'द ऑडिसी’ : नोलनच्या सिनेमॅटिक प्रवासातील उत्तुंग शिखर

हटके

'द ऑडिसी’ : नोलनच्या सिनेमॅटिक प्रवासातील उत्तुंग शिखर

क्रिस्टोफर नोलनच्या ‘द ऑडिसी’चा गणेश मतकरी यांनी घेतलेला वेध. होमरच्या महाकाव्याची आधुनिक मांडणी, युद्धविरोधी दृष्टिकोन आणि आयमॅक्स तंत्रज्ञानाचा भव्य सिनेमानुभव.

Krantiwave 21 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
होमरच्या महाकाव्याला आधुनिक युद्धविरोधी दृष्टी; तंत्र, संहिता आणि मानवी अनुभवातून नोलनने घडवला भव्य सिनेमानुभव

- गणेश मतकरी, प्रख्यात सिनेपरीक्षक, मुंबई

क्रिस्टोफर नोलनचा एक हक्काचा प्रेक्षकवर्ग आहे आणि नोलनचे ‘टेनेट’सारखे तुलनेने कमी यशस्वी चित्रपटही या वर्गाने त्यातल्या संकल्पना अन् सादरीकरणाच्या प्युअर इनोव्हेशनवर आनंदाने स्वीकारले आहेत. या वर्गाला रिव्ह्यूजसाठी थांबण्याची गरज वाटत नाही आणि तो पहिल्या दिवशीच हे चित्रपट पाहायला तयार असतो. मी परवा ‘द ऑडिसी’ पाहिला तेव्हा शो रात्री बाराचा असूनही संपूर्ण भरलेला होता, तो अशा नोलनवर विश्वास असलेल्या प्रेक्षकांमुळेच. आणि ‘ऑपनहायमर’ या गेल्या चित्रपटाप्रमाणेच इथेही नोलनने तो विश्वास सार्थ ठरवून दाखवला आहे.

होमरच्या महाकाव्यातील ‘ऑडिसी’

होमेरिक महाकाव्य असलेल्या ‘ऑडिसी’चं कथानक आपल्या सर्वांना तपशिलात माहीत असेलसं नाही, त्यामुळे त्याची थोडी माहिती आधी घेतली तर चित्रपट पाहताना ते फायद्याचं होईल. थोडक्यात काय घडतं ते सांगायचं तर होमरच्याच ‘इलिअड’मध्ये आलेलं ट्रॉयचं युद्ध संपल्यानंतर आपलं इथाका बेटावरलं घर, आपली पत्नी पेनेलपी आणि पुत्र टेलिमाकस यांच्याकडे परतणाऱ्या वीर ऑडिसीअसला परतीच्या प्रवासात किती प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागतो, याबद्दलची ही कथा आहे.

नोलनकडून आपल्याला नॉन-लिनीअर कथानकांची अपेक्षा असते आणि ‘ऑडिसी’ही नॉन-लिनीअर आहे, पण त्याची रचना ही मुळात होमरनेच तशी केली आहे. चित्रपट सुरू होतो तेव्हा ऑडिसीअस (मॅट डेमन) ॲगामेम्नॉनच्या बाजूने लढण्यासाठी ट्रॉयच्या युद्धावर निघून गेल्याला १८/१९ वर्षांचा काळ उलटला आहे. पेनेलपी या त्याच्या पत्नीवर (ॲन हॅथवे) तिने पुन्हा लग्न करावं असं प्रचंड दडपण आहे. ट्रॉयचं युद्ध संपल्याला दहा वर्षं होत आली तरी न परतलेला ऑडिसीअस जिवंत नसावा, असाच सर्वांचा समज झाला आहे. तिथून आपल्याला कळतं की ऑडिसीअस कुठे हरवला आहे आणि अजून का परतलेला नाही. जशी एकेका प्रश्नाची उत्तरं मिळतात, तसं काय झालं हे आपल्यासमोर उलगडायला लागतं.

ट्रोजन हॉर्सच्या प्रतिमेचा नवा अर्थ

नोलनने ही कथा रिइन्व्हेन्ट केली आहे, तिला आधुनिक संदर्भ देऊन. याचं एक साधं उदाहरण म्हणजे ट्रोजन हॉर्सच्या प्रतिमेचं घेता येईल. ट्रॉयचा पाडाव करण्यासाठी एक युक्ती म्हणून त्यांना भेट करण्यात आलेल्या ट्रोजन हॉर्सची परिचित प्रतिमा आपण सर्वांनी पाहिली आहे. हा घोडा भेट म्हणून नजर करायचा आणि त्यात लपून सैनिकांनी ट्रॉयच्या तटबंदीच्या आत प्रवेश करायचा, ही कल्पना ऑडिसीअसची.

ओळखीच्या प्रतिमेनुसार हा घोडा चार पायांवर उभा असतो आणि त्याला वेशीतून आत नेणं सोपं जावं म्हणून तो चाकांवरही बसवलेला असतो. नोलनने वापरलेली अश्वाची प्रतिमा मात्र याहून संपूर्णपणे वेगळी आहे. हा दोन पायांवर उभा उधळलेला वारू आहे आणि ही प्रतिमा नोलन जे सांगू पाहतोय त्याच्याशी सुसंगत आहे. आपल्या टाचांखाली हजारोंचा जीव घेणारा हा युद्धाचा वारू आहे, चित्रपटातलं एक महत्त्वाचं प्रतीक. युद्ध म्हणजे भयानक चूक हे लक्षात आल्यावरही माणसांचं पुन्हा पुन्हा युद्धाला जवळ करणं, यातली भयानकता आपल्याला चित्रपटाच्या अखेरच्या फ्रेमपर्यंत लक्षात आणून दिली जाते, ती हीच प्रतिमा वापरून.

क्लासिकल कथेकडे आधुनिक दृष्टीने पाहणारा नोलन

नोलनच्या कास्टिंगवर काही प्रमाणात टीका झाली, जरी ते प्रत्यक्षात पाहिलं तर त्यामागचं कारण काही प्रमाणात लक्षात येऊ शकेल. संवादांचं आधुनिक असणं हा त्याच्या थीम्सकडे नव्याने पाहण्याचाच एक भाग आहे. तो कथेकडे क्लासिकल म्हणून न पाहता तिला आजच्या काळाशी जोडतो आहे. एकेकाळी युद्धपटांची निर्मिती ही साहसपटांसारखी होत असे आणि त्यातल्या व्यक्तिरेखा धाडसी नायकांसारख्या हिरीरीने युद्धाला सामोऱ्या जात. हा दृष्टिकोन पुढे बदलत गेला. युद्धपटातल्या नायकांचं शौर्य हे काहीशा अपरिहार्यतेतून येताना दिसायला लागलं. त्यातूनच युद्ध ही घटना या नायकांचं अवघं आयुष्य कसं झाकोळून टाकते, हे पडद्यावर अवतरायला लागलं. नोलनचा ‘ऑडिसी’ या आधुनिक दृष्टिकोनालाच पुढे नेतो. जरी ट्रॉयचं युद्ध हा इथला फोकस नसला तरी ऑडिसीअसची या युद्धावर (आणि परतीच्या प्रवासावर) दवडली गेलेली वीस वर्षं, युद्धात सहभागी इतर वीरांच्या भविष्यावर झालेला परिणाम, त्यांच्या घरांची दैना, मानसिक पडझड, त्यांच्या जीवावर समाजातल्या स्वार्थी घटकांनी चालवलेली चैन, अशा गोष्टी ‘ऑडिसी’चा महत्त्वाचा भाग आहे. इथले नायक रिलक्टन्ट आहेत. सैनिकांचं इथलं चित्रही सज्जन म्हणून केलेलं नाही, तर मोह, द्वेष, मत्सर यांना बळी पडणारी सामान्य माणसं म्हणून करण्यात आलेलं आहे. युद्ध ही त्यांच्या आयुष्यातली चूक आहे आणि मृत्यूनंतरही ते घडलेल्या या चुकीच्या सावलीतून बाहेर आलेले नाहीत. चित्रपटातले अनेक मुद्दे, विशेषतः ऑडिसीअसला जाणवलेलं मूळ युद्धाचं स्वरूप आणि त्याच्या हातून घडलेली घोडचूक (नो पन इन्टेन्डेड) हे चित्रपटाच्या तिसऱ्या अंकात, ऑडिसीअस इथाकाला परतल्यावरच्या काळात स्पष्ट होतात आणि त्यासाठी हा तिसरा अंक फार घटनाप्रधान नसूनही महत्त्वाचा आहे.

तांत्रिकदृष्ट्या नवे पायंडे पाडणारा सिनेमा

नोलनची फिल्म एकाच वेळी तांत्रिकदृष्ट्या नवे पायंडे पाडणारी आणि तरीही ओळखीचे रस्ते टाळणारी असते. ‘द ऑडिसी’ त्याला अपवाद नाही. इथली तांत्रिक बाजू ही ज्या पद्धतीने नोलनने ७० मिमी फिल्म आणि आयमॅक्स तंत्रज्ञान यांचा वापर केला आहे, त्याच्याशी जोडलेली आहे. याबद्दल आपण इंटरनेटवर बरंच वाचू शकतो, पण त्याचा अंतिम परिणाम दाखवू शकणारी चित्रपटगृहं भारतात उपलब्धच नसल्याने आपल्याला साधारण बऱ्या आयमॅक्सवर समाधान मानण्यापलीकडे इलाज नाही. प्रत्यक्ष पडद्यावर गोष्टी दाखवताना मात्र नोलन शक्य तितक्या कमी प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करतो. जे दिसतंय ते शक्य तितकं खरं वाटावं, हा हेतू त्यामागे आहे आणि आपल्या जवळपास दर चित्रपटात त्याने ही स्ट्रॅटेजी वापरली आहे. ‘द ऑडिसी’मध्ये या स्ट्रॅटेजीचा एक वेगळा पैलू दिसतो.

सर्वसामान्यतः असे विषय असणारे चित्रपट वारेमाप व्हीएफएक्स, दृश्यांमध्ये भव्यता आणण्यासाठी घेतलेले पॅनोरॅमिक/एरिअल व्ह्यूज, ड्रोन शॉट्स या गोष्टींचा वापर करतील. अलीकडे बऱ्याच प्रमाणात असं दिसतं की व्हीएफएक्सच्या वाढत्या वापराची आपल्याला सवय होऊन गेली आहे आणि ॲक्टर्सनाही. त्यामुळे भव्यतेचा आभास निर्माण होतो खरा, पण दिसणारी गोष्ट रोमांचक असली तरी खरी नाहीच, हे आपल्याला जाणवतं. असं होऊ नये, सिनेमा माणसांच्या पातळीवर पोहोचावा यासाठी तंत्र आणि संहिता या दोन्हीत नोलनने समांतर बदल केले आहेत.

देवांच्या नव्हे, माणसांच्या पातळीवरची ‘ऑडिसी’

होमरच्या मनातली ऑडिसीअसची कथा ही देवांनी आखलेल्या पटावर घडते. येणारी संकटं, त्यावरची मात, दुर्दैवाचे फेरे, नव्या मार्गावरची वाटचाल, हे ऑडिसीअसच्या आयुष्यात घडत असलं तरी दुरून पाहणाऱ्या देवांच्या नजरेतून ते सतत पाहिलं जातं. त्याच्या आयुष्याचं पुढे काय करायचं, हे देव ठरवतात. नोलन जसं घटनांना अंतरावरून, अवकाशातून दाखवणारे भव्य शॉट्स काढून टाकतो, तसेच अंतरावरून, अवकाशातून पाहणारे देवही तो दूर ठेवतो. त्यामुळे आपण पोहोचतो ते थेट ऑडिसीअससमोर, त्याच्या चमूचा एक भाग असल्यासारखे. त्याच्या नजरेला जे दिसतं तेच आपल्याला दिसतं. याला अपवाद आहे तो अथीना (झेंडेया)च्या वावराचा. जी प्रत्यक्षात देवी आहे. मात्र इथे तिचं दर्शन होतं ते ती ऑडिसीअसच्या मनात असल्यासारखं. त्याचा स्वतःशी चाललेला संवादच जणू अथीनाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडतो. प्रॅक्टिकली, या स्ट्रॅटेजीमुळे क्रूसमोरची संकटं आपल्यासाठी अधिक खरी होतात. आधुनिक युद्धपटासारखेच आपण ॲक्शनचा एक भाग बनतो आणि स्ट्रॅटेजिकली पाहता घडणाऱ्या गोष्टींची जबाबदारी देवांवर घालता येत नाही. हा पट मग माणसांचाच होऊन जातो. त्यांचे गुणदोष, त्यांच्या चुका आणि त्यांची हिंमत यातूनच मग हे कथानक आकार घेतं.

‘ऑपनहायमर’च्याही पुढे जाणारा नोलनचा ‘द ऑडिसी’

‘द ऑडिसी’ हा निःसंशय नोलनच्या उत्कृष्ट चित्रपटांमधला एक आहे, ‘ऑपनहायमर’च्याही तो पुढे आहे. ओटीटीवर पाहण्याचा हा चित्रपट नाही, त्यामुळे थिएटरमध्ये तो आहे तोवर पाहा. तोही आयमॅक्स फॉरमॅटमध्येच.