वाढते.
  • झोपेचे प्रमाण कमी होते.
  • मुलं दिवसेंदिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतात.
  • अभ्यास, घरातील कामे किंवा इतर छंदांमध्ये रस राहत नाही.
  • गेम खेळण्यासाठी पालकांशी खोटे बोलणे किंवा फसवणूक करणे सुरू होते.
  • गेमिंग कमी करण्याचा प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही.
  • गेम थांबवण्यास सांगितल्यावर आरडाओरडा, वस्तू फेकणे, दारे आपटणे किंवा आक्रमक वर्तन दिसते.
  • मानसिक समस्या निर्माण झाल्या तरी गेमिंग सुरूच राहते.
  • अभ्यासातील प्रगती सातत्याने घसरते.
  • पालकांनी काय करावे?
  • मुलांना वाचन, चित्रकला, स्वयंपाक, मैदानी खेळ, संगीत, कला यांसारख्या सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करा.
  • स्क्रीन टाइमबाबत कठोर आणि स्पष्ट नियम ठरवा.
  • ताण, मोह आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य मुलांना शिकवा.
  • स्वतःही मोबाईलचा वापर कमी करून आदर्श निर्माण करा.
  • झोप, आहार, अभ्यास, व्यायाम आणि मनोरंजन यांचे नियमित वेळापत्रक ठरवा.
  • व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाचे मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक दुष्परिणाम मुलांना समजावून सांगा.
  • गेम्सऐवजी गार्डनिंग, बुद्धिबळ, पोहणे, योग, सायकलिंग, संगीत, वाद्यवादन, शिवणकाम, कुकिंग, स्पर्धा परीक्षा, स्केटिंग, मैदानी खेळ अशा सर्जनशील पर्यायांकडे त्यांना वळवा.
  • मुलांच्या वर्तनाचे सातत्याने निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यसनाची सुरुवात होत असल्याची चिन्हे दिसताच मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घ्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट पाहू नका. योग्य वेळी केलेले हस्तक्षेप मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.