– प्रा. सुरेश आडके, साहित्यिक
चर्चात्मकतेकडे झुकणारे साहित्यविश्व
साहित्याने वास्तव मांडायलाच हवं; पण वास्तवाचं प्रदर्शन आणि वास्तवाचं चिंतन यात मूलभूत फरक असतो. काही ठिकाणी प्रसिद्धी, चर्चात्मकता आणि तात्कालिक लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात वास्तवाला अधिक रंग चढवले जातात. अपवादात्मक अनुभवांना व्यापक वास्तवाचं स्वरूप दिलं जातं. परिणामी समाजाला अंतर्मुख करणारं, विचारांना चालना देणारं आणि माणूस घडवणारं साहित्य हळूहळू दुर्लक्षित होत चालल्याची खंत वाटते. आज साहित्याच्या गुणवत्तेपेक्षा त्यातील ‘हटकेपणा’ अधिक महत्त्वाचा ठरत आहे आणि याच प्रवाहात समाजदर्शी, वैचारिक व संस्कारक्षम साहित्य मागे पडताना दिसत आहे.
विचार द्यायचा की चर्चेत राहायचं?
आज अनेक लेखकांसमोर प्रश्न असा उभा आहे की समाजाला विचार द्यायचा की चर्चेत राहायचं? सध्या तात्कालिक गाजावाजाला अधिक महत्त्व मिळताना दिसतं आणि वैचारिक साहित्य शांतपणे बाजूला सरकतं. अलीकडच्या काही वर्षांतील विविध साहित्यगौरव आणि निवडींकडे पाहिलं, तर साहित्यकृतीच्या वैचारिक खोलीपेक्षा किंवा समाजदर्शी आशयापेक्षा ‘विषयातील वेगळेपणा’ अधिक महत्त्वाचा ठरताना दिसतो. नव्या विषयांचं स्वागत व्हायलाच हवं; पण केवळ चर्चात्मक विषय हाताळला म्हणूनच एखाद्या साहित्यकृतीकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात असेल, तर हा विचार करण्याचा विषय आहे. समाजाला दिशा देणारं, मानवी मूल्यांवर भाष्य करणारं आणि सामाजिक परिवर्तनाची ताकद असलेलं साहित्य अनेकदा चर्चेच्या व गौरवाच्या प्रवाहात मागे पडताना दिसतं.
पुरस्कार हे अंतिम मोजमाप नाही
आज एखादा लेखक मोठा आहे की नाही, हे अनेकदा त्याला मिळालेल्या पुरस्कारांवर ठरवलं जातं. मोठा पुरस्कार मिळाला की तोच लेखक ‘सर्वश्रेष्ठ’ ठरवण्याची मानसिकता वाढताना दिसते. मात्र पुरस्कार हे साहित्याचं अंतिम मोजमाप असू शकत नाहीत. मराठी साहित्यात असे अनेक लेखक होऊन गेले, ज्यांना मोठे पुरस्कार मिळाले नाहीत; पण त्यांच्या साहित्याने पिढ्या घडवल्या, विचार दिले आणि समाजाला दिशा दिली. त्यामुळे त्यांचं साहित्य कधीच लहान ठरत नाही.
गौरवासाठी साहित्यप्रकार निवडण्याची प्रवृत्ती
आज काही ठिकाणी पुरस्कार मिळवण्याच्या शक्यता लक्षात घेऊन साहित्यप्रकार निवडले जात असल्याचं दिसतं. काही लेखकांचा कल मुख्य प्रवाहातील साहित्यापेक्षा विशिष्ट साहित्यप्रकारांकडे वाढताना दिसतो. त्यामागे साहित्यिक ओढ किती आणि गौरवप्राप्तीची शक्यता किती, हा प्रश्न उपस्थित होतो. ही प्रवृत्ती साहित्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी निश्चितच चिंताजनक आहे.
साहित्यविश्वातील गट-तट आणि राजकारण
याहून गंभीर बाब म्हणजे साहित्य क्षेत्रात वाढत चाललेलं गट-तट, लागेबांधे आणि परस्पर गौरवाचं राजकारण. ‘तू मला गौरव, मी तुला गौरवतो’ ही मानसिकता अनेक ठिकाणी दिसून येते. काही साहित्यसंस्था आणि मंडळं साहित्यकृतीपेक्षा संबंधांना अधिक महत्त्व देताना दिसतात. एखादा लेखक आपल्या गटातला नसेल, विचारांचा नसेल किंवा कोणाच्या जवळचा नसेल, तर त्याच्या साहित्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. राजकारणातली गटबाजी परवडली; पण साहित्य क्षेत्रात निर्माण झालेलं राजकारण अधिक धोकादायक वाटू लागलं आहे. एखाद्या लेखकाला व्यासपीठांपासून, पुरस्कारांपासून आणि चर्चांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अनेकदा योजनाबद्ध पद्धतीने होताना दिसतो. ही लेखकाला नामशेष करण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे.
दुसऱ्याच्या गुणवत्तेला दाद देण्याची उणीव
एखाद्या साहित्यिकाचं लेखन प्रभावी आहे, त्याच्यात वैचारिक ताकद आहे, हे मनापासून मान्य करण्याचा मोठेपणा कमी होत चालला आहे. दुसऱ्याच्या गुणवत्तेला दाद देणं, त्याच्या लेखनाचं कौतुक करणं आणि तो आपल्यापेक्षा वेगळा असूनही चांगलं लिहितोय हे स्वीकारणं, ही साहित्यिक प्रामाणिकता कमी होताना दिसते. उलट दुसऱ्याला कमी लेखण्यात, त्याच्या उणिवा शोधण्यात आणि त्याच्या मोठेपणाकडे दुर्लक्ष करण्यातच काहींना समाधान मिळत आहे.
स्वाभिमानी लेखकांचा संघर्ष
काही स्वाभिमानी लेखक आजही केवळ आपल्या लेखणीवर विश्वास ठेवून लिहित आहेत. त्यांना चाटुगिरी जमत नाही, संबंधांचं राजकारण जमत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी नाती तयार करणं, चमचेगिरी करणं, चहाड्या करणं किंवा दुसऱ्या लेखकांच्या उणिवा काढण्यात वेळ घालवणं त्यांना मान्य नसतं. मात्र आजच्या वातावरणात अशाच लेखकांना अधिक संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.
साहित्यापेक्षा साहित्यिकांची चर्चा
काही साहित्यिक वर्तुळांमध्ये पुस्तकांपेक्षा व्यक्तींवर चर्चा अधिक होताना दिसते. साहित्यापेक्षा साहित्यिकांची गटं मोठी होत आहेत. कोण कोणाच्या बाजूचा, कोण कुणाच्या विरोधात, कोण कुणाच्या कार्यक्रमाला गेलं किंवा कोणाला पुरस्कार मिळाला, यावर अधिक चर्चा होते. साहित्याचा केंद्रबिंदू विचारापासून व्यक्तीकडे आणि व्यक्तीकडून गटाकडे सरकत चालल्याचं चित्र दिसतं. साहित्य हा समाजाचा आत्मा आहे. साहित्याने माणूस घडला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे आणि विचार जागे झाले पाहिजेत. एका पुस्तकाने आयुष्य बदलल्याची अनेक उदाहरणं समाजात आहेत.
‘अनुल्लेखाने मारणे’ ही वाढती प्रवृत्ती
आज एखादा लेखक चांगलं लिहू लागला, लोकांपर्यंत पोहोचू लागला की त्याच्यावर मुद्दाम मौन बाळगलं जातं. त्याच्या पुस्तकावर चर्चा होत नाही, त्याच्या साहित्याची दखल घेतली जात नाही. कार्यक्रमांत त्याचं नाव टाळलं जातं. सोशल मीडियावर त्याच्या पुस्तकाचा उल्लेखही केला जात नाही. कारण काहींना भीती असते की हा लेखक पुढे गेला तर तो अधिक मोठा होईल. त्यामुळे त्याला सुरुवातीलाच दुर्लक्षित ठेवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. अनेकदा पुस्तक न वाचताच प्रतिक्रिया दिल्या जातात. त्या प्रतिक्रियांमध्ये साहित्यिक प्रामाणिकतेपेक्षा व्यक्तीगत पूर्वग्रह अधिक दिसून येतात.
साहित्याची संस्कारक्षम ताकद जपली पाहिजे
पूर्वीच्या मराठी पाठ्यपुस्तकांकडे पाहिलं तरी साहित्याची संस्कारक्षम ताकद स्पष्ट जाणवते. ‘पाखऱ्या’, ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘आई’, ‘झोंबी’, ‘स्मशानातील सोनं’, ‘दमडी’, ‘लाल चिखल’, ‘बेगड’, ‘गोकुळ’, ‘दावं’, ‘औंधाचा राजा’, ‘माझे माहेर वाघदरा’ असे धडे आजही स्मरणात आहेत. त्या साहित्याने विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार केले, संवेदनशीलता वाढवली आणि जीवन समजून घेण्याची दृष्टी दिली. आजच्या पाठ्यपुस्तकांत माहिती, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेला अधिक स्थान मिळत असलं, तरी मनाला स्पर्श करणारा, अंतर्मुख करणारा आणि माणूस घडवणारा साहित्यभाग कमी झाल्याचं जाणवतं. भाषा ही केवळ माहिती देण्याचं माध्यम नसून ती मनाशी संवाद साधणारी शक्ती आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये साहित्य निवडताना लेखकाच्या प्रसिद्धीपेक्षा त्याच्या साहित्याची संस्कारक्षम ताकद महत्त्वाची ठरली पाहिजे.
वाचकच साहित्य जिवंत ठेवतो
साहित्यिक मोठेपण हे केवळ नाव, वय, पुरस्कार किंवा प्रसिद्धीवर ठरत नाही. ते माणुसकी, प्रगल्भता, विचारांची उंची आणि इतरांना उभं करण्याच्या वृत्तीवर ठरतं. आज गरज आहे ती पुन्हा साहित्यकृतीकडे केंद्रित होण्याची. लेखक कोणत्या गटाचा आहे, कोणाशी जवळचा आहे किंवा कोणत्या चर्चात्मक विषयावर लिहितो यापेक्षा त्याने काय लिहिलं, समाजाला काय दिलं आणि वाचकाच्या मनात कोणता विचार निर्माण केला, हे अधिक महत्त्वाचं ठरायला हवं. कारण पुरस्कार, प्रसिद्धी आणि चर्चांचा काळ बदलत राहतो; पण काळाच्या कसोटीवर टिकतं ते फक्त खरं साहित्य. आणि खरं साहित्य हे गटांनी नव्हे, तर वाचकांच्या मनांनी जिवंत ठेवलेलं असतं.