शेतकऱ्यांनी केव्हा, काय लावावे?

फीचर्स

शेतकऱ्यांनी केव्हा, काय लावावे?

कोणते पीक कोणत्या हंगामात घेतल्यास जास्त बाजारभाव मिळतो? काकडी, कोथिंबीर, झेंडू, द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसह विविध पिकांचे हंगामनिहाय नियोजन, बाजारपेठ आणि नैसर्गिक शेतीविषयी क्रांतीचे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांचे मार्गदर्शन.

Krantiwave 26 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
दीर्घकालीन बागायती पिकांबरोबर भाजीपाला पिकांमधून शेतकऱ्यांना कमी कालावधीत उत्पन्न मिळू शकते. मात्र कोणते पीक कोणत्या हंगामात घेतल्यास चांगला बाजारभाव मिळतो, याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते. बाजारपेठेतील मागणी, सण-उत्सव, हवामान आणि निर्यातीच्या संधी लक्षात घेऊन पीक नियोजन केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.

– दिलीप पार्लेकर, शेती अधिकारी, क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल 

हंगामानुसार भाजीपाला लागवडीचे नियोजन

दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडीची लागवड करावी. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये आणि ऐन हिवाळ्यात काकडीला चांगला बाजारभाव मिळतो. पाडव्याच्या सुमारास कांदा पात लावल्यास उन्हाळ्यात तसेच आषाढी एकादशीपर्यंत पातीला चांगला भाव मिळतो. १७ मार्च ते १९ मे या कालावधीत किंवा बदलत्या हवामानामुळे मृग अथवा आर्द्रा नक्षत्रात पाऊस लांबल्यास, ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्यांत कोथिंबिरीची टप्प्याटप्प्याने लागवड करावी. त्यामुळे उन्हाळ्यात कोथिंबिरीचे चांगले उत्पन्न मिळते.

सणासुदीच्या बाजारपेठेचा फायदा घ्या

जून-जुलैमध्ये झेंडूची रोपे तयार करून लागवड केल्यास दसरा-दिवाळीला झेंडूला चांगला भाव मिळतो. एप्रिल-मे महिन्यात लागवड केलेले आले वर्षभर सेंद्रिय खत आणि जैविक औषधांच्या व्यवस्थापनाखाली वाढवून गणेशोत्सवापासून काढणीस सुरुवात केल्यास चांगले दर मिळतात. सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरलेल्या लिंबाला चांगला बाजारभाव मिळतो.

द्राक्ष व निर्यातीचे नियोजन

द्राक्षांची एप्रिल व ऑक्टोबर छाटणी योग्य वेळी केल्यास रमजान आणि नाताळच्या काळात आखाती देश व युरोपमध्ये निर्यात करता येते. यामुळे पाणी, मजुरी, खत आणि औषधांवरील खर्चात बचत होते. द्राक्ष शक्यतो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बाजारात आणून १५ मार्चपूर्वी विक्री पूर्ण करावी. द्राक्षांचा हंगाम आंब्याच्या हंगामाशी जुळणार नाही, याची काळजी घ्यावी.

कलिंगड, खरबूज आणि आंतरपीक

रमजान, नाताळ व इतर सणांचा विचार करून कलिंगड आणि खरबूजाची लागवड करावी. डाळिंब किंवा शेवगा बागेत आंतरपीक म्हणूनही ही पिके घेता येतात. योग्य नियोजन केल्यास देशांतर्गत बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. गणेशोत्सवानंतर पितृपंधरवड्यात विविध भाजीपाल्याचे उत्पादन बाजारात आणल्यास कमी क्षेत्रातूनही अधिक उत्पन्न मिळू शकते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भेंडीची लागवड केल्यास हिवाळ्यात चांगले दर मिळतात.

गहू व पाण्याचे नियोजन

नवरात्रीपूर्वी बाजरी, हळवा कांदा किंवा उडीद काढल्यानंतर गव्हाची लागवड जर्मिनेटर प्रक्रिया करून करावी. लागवडीनंतर दर २१ दिवसांनी पाणी द्यावे. ४२ व्या दिवशी पाणी उपलब्ध नसेल तर ६३ व्या दिवशी, त्यानंतर ८४ व्या दिवशी आणि १०५ व्या दिवशी पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. दाण्यात चीक भरण्याच्या अवस्थेत पाणी मिळाल्यास उत्पादनात वाढ होते.

डाळिंब आणि आंब्याचे नियोजन

पाण्याची कमतरता असल्यास डाळिंबाचा मृग बहार घ्यावा आणि फळे १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान बाजारात आणावीत. आंबा (हापूस) एप्रिलपूर्वी बाजारात आल्यास चांगला भाव मिळतो आणि मे महिन्यातील उष्णतेमुळे होणारा साका टाळता येतो.

कांदा, मूग आणि पपईचे नियोजन

हळवा किंवा रांगडा कांदा १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान बाजारात आणल्यास चांगला भाव मिळतो. विशेषतः दक्षिण भारतातील बेंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम आणि कोयंबतूरसारख्या शहरांत मागणी वाढते. श्रावण व वैशाख महिन्यात कमी पाण्यावर मूग घेतल्यास भाद्रपद आणि उन्हाळ्यात त्याचा फायदा होतो. रमजानच्या मागणीचा विचार करून पपईची लागवड ८ ते ९ महिने आधी करावी.

टोमॅटो, वांगी, कोबी आणि फ्लॉवर

टोमॅटोची लागवड मार्च, जून आणि डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. काटेरी, भरताची आणि अंगोरा वांग्याला वर्षभर चांगला बाजारभाव असतो; मात्र पावसाळ्यात शेंडेअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने या काळात लागवड टाळावी. कोबीला फेब्रुवारी ते उन्हाळ्यापर्यंत चांगली मागणी असते. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास लागवड करावी. कोबीचा गड्डा हिरवागार, घट्ट आणि वजनदार असावा. फ्लॉवरला ऑगस्ट, फेब्रुवारी आणि उन्हाळ्यात चांगली मागणी असते. त्याचा गड्डा पांढराशुभ्र, घट्ट आणि ३५० ते ६०० ग्रॅम वजनाचा असल्यास अधिक भाव मिळतो.

मार्केटमध्ये मंदीचा काळ

जून महिन्यात शैक्षणिक प्रवेशांमुळे बाजारात मंदी असते. गणेशोत्सव ते दिवाळी या काळात बोनस आणि शेतीमालाची विक्री झाल्याने बाजारात पैसा फिरतो. दिवाळीनंतर डिसेंबरपासून मेपर्यंत कर, बँकांचे हप्ते आणि इतर आर्थिक व्यवहारांमुळे पुन्हा मंदी जाणवते. या काळात मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने भाजीपाला आणि फळांना अपेक्षित भाव मिळत नाही.

नैसर्गिक शेती हा पर्याय

या परिस्थितीवर मात करण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला, फळे आणि अन्नधान्याचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. शहरी आणि निमशहरी बाजारपेठेत अशा उत्पादनांना मोठी मागणी आहे. पारंपरिक उत्पादनांच्या तुलनेत नैसर्गिक शेतीमालाला देशांतर्गत बाजारपेठेत दुप्पट, तर काही ठिकाणी चार ते पाचपट अधिक भाव मिळू शकतो. देशी बियाणे आणि स्थानिक रोपांचा वापर करून नैसर्गिक शेती केल्यास उत्पादनाची गुणवत्ता आणि नफा दोन्ही वाढू शकतात.