वाढतं वजन, वाढता बाजार

फीचर्स

वाढतं वजन, वाढता बाजार

आधुनिक जीवनशैलीत लठ्ठपणा हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न राहिलेला नाही; तो जागतिक अर्थकारण, उपभोगवाद, जाहिरातशक्ती आणि औषधउद्योग यांच्या संगनमतातून निर्माण झालेलं एक व्यापक सामाजिक वास्तव बनला आहे. एका बाजूला अब्जावधी डॉलरचा अन्नोद्योग माणसाला अधिकाधिक खाण्यास प्रवृत्त करतो, तर दुसऱ्या बाजूला वजन कमी करणाऱ्या औषधांचा प्रचंड उद्योग त्याच माणसाला पुन्हा सडपातळ करण्यासाठी सज्ज असतो. बदलती जीवनशैली, बैठं काम, तणाव, सततचा जाहिरातींचा मारा आणि चटकदार उपभोगसंस्कृती यामुळे माणूस नकळत या चक्रात अडकत जातो.

Krantiwave 17 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
  •  निळू दामले, ज्येष्ठ लेखक, मुंबई
कुवैतमध्ये 45 टक्के माणसं ‘वजनदार’ आहेत, अमेरिकेत 42 टक्के, तर भारतात 7 टक्के माणसं वजनदार आहेत. उत्तर कोरियात फक्त 1 टक्का माणूस लठ्ठ आहे. भारतात दर एक लाख लोकसंख्येमागे 30 जण लठ्ठपणामुळे मरतात. अमेरिकेत हे प्रमाण एक लाखामागे 55 आहे, तर सौदी अरेबियात ते तब्बल 158 आहे.जगभर दोन उद्योग प्रचंड वेगाने चालतात - अन्नोत्पादक आणि औषधोत्पादक. पहिला उद्योग लोकांना लठ्ठ करतो; दुसरा त्यांना सडपातळ करतो. दोघांची मिळून एक मोठी टोळीच तयार होते. माणसं खातात, पचवतात; पण आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न शरीरात साठत राहतं. स्त्री-पुरुष, वय, उंची, जीवनशैली यानुसार योग्य वजन ठरतं; त्या मर्यादेपेक्षा जास्त वजन म्हणजे लठ्ठपणा.जिना चढताना आपण पन्नास किलो वजन खांद्यावर घेतलं, तर काय अवस्था होईल? शरीरावर अतिरिक्त वजन म्हणजे हृदयावर अधिक ताण. रक्तदाब वाढतो. डॉक्टर सांगतात की वजनवाढीमुळे विशिष्ट प्रकारचा मधुमेह, हृदयरोग आणि अनेक व्याधी वाढतात. अती लठ्ठपणामुळे मृत्यूही ओढवू शकतो. अलीकडच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढतो आहे. माणसं जास्त वेळ बसून असतात. चालणं, पळणं, श्रम करणं कमी झालं आहे. स्वयंपाक, धुणी, बागकाम, साफसफाई, जिने चढणं - दैनंदिन आयुष्यातील सहज हालचाली  कमी झाल्या आहेत. काम आहे, पण बहुतेक वेळा बैठं काम. शेती आणि उद्योगातील श्रमिक हा अपवाद.तणाव ही दुसरी मोठी कारणश्रृंखला आहे. पैसे कमावण्याचा ताण, खर्चाचा ताण, स्पर्धा, असुरक्षितता - या सगळ्यांत माणूस अधिक खातो, अधिक पितो. चटकदार, तेलकट, गोड, खारट पदार्थांकडे ओढा वाढतो. मीठ, साखर, तेल… आणि वजन वाढत जातं. क्रिकेट सामने, टीव्ही कार्यक्रम, मालिका, रिअॅलिटी शो - सर्वत्र जाहिरातींचा मारा आहे. खेळ कमी आणि विक्री अधिक. खेळाडूंच्या जर्सीपासून स्टेडियमपर्यंत, टीव्ही स्क्रीनपासून मोबाईल रील्सपर्यंत सर्वत्र जाहिराती. करोडो रुपये खेळासाठी नव्हे, तर ग्राहकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी खर्च होतात.मैदानावर 25 खेळाडू खेळतात; पण टीव्हीसमोर कोट्यवधी प्रेक्षक बसून चटकदार पदार्थ खात राहतात. मालिका, क्रिकेट, सण, धार्मिक कार्यक्रम - प्रत्येक गोष्ट खाद्यसंस्कृती आणि उपभोगाशी जोडली जाते. चकल्या, लाडू, श्रीखंड, चिवडा, मोदक, केक, हलवे… प्रत्येक पदार्थासोबत जाहिरातींचा पाऊस. आज जगातील अन्नउद्योग सुमारे 10 ट्रिलियन डॉलरचा आहे. आधी वजन वाढवा… मग ते कमी करण्यासाठी दुसरा उद्योग तयार आहे. भूक कमी करणारी औषधं, इंजेक्शन्स, गोळ्या, हार्मोन नियंत्रक उपचार - वजनकपातही आता मोठा बाजार झाला आहे.एका औषधामुळे वजन 10 टक्क्यांनी कमी होतं; दुसरी कंपनी 20 टक्के कमी करणारी औषधं आणते. रोजची गोळी, आठवड्यातून एक इंजेक्शन, महिन्यातून एक डोस -बाजार सतत नवं उत्पादन आणतो. वजन कमी करण्यासोबत हृदयरोग, मधुमेह, इतर व्याधींवरही फायदे सांगितले जातात.Eli Lilly या कंपनीने वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 25 अब्ज डॉलर कमावले, तर Novo Nordisk ने 23.5 अब्ज डॉलर. Eli Lilly ची बाजारमूल्य आता 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे.