उत्तम भविष्य ‘डिझाइन’ करा...

नोकरी

उत्तम भविष्य ‘डिझाइन’ करा...

कल्पकता, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन क्षेत्रात करिअरच्या व्यापक संधी आहेत. देशातील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, पात्रता आणि करिअरच्या संधींबाबत करिअर मार्गदर्शक सुरेश वांदिले यांनी दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती.

सुरेश वांदिले, करियर समुपदेशक, मुंबई 23 Jul 2026 5 मिनिटे वाचन 9 views
Facebook WhatsApp X
देशातील सर्वोत्तम डिझाइन संस्थेत प्रवेशाची संधी; कल्पकता आणि सर्जनशीलतेला मिळू शकते जागतिक करिअरची दिशा– सुरेश वांदिले, करियर समुपदेशक, मुंबई.......दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी काय झाले? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय द्याल? जगात फार तर पाच-दहा हजार मुले या दिवशी जन्मली असतील. कुठेतरी पाच-पन्नास अपघात झाले असतील. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या असतील, असे साधारणतः सांगता येईल. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. कारण या दिवशी देशातील एका अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि मुंबई येथील परीक्षा केंद्रांचाही समावेश होता.तुमच्यापैकी २१ डिसेंबर रोजी किती जणांनी ही परीक्षा दिली? प्रस्तुत लेखकाचा अनुभव लक्षात घेता ही संख्या कमी असण्याची शक्यता आहे. अर्थात, अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल तर ती निश्चितच आनंदाची बाब आहे. कारण या परीक्षेचा संबंध कालच्या लेखात उल्लेख केलेल्या एका प्रमुख संस्थेतील प्रवेशाशी आहे. ही संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID). विद्यार्थ्यांनी २१ डिसेंबरची प्रवेश परीक्षा दिली नसेल, तर त्यांच्यासाठी २०२६ च्या शैक्षणिक वर्षातील या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी हुकलेली असू शकते.२०२७ च्या करिअर रोडमॅपमध्ये NID ची नोंद कराजे झाले ते झाले. मात्र २०२७ च्या करिअर रोडमॅपमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेची नोंद आपल्या स्मार्टफोनमधील कॅलेंडरमध्ये आताच करून ठेवायला हरकत नाही. २०२७ च्या शैक्षणिक वर्षासाठी ही परीक्षा डिसेंबर २०२६ किंवा त्याच्या आसपास होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांतील परीक्षांच्या तारखांचा विचार करता साधारण डिसेंबर-जानेवारी या कालावधीत ही परीक्षा होत असल्याचे दिसून येते.२०२५ च्या शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी झाली. २०२३ च्या शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा ८ जानेवारी २०२३ रोजी, तर २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा २४ डिसेंबर २०२३ रोजी झाली होती. प्रवेश परीक्षेच्या काही काळ आधी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत नियमित माहिती घेत राहणे आवश्यक आहे.डिझाइन शिक्षणातील सर्वश्रेष्ठ संस्थाएनआयडी ही देशातील डिझाइन क्षेत्रातील सर्वोच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांपैकी एक आहे. डिझाइन क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या जगातील प्रमुख संस्थांमध्येही एनआयडीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.या संस्थेतील पदवी अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य, मानव्यशास्त्र किंवा विज्ञान अशा कोणत्याही ज्ञानशाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरू शकतात. त्याचप्रमाणे संबंधित नियमानुसार तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगअंतर्गत पाच विषयांसह सिनिअर सेकंडरी स्कूल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी किंवा हायर सेकंडरी सर्टिफिकेट व्होकेशनल एक्झामिनेशन उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात.बॅचलर ऑफ डिझाइन : कल्पकतेला करिअरची दिशाबॅचलर ऑफ डिझाइन (B.Des.) अभ्यासक्रम विविध डिझाइन शाखांमध्ये करता येतो. यामध्ये ॲनिमेशन फिल्म डिझाइन, एक्झिबिशन डिझाइन, फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाइन, ग्राफिक डिझाइन, सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन, फर्निचर अँड इंटेरिअर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन आणि टेक्सटाइल डिझाइन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांचा कालावधी साधारणतः चार वर्षांचा असतो.मास्टर ऑफ डिझाइन : उच्च शिक्षणाच्या व्यापक संधीमास्टर ऑफ डिझाइन (M.Des.) अभ्यासक्रम विविध विशेष शाखांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये फिल्म अँड व्हिडिओ डिझाइन, ग्राफिक डिझाइन, ॲनिमेशन फिल्म डिझाइन, फोटोग्राफी डिझाइन, सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन, फर्निचर अँड इंटेरिअर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, टॉय अँड गेम डिझाइन, ट्रान्स्पोर्टेशन अँड ऑटोमोबाइल डिझाइन, युनिव्हर्सल डिझाइन, डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरियन्स, स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट, डिजिटल गेम डिझाइन, इंटरॲक्शन डिझाइन, इन्फॉर्मेशन डिझाइन, न्यू मीडिया डिझाइन, ॲपेरल डिझाइन आणि लाइफस्टाइल अँड ॲक्सेसरी डिझाइनसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होतो. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते. कोणत्याही विषयातील निर्धारित कालावधीची पदवी किंवा डिझाइन, फाइन आर्ट, अप्लाइड आर्ट, आर्किटेक्चर आदी संबंधित क्षेत्रातील मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी नियमानुसार अर्ज करू शकतात.पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाएनआयडीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत ‘डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट’ (DAT) घेतली जाते. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक म्हणजेच प्रिलिम्स परीक्षा द्यावी लागते. संस्थेने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यातील मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.प्राथमिक परीक्षेत विद्यार्थ्यांची डिझाइनविषयक समज, निरीक्षणशक्ती, तार्किक विचारक्षमता, कल्पकता आणि सर्जनशीलता तपासणाऱ्या विविध प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो. सामान्यज्ञान, आजूबाजूच्या घडामोडींचे आकलन, तार्किक क्षमता, उताऱ्यावरील प्रश्न, संख्यात्मक क्षमता, आकृत्या आणि कार्यकारणभाव यांसारख्या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीची आणि चित्रांकन कौशल्याची चाचणी घेणारे प्रश्नही असतात. विविध परिस्थिती समजून घेऊन त्यावर आधारित कल्पना चित्र किंवा रेखाटनाच्या माध्यमातून मांडण्याची क्षमता तपासली जाते. थोडक्यात, विद्यार्थ्याचा डिझाइन क्षेत्राकडे असलेला कल, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशील गती यांची चाचपणी या प्रक्रियेत केली जाते.प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी बोलावले जाते. या टप्प्यात विद्यार्थ्यांची डिझाइन शिक्षणासाठीची क्षमता तपासणाऱ्या विविध प्रकारच्या चाचण्यांचा समावेश असू शकतो.पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियापदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. या प्रक्रियेत प्राथमिक आणि मुख्य अशा टप्प्यांचा समावेश असतो. प्राथमिक परीक्षेत उमेदवाराची वैचारिक क्षमता, निरीक्षणशक्ती, समस्या सोडविण्याची हातोटी आणि कल्पकता तपासली जाते.या परीक्षेत सामान्य ज्ञान, तार्किक विचार, इंग्रजी भाषा आणि डिझाइन क्षेत्रातील घडामोडींबाबतचे ज्ञान तपासले जाऊ शकते. त्याचबरोबर स्केचिंग, संकल्पना मांडणी (Ideation), सर्जनशील विचार आणि समस्या निवारणावर आधारित प्रश्नांचाही समावेश असू शकतो.मुख्य परीक्षेत सर्जनशीलतेचा कसमुख्य परीक्षेच्या टप्प्यात उमेदवाराच्या प्रत्यक्ष डिझाइन क्षमतेची चाचणी घेतली जाते. यामध्ये स्टुडिओ टेस्ट, मॉडेल मेकिंग, विविध साहित्य हाताळण्याची क्षमता, दृक्-श्राव्य चाचणी आणि त्रिमितीय डिझाइनशी संबंधित प्रात्यक्षिकांचा समावेश असू शकतो.काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुलाखत आणि पोर्टफोलिओलाही महत्त्व असते. विद्यार्थ्याने केलेल्या कामांचा संग्रह अर्थात पोर्टफोलिओ पाहिला जातो. उमेदवाराची संबंधित विषयातील समज, संवाद कौशल्य, कल्पकता आणि डिझाइन क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांची मुलाखतीच्या माध्यमातून चाचपणी केली जाऊ शकते.देशभर विस्तारलेले NID चे कॅम्पसअहमदाबाद, गांधीनगर आणि बेंगळुरू येथील एनआयडी कॅम्पस डिझाइन शिक्षणासाठी ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत एनआयडी आंध्र प्रदेश, एनआयडी हरियाणा, एनआयडी मध्य प्रदेश आणि एनआयडी आसाम या संस्थांचाही विस्तार झाला आहे.विविध एनआयडी संस्थांमध्ये उपलब्ध अभ्यासक्रम आणि प्रवेशक्षमता वेगवेगळी असू शकते. इंडस्ट्रियल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन तसेच टेक्सटाइल अँड ॲपेरल डिझाइन यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पदवी स्तरावर शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्या कॅम्पसमध्ये कोणता अभ्यासक्रम उपलब्ध आहे, याची माहिती संबंधित वर्षाच्या अधिकृत प्रवेश पुस्तिकेतून तपासावी.मराठी मुलांनी डिझाइन क्षेत्राकडे वळायला हवेडिझाइन क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील अनेक आघाडीच्या डिझाइनर्सनी अशा प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक भारतीय डिझाइनर्सनी जागतिक पातळीवरही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.सर्जनशीलता, कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि नावीन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन क्षेत्र करिअरच्या असंख्य वाटा खुल्या करू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठी विद्यार्थ्यांनी अशा राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.पालकांनी आपल्या मुलांमधील सर्जनशील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांनीही योग्य वयात विद्यार्थ्यांना अशा वेगळ्या आणि भविष्यवेधी करिअर पर्यायांची माहिती दिली पाहिजे. केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांच्या चौकटीत करिअरचा विचार न करता, बदलत्या काळानुसार नव्या क्षेत्रांकडे पाहण्याची दृष्टी विकसित करणे गरजेचे आहे.कारण योग्य वेळी योग्य करिअरची निवड केली आणि त्यासाठी नियोजनपूर्वक तयारी केली, तर विद्यार्थी केवळ आपले करिअरच नव्हे, तर आपले संपूर्ण भविष्यही उत्तम प्रकारे ‘डिझाइन’ करू शकतो.संपर्क : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पालडी, अहमदाबाद – ३८०००७दूरध्वनी : ०७९-२६६२९५००ई-मेल : admissions@nid.edu                    - अधिकृत प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ : admissions.nid.edu