मुलं वाढवतो कोण : घर की इंटरनेट?

फीचर्स

मुलं वाढवतो कोण : घर की इंटरनेट?

डिजिटल युगात मुलांना खरोखर कोण घडवतं-घर की इंटरनेट?.... सोशल मीडिया, मोबाईल, एआय, पालक-मुलांतील संवाद आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेवर संपादक संजय आवटे यांचा विचारप्रवर्तक लेख.

संजय आवटे, संपादक 26 Jul 2026 5 मिनिटे वाचन 142 views
Facebook WhatsApp X
जी माध्यमं आपल्या मुलांच्या जगण्याचा भाग झाली आहेत, त्यांना समजून घ्यावं लागेलच. पण, त्याच वेळी माध्यमांच्या सापळ्यात मुलं अडकणार नाहीत, यासाठीही परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘एआय इन एज्युकेशन’च्या स्तोमाच्या आहारी न जाता, मुलं स्वतंत्र विचार कशी करतील, झाडाला पाणी कसं घालतील, चित्र रंगवताना सर्वांग कसं रंगवून घेतील, छान ठेक्यावर ताल कसा धरतील, मैदानावर जाऊन घामेघूम होईपर्यंत कशी खेळतील, मातीत कशी लोळतील हेही आपल्याला पाहावं लागणार आहे!– संजय आवटे, संपादक, पुणे
स्नॅपचॅटपासून सुरू झालेला संवादाचा पेच
सतरा वर्षांची एक मुलगी प्रेमात पडली. सतराव्या वर्षी मुळात करायचं काय असतं, हा वेगळा विषय; पण घरी सुगावा लागलाच. ठरल्याप्रमाणे गदारोळ झाला. मुलीला समजावण्यासाठी तिच्या एका ज्येष्ठ शिक्षकांना बोलावण्यात आलं. शिक्षकांनी विचारलं, “बाई गं, कुठे भेटला तो तुला पहिल्यांदा?” ती म्हणाली, “स्नॅपचॅटवर.” या गृहस्थांना ही काय भानगड आहे, हेच माहीत नव्हतं. ते म्हणाले, “असं काही ठिकाण आपल्याकडे आहे का?” मुलगी हसत म्हणाली, “अहो सर, ते ठिकाण नाही. स्नॅपचॅट आहे. जसं व्हॉट्सॲप असतं, फेसबुक असतं, इंस्टाग्राम असतं, तसंच स्नॅपचॅट असतं.” शिक्षकांनी आपण काहीतरी भलतंच ऐकतोय असा चेहरा केला. “काय करायचं या पिढीचं? या वयात मुलं हे स्नॅपचॅट वगैरे करत बसतात. आम्ही यांच्या वयाचे होतो, तेव्हा आम्हाला साधा फोनही लावता येत नव्हता. कसं होणार या मुलांचं?” असं स्वगत करून ते म्हणाले, “आधी ते स्नॅपचॅट बंद कर. तिचा मोबाईल काढून घ्या.” असं काहीबाही सांगून शिक्षक निघून गेले.
"तुमचंच काउन्सिलिंग करून घ्या!"
पोरगी हुशार होती. सर निघताना ती म्हणाली, “अहो, माझं काउन्सिलिंग कशाला करता? तुमचंच काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे.” पालक म्हणाले, “पोरगी हाताबाहेर गेली आहे. आपलं काही ऐकतच नाही.” आई-वडिलांना समजेना, तिच्याशी काय बोलावं. तिला समजेना, यांना काय सांगावं. ज्यांना समुपदेशनासाठी बोलावलं गेलं, तेच डिजिटल जगापासून दूर होते. प्रश्न असा होता की, कोणी कोणाशी आणि कसा संवाद साधायचा?
बदललं जग, पण बदलला नाही संवाद
जग बदलतं आहे, हे खरं; पण या बदललेल्या जगाशी कसं वागायचं, हे मात्र अजूनही समजलेलं नाही. नव्या पिढीशी संवाद साधणं ही आजची सर्वात मोठी सामाजिक आणि कौटुंबिक परीक्षा आहे. पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद करणं वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही. मराठी माणूस तेलुगू माणसाशी, दोघांनाही एकमेकांची भाषा न समजता, संवाद साधू पाहतो तसं काहीसं आज पालक आणि मुलांमध्ये घडत आहे.
तंत्रज्ञान हातात आहे; भाषा मात्र समजत नाही
पालकांकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, सर्व ॲप्स आहेत; पण एका विशिष्ट वयात फेसबुक वापरणं आणि फेसबुकसोबतच वाढणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आज फेसबुक हा ज्येष्ठांचा प्लॅटफॉर्म झाला आहे. तरुण शोधायला इंस्टाग्रामवर जावं, तर ते स्नॅपचॅटवर पोहोचलेले असतात. मुद्दा फक्त प्लॅटफॉर्मचा नाही. तो विचारांचा, मूल्यांचा, धारणांचा आणि भाषेचा आहे.
पालकांचीही कसोटी
मी असे अनेक पालक पाहिले आहेत. ते विद्वान आहेत. मोठ्या पदांवर आहेत. उत्तम वक्ते आहेत. समाजाशी प्रभावी संवाद साधतात. पण घरातील एकोणीस वर्षांच्या मुलाशी संवाद कसा साधायचा, हे त्यांना जमत नाही. प्रत्येकवेळी चूक पालकांचीच असते असं नाही. पौगंडावस्थेतील मुलांचे पालक असणं हे स्वतःमध्येच एक मोठं आव्हान आहे.
व्यवस्था मागे, मुलं पुढे
जग बदललं. माध्यमं बदलली. पण अनेक व्यवस्था तिथेच थांबल्या. गुन्हेगार 'डिजिटल अरेस्ट' करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करू लागले; पण पोलिस अजूनही दंडुका संस्कृतीत अडकलेले दिसतात. मुलं एआय वापरून अभ्यास करत आहेत. चॅटजीपीटीकडून असाइनमेंट तयार करून घेत आहेत; पण अनेक शिक्षक अजूनही जुन्याच चौकटीत विचार करत आहेत. कुठल्या युगातल्या मुलांचे आपण पालक आहोत, हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे.
एआयसोबतच आयुष्यही शिकायला हवं
जी माध्यमं आपल्या मुलांच्या जगण्याचा भाग झाली आहेत, त्यांना समजून घ्यावंच लागेल. पण त्याच वेळी माध्यमांच्या सापळ्यात मुलं अडकणार नाहीत, यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. ‘एआय इन एज्युकेशन’च्या स्तोमामागे धावताना मुलं स्वतंत्र विचार करतील का? झाडाला पाणी घालतील का? चित्र रंगवताना स्वतःही रंगून जातील का? ताल धरतील का? मैदानावर घाम गाळतील का? मातीत लोळतील का? हे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत.
पालकांनीही मुलांच्या वयाचे व्हायला हवं
त्यासाठी पालकांनीही बदलायला हवं. मी पालकांना कायम सांगतो, “तुमचं वय तेच, जे तुमच्या मुलाचं आहे.” तुम्ही त्यांच्या वयाचे झाल्याशिवाय त्यांच्याशी संवाद साधता येणार नाही. त्यांची भाषा समजून घ्यावी लागेल.
मोबाईल बनतोय नवा पालक
तुम्ही आणि तुमचं मूल यांच्या नात्यात कोणत्याही मध्यस्थाची गरज नसावी. जर संवादाचा पूल तुटला, तर तो मोबाईल बांधतो. आणि मग तुमच्या नकळत तुमच्या मुलाचं पालकत्व मोबाईल स्वीकारतो. मुलांकडे मग तुमच्यापेक्षा अधिक स्मार्ट पालक तयार झालेला असतो.
'ग्लोबल व्हिलेज'पासून 'मोबाईल व्हिलेज'पर्यंत
दर पाच वर्षांनी पिढी बदलते, अशी परिस्थिती आहे. चौदा वर्षांच्या भावाला समजून घेणं वीस वर्षांच्या बहिणीलाही कठीण होतं. “आमच्या वेळी असं नव्हतं,” असं जे म्हणतात, ते प्रत्यक्षात काळाच्या मागे पडलेले असतात. “It Takes a Village to Raise a Child” अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. हिलरी क्लिंटन यांनी याच शीर्षकाचं पुस्तकही लिहिलं आहे. मूल केवळ आई-वडील वाढवत नाहीत; त्याच्या घडणीत संपूर्ण समाजाचा वाटा असतो. आज त्या ‘ग्लोबल व्हिलेज’चं रूपांतर एका मोबाईलमध्ये झालं आहे. हे ‘मोबाईल व्हिलेज’ आज तुमचं मूल घडवत आहे. त्यामुळे प्रश्न एकच उरतो—मुलं वाढवतो कोण : घर की इंटरनेट?