- उचिता थोरवत- संत, कंटेंट क्रिएटर, मुंबई
काही गोष्टी मनात साचवून ठेवण्यापेक्षा त्या वाहत्या पाण्यासारख्या सोडून देण्यातच खरा शहाणपणा असतो. काल असंच काहीसं घडलं. माझ्या सासूबाई माझ्याबद्दल काहीतरी वेडंवाकडं बोलल्याचं चुलत सासूबाईंनी मला येऊन सांगितलं आणि क्षणार्धात डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. मुळात मला अतिविचार करायची एक घाणेरडी सवय आहे, त्यामुळे ते शब्द एखाद्या तीक्ष्ण शस्त्रासारखे माझ्या मनावर खोल जखमा करत राहिले. कोणाचं तरी बोलणं काळजात इतकं कसं आरपार घुसू शकतं, याच विचाराने मी अस्वस्थ झाले. पण मग एका क्षणी मी स्वतःला सावरलं. मी ठरवलं की, आता कोणासमोरही स्वतःला सिद्ध करत बसण्याची मला गरज नाही. शेवटी काळ हा सगळ्यात मोठा न्यायाधीश असतो आणि तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य वेळी देतोच, हा विश्वास मी जागा केला. तो विषय मी तिथेच मनातून झटकून टाकला आणि काय आश्चर्य, 3, 4 तास हरवलेली माझी मनःशांती मला पुन्हा गवसली. जर मी तो विषय ताणला असता, तर विनाकारण पूर्ण घरादाराला त्रास झाला असता आणि त्याचा जास्त मनस्ताप पुन्हां माझ्याच पदरी पडला असता. त्या एका ‘सोडून देण्याच्या' निर्णयाने मला स्वतःचीच ओळख नव्याने करून दिली. खरं सांगू का, आपलं मन ना अगदी एखाद्या जुन्या कपाटासारखं असतं. आपण त्यात हव्या-नको असलेल्या गोष्टी, जुन्या आठवणी, कोणाचे तरी टोमणे आणि मनाला लागलेले चटके इतके गच्च भरून ठेवतो की नवीन आनंदासाठी तिथे जागाच उरत नाही. आपल्याला वाटतं की या गोष्टी घट्ट धरून ठेवणं म्हणजे आपली ताकद आहे, पण खरं तर कधी कधी ‘सोडून देणं' हीच सगळ्यात मोठी ताकद असते.
एखादा जुना अपमान किंवा भूतकाळातली चूक आपण वर्षानुवर्षं उराशी बाळगतो. तो प्रसंग घडून उलटून गेलेला असतो, पण आपण मात्र तीच जखम पुन्हा पुन्हा कुरतडत बसतो. हे म्हणजे हातामध्ये जळता कोळसा धरून ठेवण्यासारखं आहे; तो समोरच्याला जाळण्याआधी आपलाच हात होरपळून काढतो. म्हणूनच, जेव्हा आपण ठरवतो की "बस, आता हे माझ्या मनातून काढून टाकायचंय", तेव्हा कुठे तरी त्या ओझ्यापासून आपली सुटका होते. सोडून देण्याचा अर्थ पराभव स्वीकारणं असा कधीच नसतो, तर स्वतःला त्या जाचातून मुक्त करणं असा असतो.

कधी कधी आपण माणसांना आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांना इतकं घट्ट धरतो की त्यातून फक्त गुंता वाढत जातो. प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असावं, समोरच्याने आपल्या मनासारखंच वागावं हा हट्ट जेव्हा आपण बाजूला सारतो, तेव्हा मनावरचा एक प्रचंड ताण हलका होतो. नदीचं पाणी कसं असतं-समोर दगड आला तरी त्याला वळसा घालून ते शांतपणे पुढे जात राहतं. ते दगडाशी भांडत बसत नाही, म्हणूनच ते प्रवाही असतं. आपलं आयुष्यही असंच प्रवाही हवं.ज्या गोष्टी आपल्याला वेदना देतात, ज्या आठवणी आपल्या डोळ्यांत पाणी आणतात आणि जे विचार आपल्याला रात्री झोपू देत नाहीत, त्यांना सन्मानाने निरोप द्यायला शिकायला हवं. जेव्हा आपण एखादी गोष्ट सोडून देतो, तेव्हाच निसर्ग आपल्या रिकाम्या झोळीत काहीतरी नवीन आणि सुंदर टाकण्यासाठी जागा शोधतो. गळून पडलेलं पान झाडाला कधीच दुःखी करत नाही, कारण त्याला माहिती असतं की आता नवीन पालवी फुटणार आहे.