नीट-जेईईपेक्षा करिअरच्या नव्या वाटा

नोकरी

नीट-जेईईपेक्षा करिअरच्या नव्या वाटा

देशभरात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच नीट आणि जेईई याभोवती निर्माण झालेलं प्रचंड दडपण लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. अलीकडच्या काळात प्रश्नपत्रिका गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, वाढती स्पर्धा, कोचिंग उद्योगाचे व्यापारीकरण आणि मर्यादित जागा या सर्वांनी या प्रश्नाला अधिक गंभीर बनवलं आहे. दहावी संपल्यानंतर अक्षरशः दोन ते तीन वर्षे आयुष्याचा प्रत्येक क्षण या परीक्षांसाठी झोकून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांवर जेव्हा अन्यायाचा सावट पडतं, तेव्हा हा प्रश्न केवळ गुणांचा राहत नाही; तो आयुष्य, आत्मविश्वास आणि मानसिक संतुलनाचा बनतो.

Krantiwave 17 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ, पुणे
  • स्पर्धा की अंधस्पर्धा?
दरवर्षी नीट परीक्षेला २० ते २५ लाख विद्यार्थी बसतात, परंतु एमबीबीएसच्या जागा सुमारे एक लाखांच्या आसपासच असतात. म्हणजेच बहुसंख्य विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रवेश मिळत नाही. जेईईमध्येही परिस्थिती फार वेगळी नाही. आयआयटी, एनआयटी किंवा  प्रतिष्ठित  संस्थांची संख्या मर्यादित आहे; परंतु तयारी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परिणामी लाखो विद्यार्थी दोन-दोन वर्षे अथक परिश्रम करूनही अपेक्षित यशापासून दूर राहतात. या प्रक्रियेत आर्थिक गुंतवणूकही अफाट असते. मोठ्या शहरांतील  कोचिंग  संस्था, वसतिगृह, अध्ययन साहित्य, चाचण्या, मानसिक ताण - या सर्वांचा भार मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठ्या प्रमाणात पडतो. अनेक पालक मुलांच्या भवितव्यासाठी सर्वस्व  पणाला  लावतात; पण शेवटी यशाची व्याख्या फक्त एका परीक्षेच्या गुणांमध्येच मर्यादित राहते. प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते. शिक्षणव्यवस्थेतील मोठी उणीव म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापाने मोजण्याची वृत्ती. प्रत्येक मुलाचा मेंदू, आवड, कौशल्य आणि क्षमता वेगळी असते. कोणाला विज्ञानात गती असते, कोणाला सामाजिक विज्ञानात, कोणाला संवादकौशल्यात, कोणाला संशोधनात, तर कोणाला प्रत्यक्ष कौशल्याधारित कामात. परंतु समाजात अजूनही “हुशार म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर” ही मर्यादित व्याख्या अनेक कुटुंबांना चुकीच्या दिशेने ढकलते.
  • एक वेगळा मार्ग : लिबरल आर्ट्स
आज भारतातही बहुविषयक शिक्षणपद्धती वेगाने पुढे येत आहे. सिम्बायोसिस, अशोका, फ्लेम, अझीम प्रेमजी, जेआयएनडीएएल यांसारख्या संस्थांमध्ये “मुक्त कला शिक्षण” (लिबरल आर्ट्स) किंवा बहुविषयक पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, डेटा विश्लेषण, संवादशास्त्र अशा विविध क्षेत्रांचा समतोल अभ्यास देतात. या शिक्षणपद्धतीत: संशोधन पद्धतीचे शिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण (इंटर्नशिप), प्रबंध लेखन, चिकित्सक विचारशक्ती, नेतृत्वगुण, उद्योजकता यांना महत्त्व दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थी एका चौकटीत अडकत नाही, तर विविध क्षेत्रांत स्वतःचा मार्ग निवडू शकतो.
  • जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, माहितीशास्त्र, नर्सिंग, कौशल्याधारित शिक्षणात मोठ्या संधी
आज जैवतंत्रज्ञान, जैव-संगणकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरणशास्त्र, कृषितंत्रज्ञान, नर्सिंग, फार्मसी, मानसशास्त्र, आहारशास्त्र, फिजिओथेरपी, व्यावसायिक कौशल्य शिक्षण (आयटीआय), परदेशी भाषा, लॉजिस्टिक्स, पर्यटन, डिजिटल विपणन, चित्ररचना, माध्यमशास्त्र अशा असंख्य क्षेत्रांत जागतिक स्तरावर प्रचंड संधी उपलब्ध आहेत. विशेषतः आयटीआय आणि कौशल्याधारित शिक्षण भारत सरकारच्या कौशल्य भारत अभियानांतर्गत इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीन ऑपरेशन, ऑटोमोबाईल, वेल्डिंग, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षित युवकांना देशांतर्गत आणि परदेशात मोठी मागणी आहे. नर्सिंग : जागतिक आरोग्य संघटना आणि विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार प्रशिक्षित नर्सेसची जगभर मोठी कमतरता आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी हे आशादायी क्षेत्र आहे. संशोधन व परदेशी शिक्षण : जर्मनी, सिंगापूर, जपान, नेदरलँड्स, स्वीडन, कॅनडा यांसारख्या देशांत गुणवत्तापूर्ण पदव्युत्तर आणि पीएच.डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मानधन आणि संशोधन अनुदानाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे वास्तव 
एमबीबीएसनंतर पदव्युत्तर प्रवेश, सुपरस्पेशालिटी, अनुभव आणि स्वतंत्र व्यवसाय उभा करण्यासाठी अनेकदा १२ ते १५ वर्षे लागतात. अभियांत्रिकीमध्येही उच्च संस्थांतील मोजक्या विद्यार्थ्यांनाच चांगला पगार मिळतो; बाकींसाठी स्पर्धा कायम असते. त्यामुळे “ग्लॅमर” आणि “प्रतिष्ठा” यापलीकडे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. उत्पादन, संशोधन, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, आरोग्यसेवा, शेतीमूल्यवर्धन, जैवतंत्रज्ञान, डिजिटल सेवा, उद्योजकता या क्षेत्रांत पुढील दशक सुवर्णसंधी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पगाराच्या मागे न लागता उद्योग, नवोपक्रम आणि रोजगारनिर्मितीचाही विचार करावा.
  • आता काय करायला हवे? 
  • शालेय स्तरावर करिअर मार्गदर्शन सक्तीचे करणे : दहावीपासून विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय मूल्यमापन, आवड-क्षमता चाचण्या आणि विविध करिअर पर्यायांची माहिती देणे. पालकांसाठी करिअर साक्षरता : समाजमान्यतेपेक्षा मुलांच्या नैसर्गिक क्षमतांना प्राधान्य द्यावे. कौशल्य विद्यापीठे आणि उद्योगसंलग्न शिक्षण : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार बहुविषयक शिक्षण आणि कौशल्याधारित पदवी अभ्यासक्रम वाढवणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य सहाय्य : स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान समुपदेशन, भावनिक सहाय्य आणि अपयश व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. “एक परीक्षा - एकच भविष्य” ही मानसिकता मोडणे :  यश म्हणजे केवळ प्रवेश परीक्षा नव्हे; तर समाधान, स्थैर्य, कौशल्य आणि अर्थपूर्ण जीवन.