'लॉ ऑफ अट्रॅक्शन’चा भ्रामक खेळ

फीचर्स

'लॉ ऑफ अट्रॅक्शन’चा भ्रामक खेळ

तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला तुम्हीच जबाबदार असता', असा दावा करणारा 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' आणि कर्मसिद्धांताचा एक विशिष्ट अर्थ आज अनेकांकडून मांडला जातो. मात्र निरपराध बालकांवरील अत्याचार, बलात्कार, हत्या किंवा इतर अमानुष घटनांचे समर्थनही जर याच तत्त्वज्ञानाच्या नावाखाली केले जात असेल, तर तो अध्यात्माचा विजय नसून मानवी संवेदनशीलतेचा पराभव ठरतो. श्रद्धा आणि विवेक यांच्यातील समतोल हरवला, तर अध्यात्मही माणसाला वास्तवापासून दूर नेऊ शकते.....

डॉ. विजय रणदिवे, पुणे 01 Aug 2026 5 मिनिटे वाचन 118 views
Facebook WhatsApp X

– डॉ. विजय रणदिवे, पुणे

'लॉ ऑफ अट्रॅक्शन' नेमके काय सांगतो?

'तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना तुम्ही स्वतःच्या विचारांनी आकर्षित करता' किंवा 'तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेला तुमचे विचार आणि कर्म कारणीभूत असतात,' असे 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' मानणारे अनेकजण सांगतात.

काही जण तर यापुढे जाऊन एखाद्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामागेही तिच्या मागील जन्मातील कर्म कारणीभूत असल्याचा दावा करतात. हे ऐकून कोणाच्याही मनात संताप निर्माण होईल. मात्र ही माझी भूमिका नसून 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' आणि कर्मसिद्धांताचा असा अर्थ लावणाऱ्या काही लोकांची मांडणी आहे.

वेबिनारमधील धक्कादायक अनुभव

काही वर्षांपूर्वी मी 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' शिकवणाऱ्या एका मोटिव्हेशनल स्पीकरच्या ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी मी प्रशिक्षकाला एक प्रश्न विचारला.

“एखाद्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते, तेव्हा त्या घटनेमागे 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' कसा काम करतो?”

त्यावर त्याने उत्तर दिले, “त्या मुलीच्या मागील जन्मातील कर्मांमुळेच या जन्मात तिच्यासोबत ही घटना घडली असावी.”

हे उत्तर ऐकून मला प्रचंड संताप आला. मी त्याचा तीव्र निषेध केला. मात्र त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्या झूम बैठकीत उपस्थित असलेल्या वीस-तीस जणांपैकी एकाही व्यक्तीने माझ्या प्रश्नाला पाठिंबा दिला नाही. उलट अनेकांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेचे समर्थन केले.

उत्तर टाळणारी मानसिकता

अलीकडेच तेरा वर्षांच्या एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग चार दिवस सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही बातमी वाचल्यानंतर मी मला वेबिनारमध्ये सहभागी होण्यास सांगणाऱ्या मैत्रिणीला फोन करून विचारले, “या घटनेला कोण जबाबदार आहे?”

तिने उत्तर दिले, “घटना अत्यंत दुर्दैवी आहे; पण काही प्रश्नांची उत्तरं नसतात.”

हे उत्तर अपेक्षितच होते. कारण अनेक तथाकथित आध्यात्मिक लोक अशा प्रश्नांवर चर्चा टाळतात. त्यांच्या मते अशा नकारात्मक घटनांवर बोलले तरी त्या आपल्या आयुष्यात आकर्षित होतात. त्यामुळे प्रश्न विचारण्यापेक्षा मौन बाळगणेच त्यांना अधिक योग्य वाटते.

तर्काला उत्तर आहे का?

माझ्या मनात मात्र एक प्रश्न कायम राहतो. जर 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' आणि कर्मसिद्धांत इतके अचूक असतील, तर सर्वाधिक धार्मिक, देवपूजक आणि सामूहिक प्रार्थना करणाऱ्या समाजांमध्ये असे भीषण गुन्हे अधिक का घडतात? आणि तुलनेने कमी धार्मिक किंवा नास्तिक समाजांमध्ये अशा घटना तुलनेने कमी का दिसतात?

या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे या विचारसरणीकडे दिसत नाहीत. अनेकदा विषय बदलला जातो किंवा चर्चा टाळली जाते.

माणुसकी हरवू नये

एकेकाळी मीही या विचारविश्वाचा भाग होतो. काही प्रमाणात माझाही त्यावर विश्वास होता. पण मी माझी संवेदनशीलता जिवंत ठेवली. प्रश्न विचारण्याची वृत्ती सोडली नाही. अन्यायाविषयी अस्वस्थ होण्याची क्षमता जपली. त्यामुळे या विचारसरणीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

आज मला याचाच आनंद आहे की, अध्यात्माच्या नावाखाली मी माझी माणुसकी गमावली नाही.

विवेकाची ज्योत जिवंत ठेवली पाहिजे

मला माहीत आहे, अशा घटना मी एकट्याने थांबवू शकत नाही. पण त्यांचे तर्कहीन समर्थन करणाऱ्यांप्रमाणे गप्प बसणेही मला मान्य नाही.

धर्म, अध्यात्म आणि श्रद्धा यांचा आदर राखतानाच विवेक, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि मानवी संवेदनशीलता जपणे तितकेच आवश्यक आहे. कारण प्रश्न विचारणारा समाजच अन्यायाला खऱ्या अर्थाने आव्हान देऊ शकतो. श्रद्धेला विवेकाची जोड मिळाली, तरच अध्यात्म माणसाला उन्नत करते; अन्यथा ते अन्यायाचे समर्थन करणारे साधन बनण्याचा धोका निर्माण होतो.