अस्वस्थ तरुणाई, अस्थिर समाज

फीचर्स

अस्वस्थ तरुणाई, अस्थिर समाज

ग्रामीण महाराष्ट्रातील बेरोजगारी, दिशाहीन तरुणाई, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा प्रभाव आणि वाढती सामाजिक अस्थिरता यांचा वेध घेणारा भाऊ चासकर यांचा विचारप्रवर्तक लेख. तरुणांना विधायक दिशा देण्याची गरज अधोरेखित करणारे सखोल विश्लेषण.

भाऊ चासकर 26 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
ग्रामीण महाराष्ट्रात सध्या एक अस्वस्थ करणारी सामाजिक स्थिती हळूहळू ठळक होत चालली आहे. शिकूनही बेरोजगार राहिलेली, शिक्षण न घेतल्यामुळे आर्थिक अस्थैर्यात अडकलेली आणि परिणामी लग्न, स्थैर्य व भविष्याबाबत निराश झालेली तरुण पिढी गावोगावी टोळ्यांच्या स्वरूपात सक्रिय होताना दिसते आहे. ही केवळ काही व्यक्तींची समस्या नसून, ती समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनत चालली आहे.

– भाऊ चासकर, शिक्षणतज्ज्ञ, अकोले

दिशाहीन तरुणाईचे वाढते वास्तव
ग्रामीण भागात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, धार्मिक सप्ताह, जत्रा, उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी या तरुणांचा प्रभाव वाढताना दिसतो. काही ठिकाणी स्थानिक सर्वपक्षीय नेतृत्व या तरुणांचा पद्धतशीर वापर करून घेत असल्याचे चित्र आहे. भारतीय समाज मुळात उत्सवप्रिय आहे. गावागावांत वर्षभर विविध कार्यक्रम सुरू असतात. हाताला ठोस काम नसलेल्या किंवा स्वतःच्या शेतीत काम करण्याची मानसिक तयारी नसलेल्या तरुणांना या कार्यक्रमांतून सहजपणे ‘काम’ किंवा ‘टास्क’ मिळतो.

राजकीय वापर आणि अल्पसंतुष्ट मानसिकता
निवडणुका नसतानाही कार्यकर्ते म्हणून ओळख टिकवून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम आणि आयोजनांची गरज भासते. वाढदिवस, लग्न-वरात, हॉटेल-ढाब्यांवरील खाण्यापिण्याची चंगळ यात अनेक तरुणांचे आयुष्य अडकून पडले आहे. गरजा फार नसल्या तरी ‘आजचं भागलं, बास झालं’ अशी अल्पसंतुष्ट मानसिकता तयार होत आहे. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, डीजे आणि नृत्य यांनाच सामाजिक कार्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गुन्हेगारीकडे वाढणारा कल
या तरुणांपैकी काहीजण आपल्या संघटन कौशल्याचा वापर सेटलमेंट, मांडवली आणि दादागिरीसारख्या कामांसाठी करू लागले आहेत. अलीकडच्या काळात घडलेल्या गुन्हेगारी घटनांभोवती जमणारी तरुणांची गर्दी ही अधिक चिंताजनक बाब आहे. गावोगावी अशा व्यक्ती ‘आदर्श’ म्हणून उभ्या राहत आहेत. कामात नसलेले आणि दिशाहीन तरुण सहजपणे या टोळ्यांच्या प्रभावाखाली जात आहेत. दारू आणि इतर व्यसनांचे प्रमाण वाढत असून, निराशेवर व्यसन हा उपाय आहे, अशी चुकीची मानसिकता बळावत चालली आहे.

सोशल मीडियाचा मानसिकतेवर परिणाम
‘रिकामं मन सैतानाचं घर’ ही म्हण आज ग्रामीण वास्तवात प्रकर्षाने जाणवते. किरकोळ वाद, भांडणे, मारामाऱ्या आणि दमबाजीमुळे अनेक गावांमध्ये अशांतता वाढताना दिसते. हातात स्मार्टफोन असलेली ही पिढी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेळ घालवते. जात-धर्मासारख्या विषयांबाबत ती अतिसंवेदनशील; मात्र अपरिपक्व होत चालली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हिंसक आशयामुळे हिंसेबाबतची संवेदनशीलता कमी होत असल्याचेही दिसून येते.

शाळकरी मुलांवरील वाढता प्रभाव
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या प्रवृत्तीचा शाळकरी मुलांवर होणारा परिणाम. टपोरी भाषा, वेषभूषा, हेअरस्टाईल आणि डीजेच्या तालावरचे आक्रमक नृत्य या गोष्टी मुलांना आकर्षित करत आहेत. अभ्यास, शिस्त आणि कष्टापेक्षा ही संगत अधिक मोहक वाटू लागली आहे. पालक आणि शाळेचे संस्कार या दृश्य आकर्षणापुढे कमी पडताना दिसत आहेत.

विधायक दिशेची गरज
ही तरुणाई वाया गेलेली आहे, असे म्हणण्यापेक्षा विधायक विचार, सकारात्मक दृष्टी आणि रचनात्मक कामाची प्रेरणा नसलेली निष्क्रिय तरुणाई भविष्यातील सामाजिक संकटाची चाहूल देत आहे. या परिस्थितीचा समाजमानसशास्त्रीय अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. समाज आणि राजकीय नेतृत्वाने लोकप्रियतेसाठी या दिशाहीन तरुणाईचा वापर करण्याचा मार्ग स्वीकारला, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील. आज गरज आहे ती या तरुणाईला योग्य दिशा, रोजगार, कौशल्य, सामाजिक जबाबदारी आणि विधायक नेतृत्व देण्याची. अन्यथा ही अस्वस्थता उद्याच्या अस्थिर समाजाचे रूप धारण करू शकते.