- विलास जाधव, ऊस विकास अधिकारी / दिलीप पार्लेकर, शेती अधिकारी - क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल
- पाच फुटी सरी म्हणजे नेमके काय?
पारंपरिक ऊस लागवडीत साधारण ४ ते ४.५ फुटांवर सरी घेतली जाते. मात्र पाच फुटी सरी पद्धतीमध्ये एका सरीपासून दुसऱ्या सरीपर्यंत पाच फूट अंतर ठेवले जाते. या पद्धतीत एकरी सरींची संख्या थोडी कमी होत असली तरी प्रत्येक सरीतील उसाला अधिक सूर्यप्रकाश, हवा, अन्नद्रव्ये आणि वाढीसाठी आवश्यक जागा उपलब्ध होते. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर एकरी अंदाजे ८७१२ फूट सरी लांबी उपलब्ध होते. या पद्धतीत एक डोळा टिपरी किंवा दोन रोपांतील अंतर सुमारे १.५ फूट ठेवले जाते. परिणामी एकरी साधारण ५८०८ टिपऱ्यांची आवश्यकता भासते. हे प्रमाण पिकाच्या संतुलित वाढीसाठी महत्त्वाचे मानले जाते.
- फुटव्यांचे गणित : पाया भक्कम तर उत्पादन दमदार
ऊस लागवडीनंतर साधारण ४० ते ४५ दिवसांत फुटवे दिसू लागतात. पुढील दीड ते दोन महिन्यांत हे फुटवे उसामध्ये रूपांतरित होतात. म्हणून सुरुवातीच्या काळातील फुटव्यांची संख्या हा उत्पादनाचा पाया असतो. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या भरणीवेळी एकरी किमान ५५ ते ६० हजार फुटवे असणे आवश्यक आहे. त्यानंतर रोग, कीड, पाणीअभाव, वाढीतील स्पर्धा किंवा इतर कारणांनी काही फुटवे कमी झाले तरी अंतिमतः सुमारे ४५ हजार गाळपायोग्य ऊस मिळू शकतो. पाच फुटी सरीत हवा व प्रकाश उत्तम मिळाल्याने फुटव्यांची वाढ अधिक जोमदार होते आणि प्रत्येक कोंबाला सक्षम वाढीची संधी मिळते.
- सूर्यप्रकाश आणि खेळती हवा : वाढीमागील दोन प्रमुख शक्ती
पाच फुटी सरीचा सर्वात मोठा वैज्ञानिक फायदा म्हणजे प्रकाशसंश्लेषणाची वाढलेली क्षमता. उसाच्या प्रत्येक पानाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास अन्ननिर्मिती अधिक प्रभावी होते. दाट लागवडीत खालच्या पानांना प्रकाश कमी मिळतो; परिणामी वाढ खुंटते. रुंद सरीमुळे पिकात खेळती हवा राहते. यामुळे आर्द्रता कमी होऊन बुरशीजन्य रोगांचे प्रमाण घटते. पानांवरील ओलावा लवकर सुकतो. परिणामी रोगनियंत्रण खर्च कमी होण्यास मदत होते.
- आंतरमशागत सुलभ : यांत्रिकीकरणाला चालना
आजच्या शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे मजूरटंचाई. अशा परिस्थितीत पाच फुटी सरीत लहान किंवा मोठ्या ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत सहज शक्य होते. खुरपणी, कोळपणी, खत व्यवस्थापन, तणनियंत्रण आणि फवारणी अधिक कार्यक्षमतेने करता येते. यांत्रिक तोडणीच्या दृष्टीनेही रुंद सरी उपयुक्त ठरतात. ऊस तोडणी यंत्रांना पुरेशी जागा मिळाल्याने भविष्यातील यांत्रिक शेतीसाठी ही पद्धत अधिक व्यवहार्य आहे.
पाच फुटी सरी पद्धतीमध्ये ठिबक सिंचन अधिक परिणामकारक ठरते. सरीतील अंतर संतुलित असल्याने पाण्याचे नियोजन अचूक करता येते. प्रत्येक रोपाला आवश्यक तेवढेच पाणी मिळाल्याने पाण्याची बचत होते. अति पाणी टाळल्याने मुळांची कार्यक्षमता टिकते. विशेषतः पाणीटंचाईच्या भागात ही पद्धत वरदान ठरू शकते. पाण्याचा प्रत्येक थेंब उत्पादनवाढीसाठी वापरण्याची क्षमता या प्रणालीत अधिक असते.
- खत व्यवस्थापन आणि पोषण कार्यक्षमता
रुंद सरीमुळे ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर सुलभ होतो. खत थेट मुळांपर्यंत पोहोचते. यामुळे खतांचा अपव्यय कमी होतो आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळते. माती परीक्षणावर आधारित अचूक पोषण व्यवस्थापन शक्य होते.
खोडवा पिकामध्ये पाचट आच्छादन, सरी स्वच्छता आणि फुटव्यांचे पुनर्नियोजन अधिक सोपे होते. त्यामुळे पुढील हंगामातील उत्पादन क्षमता सुधारते. खोडवा पिकाच्या यशासाठी प्रारंभिक सरी रचना महत्त्वाची असते आणि पाच फुटी अंतर या दृष्टीने प्रभावी ठरते.
ऊस लागवडीत यश मिळवण्यासाठी केवळ क्षेत्र वाढवणे पुरेसे नसून प्रतिएकर उत्पादनक्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. पाच फुटी सरी पद्धती शेतकऱ्याला अधिक फुटवे, अधिक सूर्यप्रकाश, अधिक यांत्रिकीकरण, अधिक पाणीबचत आणि अधिक आर्थिक शाश्वतता देऊ शकते. योग्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन, संतुलित खत योजना आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या साहाय्याने पाच फुटी सरी ही ऊस उत्पादनातील नवा मापदंड ठरू शकते. आजच्या बदलत्या कृषी वास्तवात प्रश्न फक्त ऊस लावण्याचा नाही, तर कमी खर्चात अधिक सक्षम ऊस उभा करण्याचा आहे. आणि त्या दिशेने पाच फुटी सरी ही अनेक शेतकऱ्यांसाठी प्रगतीची प्रभावी वाट ठरू शकते.
तज्ज्ञांच्या सूचनांनुसार एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच फुटी सरी अत्यंत उपयुक्त आहे. शेताची लांबी १०० फुटांपेक्षा कमी असल्यास ४.५ फुटी सरीही पर्याय असू शकते. एकरी संख्या नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि नियमित निरीक्षण करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी ५ ते ६ फुटी सरी अधिक फायदेशीर.
पाच फुटी सरी घेताना केवळ अंतर वाढवणे पुरेसे नाही. योग्य बियाणे, दर्जेदार टिपरी, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर पाणी, रोगनियंत्रण आणि फुटव्यांचे अचूक नियोजन आवश्यक आहे. चुकीच्या व्यवस्थापनामुळे रुंद अंतराचा अपेक्षित फायदा कमी होऊ शकतो.
- कमी खर्चात जास्त परतावा शक्य
पाच फूट सरीमुळे तणनियंत्रण, फवारणी, मजुरी आणि पाणी व्यवस्थापनातील बचत यामुळे निव्वळ नफा वाढण्याची शक्यता असते. उत्पादन वाढीसह खर्च नियंत्रण हेच या पद्धतीचे खरे बलस्थान आहे. म्हणजेच “जास्त ऊस” इतकेच नव्हे, तर “किफायतशीर ऊस” हा या पद्धतीचा मुख्य लाभ आहे. शेतकऱ्यांनी आता याचा गांभिर्याने अवलंब करण्याची गरज आहे.
- संशोधन, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांची मानसिकता
अनेकदा शेतकरी पारंपरिक पद्धती सोडण्यास संकोच करतात; मात्र वाढते उत्पादन खर्च आणि बदलते हवामान पाहता वैज्ञानिक शेती स्वीकारणे अपरिहार्य बनले आहे. पाच फुटी सरी ही एखादी फॅशन नसून, ऊस शेतीच्या बदलत्या अर्थकारणाला उत्तर देणारी व्यावहारिक रणनीती आहे.