"आई, माझं पुस्तक कुठे आहे?"
पुस्तक टेबलावरच असतं.
"माझी पेन्सिल दिसत नाही!"
ती समोरच पडलेली असते.
"मी दोन तास अभ्यास केला, पण काहीच लक्षात राहत नाही!"
असं तुमच्या घरातही होतं का?
अनेकदा आपण समजतो की मुलांची स्मरणशक्ती कमी आहे किंवा त्यांचं लक्षच नाही. पण खरं कारण वेगळंच असतं. समस्या स्मरणशक्तीची नसते, तर मन वर्तमानात नसण्याची असते. शरीर एका ठिकाणी असतं; पण मन भूतकाळ, भविष्यकाळ, मोबाईल, मित्र, गेम्स किंवा कल्पनांच्या जगात फिरत असतं.
आजच्या मुलांना आणि किशोरवयीन मुलांना जर एखादं जीवनकौशल्य शिकवायचं असेल, तर ते म्हणजे माइंडफुलनेस (Mindfulness) – सजगपणे वर्तमान क्षणात जगण्याची कला. माइंडफुलनेस म्हणजे डोंगरावर जाऊन ध्यानधारणा करणं नाही, तासन्तास डोळे बंद करून बसणं नाही किंवा मन पूर्णपणे रिकामं करणंही नाही. आपण या क्षणी काय करत आहोत, काय विचार करत आहोत, काय अनुभवत आहोत, याची शांतपणे जाणीव ठेवणं म्हणजे माइंडफुलनेस.
समजा, तुम्ही जेवत आहात; पण त्याच वेळी मोबाईलवर रील्स पाहत आहात. जेवण कधी संपलं, हेही लक्षात येत नाही. हा माइंडफुलनेस नाही. पण प्रत्येक घासाची चव, वास आणि पोत अनुभवत शांतपणे जेवलात, तर तो माइंडफुलनेस आहे. अभ्यासाचंही तसंच आहे. पुस्तक समोर असतं; पण मन दुसरीकडे भटकत असतं. दोन तास बसूनही काहीच लक्षात राहत नाही. पण वीस मिनिटं पूर्ण लक्ष देऊन अभ्यास केला, तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.
मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू अनेकदा "ऑटोपायलट"वर काम करत असतो. म्हणजे आपण काम करत असतो; पण मन दुसरीकडे असतं. अशा वेळी चुका वाढतात, विसरभोळेपणा वाढतो आणि शिकलेलं लक्षात राहत नाही. माइंडफुलनेस आपल्याला पुन्हा वर्तमान क्षणात आणतो. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस ही एक मोठी ताकद आहे. तो एकाग्रता वाढवतो, अभ्यासात रस निर्माण करतो, परीक्षेची भीती कमी करण्यास मदत करतो, भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. अभ्यास हा फक्त मेंदूचा नाही, तर मनाचाही प्रवास आहे. मन शांत असेल, तर शिकणं अधिक सोपं होतं.
किशोरवयात शरीरात आणि मनात अनेक बदल होत असतात. कधी कारण नसताना राग येतो, कधी उदास वाटतं, तर कधी स्वतःची तुलना इतरांशी सुरू होते. सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य परिपूर्ण दिसतं आणि स्वतःचं अपूर्ण वाटू लागतं. अशा वेळी माइंडफुलनेस एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो – भावना येतात आणि जातात; पण प्रत्येक भावनेनुसार वागणं आवश्यक नसतं. राग आला म्हणून ओरडायचं नाही. भीती वाटली म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीत. आधी भावना ओळखा, मग कृती ठरवा.
अभ्यास सुरू करण्यापूर्वी फक्त एक मिनिटाचा माइंडफुलनेस करून पाहा. आरामात बसा. चार सेकंद श्वास आत घ्या, चार सेकंद थांबा आणि चार सेकंद हळूहळू श्वास बाहेर सोडा. हे चार वेळा करा. मग मनात म्हणा, "आता पुढची वीस मिनिटं फक्त अभ्यास." हा छोटासा सराव मन आणि मेंदूला अभ्यासासाठी तयार करण्यास मदत करतो. वर्गात शिक्षक शिकवत असताना फक्त ऐका. मन भरकटलं, तर स्वतःवर रागावू नका. शांतपणे पुन्हा लक्ष धड्याकडे आणा. मन शंभर वेळा भरकटलं तरी हरकत नाही; प्रत्येक वेळी ते परत आणणं म्हणजेच माइंडफुलनेस.
परीक्षेच्या आधी घाबरायला लागलं, तर डोळे बंद करून काही खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, "मी तयारी केली आहे. मी शांत आहे. मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन." मन शांत झालं की शिकलेलं ज्ञान आठवण्यासही मदत होते. माइंडफुलनेसचा उपयोग फक्त अभ्यासापुरता मर्यादित नाही. तो नातेसंबंधही सुंदर करतो. आई-बाबा बोलत असताना खरंच ऐकणं, मित्राचं बोलणं मध्येच न तोडणं, लगेच प्रतिक्रिया न देता थोडा विचार करणं, मोबाईल वापरताना स्वतःला विचारणं – "मी हा मोबाईल गरजेसाठी वापरत आहे की फक्त सवयीने?" – हे सगळं माइंडफुलनेसचंच उदाहरण आहे.
१० वर्षांखालील मुलांसाठी...
या वयातील मुलांना माइंडफुलनेस उपदेशाने नाही, तर खेळातून शिकवावा लागतो.
"फुलाचा सुगंध घ्या... आणि मेणबत्ती हळुवार विझवा." हा श्वासाचा खेळ मुलांना खूप आवडतो. नाकाने खोल श्वास घ्यायचा, जणू सुंदर फुलाचा सुगंध घेत आहोत आणि तोंडाने हळूहळू श्वास सोडायचा, जणू मेणबत्ती विझवत आहोत.
"पाच गोष्टी शोधा" हा आणखी एक सुंदर खेळ आहे. पाच दिसणाऱ्या गोष्टी, चार स्पर्श करता येणाऱ्या गोष्टी, तीन आवाज, दोन वास आणि एक चव सांगायची. हा खेळ भरकटलेलं मन पुन्हा वर्तमानात आणण्यास मदत करतो.
"बेडकासारखे शांत बसा." फक्त एक मिनिट शांत बसून श्वास आत-बाहेर जाताना जाणवायचा. अशा नियमित सरावामुळे मुलांची एकाग्रता हळूहळू वाढण्यास मदत होऊ शकते.
जेवताना एक घास पूर्ण लक्ष देऊन खाण्याचा खेळ करा. त्या घासाचा रंग, वास, चव आणि पोत अनुभवायला सांगा. झोपण्यापूर्वी मुलांना तीन प्रश्न विचारा – "आज तुला कोणती गोष्ट आवडली?", "आज तू कोणाला मदत केली?" आणि "उद्या कोणती एक चांगली गोष्ट करशील?" या छोट्या सवयी मुलांना कृतज्ञता, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक विचार शिकवतात.
पालकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. मुलं आपलं ऐकून कमी आणि आपल्याकडे पाहून जास्त शिकतात. आपण सतत मोबाईलमध्ये असू आणि मुलांना लक्ष देण्याचा सल्ला देत राहिलो, तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. आपण स्वतः वर्तमानात जगलो, शांतपणे संवाद साधला, जेवताना किंवा फिरताना मोबाईल बाजूला ठेवला, तर मुलंही तेच शिकतील.
आजच्या काळात मुलांना फक्त "काय विचार करायचा?" हे शिकवून उपयोग नाही; तर "स्वतःच्या विचारांकडे कसं पाहायचं?" हे शिकवणं अधिक महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, माइंडफुलनेस मुलांच्या मनाला शांत करत नाही; तर तो मन हाताळायला शिकवतो. आणि ज्याला स्वतःचं मन हाताळता येतं, त्याला अभ्यास, नाती, भावना आणि आयुष्य या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणं अधिक सोपं होतं. यशस्वी विद्यार्थी तोच नसतो, जो जास्त वेळ अभ्यास करतो; तर तो असतो, जो अभ्यास करताना पूर्णपणे त्या क्षणात उपस्थित असतो.
मन वर्तमानात असेल, तर विचार स्पष्ट होतात. विचार स्पष्ट झाले, तर निर्णय योग्य होतात. योग्य निर्णय उज्ज्वल भविष्य घडवतात. म्हणून मुलांना फक्त गुण मिळवायला शिकवू नका... त्यांना स्वतःच्या मनाशी मैत्री करायला शिकवा. कारण मन जिंकलं की जग जिंकणं कठीण राहत नाही.