- तणनाशक वापरताना घ्या ही काळजी
- तणनाशकाचा वापर करताना योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
- अनेक शेतकऱ्यांचा "जास्त औषध म्हणजे जास्त परिणाम" असा गैरसमज असतो. प्रत्यक्षात जास्त प्रमाणात तणनाशक वापरल्यास उसाच्या पानांवर करपणे (स्कॉर्चिंग) येऊ शकते. तसेच पिकावर ताण येऊन वाढही खुंटू शकते.
- म्हणून तणनाशकाचा वापर नेहमी शिफारशीनुसारच करावा.
- तणांचा प्रकार ओळखा
- रुंद पानांची तणे आणि गवतवर्गीय तणे यांच्यासाठी वेगवेगळी तणनाशके वापरावी लागतात. त्यामुळे तणांचा प्रकार ओळखूनच तणनाशकाची निवड करणे आवश्यक आहे.
- तणनियंत्रणासाठी १० महत्त्वाचे नियम
- लागवडीनंतर जमिनीत ओल असतानाच तणनाशकाची फवारणी करा.
- उघड्या राहिलेल्या उसाच्या कांड्या मातीने झाकून घ्या.
- फवारणी करताना मागे (रिव्हर्स) सरकत फवारणी करा.
- तणांच्या प्रकारानुसार योग्य तणनाशक निवडा.
- शिफारशीपेक्षा अधिक मात्रा कधीही वापरू नका.
- नवीन ऊस जातींमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तणनाशक वापरा.
- फवारणीनंतर शेताची नियमित पाहणी करा.
- आवश्यकतेनुसार कमी मजुरांत खुरपणी करा.
- तणनियंत्रणात वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठेवा.
- प्रत्येक ऊस जातीची तणनाशक सहन करण्याची क्षमता वेगळी असते, हे लक्षात ठेवा. सुरक्षित फवारणीही तितकीच आवश्यक तणनाशक फवारताना हातमोजे, मास्क, गॉगल आणि बूट वापरावेत. जोरदार वारा असताना किंवा पावसाची शक्यता असल्यास फवारणी टाळावी. फवारणीनंतर यंत्र स्वच्छ धुवून ठेवावे. रिकाम्या औषधाच्या बाटल्या किंवा पॅकेटची योग्य विल्हेवाट लावावी. औषध मिसळताना किंवा फवारणीदरम्यान अन्नपदार्थांचे सेवन टाळावे.
शेती
तणनाशकाचा योग्य वापर : ऊस उत्पादनाची गुरुकिल्ली
ऊस लागवडीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत तणांचे प्रभावी नियंत्रण झाले, तर उसाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मात्र योग्य वेळ, योग्य तणनाशक आणि योग्य फवारणी पद्धतीची माहिती नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, मजुरीची बचत होते आणि उसाचे उत्पादनही वाढते
दिलीप पार्लेकर, शेती अधिकारी, क्रांती साखर कारखाना, कुंडल
01 Aug 2026
5 मिनिटे वाचन
दिलीप पार्लेकर, शेती अधिकारी, क्रांती साखर कारखाना, कुंडल सुरुवातीचे ६० ते ९० दिवस सर्वाधिक महत्त्वाचे ऊस लागवडीनंतरचे पहिले ६० ते ९० दिवस तणनियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात तणांची वाढ झपाट्याने होते. ही तणे उसाबरोबर अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमिनीतील ओलावा यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे उसाची वाढ खुंटते, फुटवे कमी येतात आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काही तणे रोग व किडींचे आश्रयस्थानही बनतात. आज मजुरांची कमतरता आणि वाढता मजुरी खर्च लक्षात घेता अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करत आहेत. मात्र योग्य वेळ, योग्य मात्रा आणि योग्य पद्धतीने फवारणी केल्यासच त्याचा अपेक्षित फायदा मिळतो.लागवडीनंतर त्वरित फवारणी कराऊस लागवडीनंतर जमीन ओलसर असताना, शक्यतो दोन ते तीन दिवसांच्या आत तणनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे तणांची उगवण सुरुवातीलाच रोखता येते.फवारणीपूर्वी उघड्या राहिलेल्या उसाच्या कांड्या मातीने झाकून घ्याव्यात. त्यामुळे तणनाशकाचा थेट संपर्क उसाशी येत नाही आणि उगवण सुरक्षित राहते. जर लागवडीच्या वेळी दोन-तीन पानांच्या अवस्थेतील तणे दिसत असतील, तर शिफारशीनुसार योग्य तणनाशकांचा एकत्रित वापर करता येतो. कोणतेही तणनाशक वापरण्यापूर्वी त्यावरील सूचना वाचाव्यात किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. फवारणीची योग्य पद्धत महत्त्वाची अनेक शेतकरी पुढे चालत फवारणी करतात. त्यामुळे फवारणी झालेल्या जमिनीवर पाय पडून औषधाचा संरक्षक थर तुटतो आणि त्या ठिकाणी पुन्हा तण उगवू शकते. यासाठी फवारणी करताना मागे (रिव्हर्स) सरकत फवारणी करणे अधिक योग्य ठरते. त्यामुळे औषधाचे आवरण अबाधित राहते आणि तणनाशकाची कार्यक्षमता वाढते. रोपलागवडीत तणनियंत्रण कसे करावे? रोपलागवड करताना शक्य असल्यास रोपे लावण्यापूर्वी पाणी देऊन ओल तयार करावी आणि त्यानंतर तणनाशकाची फवारणी करावी. जर हे शक्य नसेल, तर रोपे लावल्यानंतर तणांची अवस्था, प्रकार आणि उसाची वाढ लक्षात घेऊन योग्य तणनाशक वापरावे. विशेषतः गवतवर्गीय तणांचे प्रमाण जास्त असल्यास त्यासाठी योग्य तणनाशक निवडणे आवश्यक आहे. तणनियंत्रणाचे फायदे सुरुवातीच्या काळात प्रभावी तणनियंत्रण झाल्यास साधारण एक महिना तणांचा त्रास कमी राहतो. त्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. त्यानंतर थोडीफार तणे दिसल्यास कमी मजुरांत खुरपणी करून नियंत्रण मिळवता येते. यामुळे खुरपणीचा खर्च कमी होतो, उत्पादन खर्चात बचत होते आणि शेती अधिक फायदेशीर ठरते.