- मोहन यादव, वरिष्ठ पत्रकार, सांगली-कोल्हापूर
एकाने विचारलं, मैदानात उतरण्यापूर्वी तू काय तयारी करतोस. हे १५ वर्षांचं पोरगं निरागसपणे म्हणतंय, कुछ नहीं...मी बॅटिंगला जायच्या आधी कार्टून्स बघतो. वयच आहे त्याचं कार्टून्स पाहण्याचं. प्रत्येक मोठ्या लिजेंडरी बॉलर्सना सिक्स मारायचं आधीच ठरवलं होतं का असं विचारलं तर... म्हणतोय, नहीं.. यश भय्याने (यशस्वी जयस्वाल) कहा, चलो वैभव आज मारते है... तो जाके बस खेल दिये.! जसप्रीत बुमराहला टोलवल्यावर म्हणतो, जस्सी सर को खेलनेका मेरा ड्रीम था. लेकीन सिक्सर बैठ गयी. जणू याने काही चूक केली असावी! ख्रिस गेलचा आयपीएलचा १७५ धावांचा रेकॉर्ड त्याला तोडायचा आहे. आत्ताची त्याची फलंदाजी पाहता, तो खेळणी तोडावी तसे रेकॉर्डस तोडेल असे वाटते.! मैदानात जायच्या आत, पॅव्हेलियनमध्ये भेटेल त्या वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला हे पोर पाया पडतंय. अगदी कॉमेंटरर भेटले तरी त्यांच्या पाया पडतंय.! संस्कार दिसतात.मैदानात मात्र शांत, पण अत्यंत कणखर वैभव सूर्यवंशी पहायला मिळतो. त्याचा अत्यंत निरागस निष्पाप गोड चेहरा चेंडूला फटकविण्यासाठी मात्र भेदक दिसतो. आणि त्याचा अत्यंत ताकदीने टोलविलेला चेंडू सीमापार षटकार असतो. आयपीएलमध्ये मारलेल्या पहिल्या वहिल्या शतकामध्ये तब्बल बारा षटकार असतात. एखादा चौकार असतो. दोन पाच धावा धावून काढलेल्या असतात. आपल्या विदर्भाच्या चर्चित गोलंदाजाने प्रफुल्ल हिंगेने आधीच्या सामन्यात वैभवला शून्यावर परत पाठवले होते. परवा त्यानं त्याची सव्याज परतफेड केली. प्रफुल्लच्या पहिल्याच चार चेंडूंना लागोपाठ चार षटकार मारले.प्र फुल्लला कॅप्टनने बंद केला. पुढच्या सत्रात पुन्हा आलेल्या प्रफुल्लला त्याने पुन्हा ढगात स्टेडियममध्ये पाठवले. हिशेब बाकी ठेवत नाही हे पोरगं.ऑस्ट्रेलियाला जगज्जेता बनवणारा कप्तान, बुद्धिमान वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, हैदराबादचा कप्तान बनूनच मैदानात उतरतो. पॅट कमिन्सच्याही पहिल्याच बॉलला वैभव आसमान दाखवतो. मॅच संपल्यावर त्याला वैभवबद्दल विचारल्यावर कमिन्स हसून सांगतो, माझ्या फेवरेट क्रिकेटर्समध्ये आज आणखी एकाचा समावेश झाला आहे. मॅच संपल्यावर शेकोटीसमोर बसल्यासारखं खाली बसलेलं हे पोरगं, शतकाबद्दल विचारल्यावर म्हणतंय मजा आली, पण सॉरी माझ्या चुकीच्या फटक्यामुळे मी उगाचच लवकर बाद झालो. त्यामुळे आमच्या संघाला वीस पंचवीस धावा कमी पडल्या. आम्ही जिंकलो असतो, अशी कबुली देतो. संघाच्या विजयाला प्राधान्य देतोय हा गोड गोरा लाल गुबगुबीत, पापी घ्यावी असे वाटणारा, चालताना डौलाने चालणारा. वंडर बॉय वैभव सूर्यवंशी.आई बापाबद्दल बोलतांना कमालीचा हळवा होतो वैभव. सामान्य घरातलं पोरगं आहे. पप्पाने बहोत सपोर्ट किया. इसलिये मैं आज यहाँ हूं, असे स्पष्ट सांगतो. पहाटे प्रॅक्टीसला जाताना, आई गरम गरम डबा करून द्यायची असे सांगून मातेचे ऋण व्यक्त करतो.! अद्याप तरी त्याला कसल्याही दर्पाने, अहंने स्पर्श केलेला नाही. एकदम जमिनीवर आहे पोरगं.! सगळ्या तरुण टॅलेंटेड भारतीय खेळाडूंमध्ये हे पोरगं पाण्यात दूध मिसळावं तसं मिसळतंय. कुणीही त्याला स्पर्धक समजत नाहीत. उलट आपलेपणाने जवळ घेतात त्याला. त्यांच्याशी मज्जा मस्ती करतंय.! आयपीएलमध्ये आलेले सारे आंतरराष्ट्रीय खेळाडू याला स्पेशल चाईल्ड म्हणताहेत.! देशाला नवा वंडर बॉय... दुसरा सचिन तेंडुलकर नव्या रूपात मिळतोय.!!