‘तो’ आणि  ‘ती’

हटके

‘तो’ आणि ‘ती’

‘ती’ आणि ‘तो’ यांच्या मधील नातेसंबंधाच्या जुळवून न घेण्याच्या विकारामुळे अनेक मानसिक विकार उद्भवतात. म्हणूनच त्याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक असते. या विकारासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे सायकोथेरपी व काऊंसेलिंग होय. नात्याला जेव्हा अनेक कारणांची बाधा होते तेव्हा ते रोगट बनते. नात्याचा रोग बरे करणे हे जर आपल्या डोक्यात असेल तर निर्माण होणाऱ्या कारणांना सक्षमपणे तोंड देण्याची मानसिकता आपण घडविणे व रॅशनल होणे हा उपाय महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांनी करावा.

Krantiwave 17 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
  • डॉ. प्रदीप पाटील, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सांगली
तो आणि ती यांचं नात्यांचं जग आज स्पष्टपणे अधोरेखित होत चाललेलं आहे... तो आणि ती वयात आल्यानंतर प्रेमात पडणे हे जैवविज्ञानिक आहे. बायोलॉजिकल आहे. तो वयात आल्यानंतर बहुसंख्य वेळ सेक्सविषयी विचार करण्यात घालवत असतो.  आणि ती आपला पार्टनर आपल्या आयुष्याला आधार देणारा व काळजी घेणारा असावा या शोधात राहते.  तो ऑनलाइन पोर्नोग्राफीमध्ये व्यस्त असतो. चॅटिंग आणि सेक्स रूम यामध्ये लपून-छपून अनेक स्त्रियांशी बोलतो. ऑनलाइन व्हर्चुअल किंवा आभासी सेक्सचा आनंद घेत राहतो. त्याला फक्त लैंगिक टाइमपास हवा असतो. गंभीर नात्यात शिरायची तयारी अजून झालेली नसते. पण प्रेमात पडल्यानंतर हीच मानसिकता बदलते. त्याला ती आवडते. तिच्याबरोबरचं नातं रोमँटिक बनतं. सेक्स गरजेचा आणि समाधान देणारा होतो.  ती मात्र स्थिर नातं देणारा कायमचा आणि योग्य व्यक्ती जो लग्नानंतर दीर्घकाळ साथ देईल अशा विचारात त्याच्याबरोबर प्रेमात राहते.  तो आणि ती यांच्यामधील ही असलेली तफावत जेव्हा प्रेम करण्यापासूनच सुरू होते तेव्हा ती पुढे लग्नानंतर हळूहळू रुंदावत जाते. तिला माया आणि आपुलकी महत्त्वाची वाटते तर त्याला सामाजिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या नीटनेटक्या कराव्यात यात गुंतणे महत्त्वाचे वाटते. 
  • दोघांच्या दोन दिशा फुटतात 
लग्न झाल्यानंतर तो कॉम्प्युटर, टीव्ही, सामाजिक-राजकीय-खेळांच्या बातम्या आणि काम या वाटेवरनं चालू लागतो. आणि ती? कुटुंब, नातीगोती, मुलं, आणि असेल तर करियर यात गुंतून जाते. एकमेकांबद्दलची आपुलकी आणि प्रेम हे फक्त शाब्दिक स्तरावर उरते. आणि मनाने वेगळे होणे अपरिहार्य बनू लागते. अनेक मतभेदांचे विषय प्रेमाची जागा घेतात! आरोपांच्या फैऱ्या सुरू होतात आणि नात्यांमध्ये सुरू होतो.. ताण.  स्ट्रेस... हा आजकालच्या जमान्याचा गळ्यात स्वतःहून बांधून घेतलेला ओंडका असतो. घराघरात  या  ताणाचे थैमान इतक्या वेगाने सुरू आहे की अनेक रोगांचा हार गळ्यात केव्हा पडतो तेच समजत नाही. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आणि मानसिक विकृती या रोगांचे हार म्हणजे आजच्या सर्वांच्या जीवनशैलीचे  दुत्काराचे प्रतीक बनले आहेत. पण हे नातं पुढे वळण घेत आपल्यावरच उलटतं तेव्हा नात्यांवरचा विश्वास उडतो. निर्माण झालेल्या विविध कारणांच्या ताणांचा परिणाम एकमेकांशी जुळवून घेण्यावर होऊ लागतो. त्यातून  जुळवून  न  घेण्याविषयीचे विकार उद्भवू लागतात.  ज्यांना ॲडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतात.  नातं आता एका विचित्र वळणावर आलेलं आहे ज्याची आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नसते ते पाहून निराशा निर्माण होते. आणि डिप्रेशन सुरू होते. स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत  याच्या बळी ठरतात. अशावेळी नात्यात काय उरलेलं असतं याचा शोध घेतला तर...भरून राहिलेलं दुःख, पसरून राहिलेली निराशा, हरवून गेलेला आनंद, अश्रूंचे अचानक कधीही सुरू होणारे झरे, भीतीची पसरलेली छाया, उरात भरून राहिलेले अपेक्षाभंगाचे व प्रेमभंगाचे ओझे.  आणि संपवावे सारे सगळे असे रोज रोज नाचणारे विचार! ॲडजस्टमेंट डिसऑर्डर या विकाराचे सहा प्रकार पडतात. काहीजण निराश मूड घेऊन वावरत राहतात. नात्यांमधले ताणतणाव डिप्रेशन मध्ये ठेवतात. हा पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये काळजी सुरू होते. नात्याची, नात्याच्या भविष्याची, नात्यातल्या व्यक्तींची आणि स्वतःची. ही काळजीची काजळी नातं काळवंडून टाकते. अशावेळी काळजी विकृतीचे शिकार आपण बनले आहोत हेही कळत नाही.  तिसऱ्या प्रकारात डिप्रेशन आणि काळजी एकाच वेळी घेऊन आपण वावरत असतो. चौथा प्रकार असा असतो की जेथे आपण विकृतपणे वागत आहोत हेच लक्षात येत नाही. पाचव्या प्रकारात भावनांचा उद्रेक आणि असंतुलन सुरू होते आणि भावनेच्या भरात अनेक गंभीर इजा पोहोचवणाऱ्या कृती घडू लागतात. सहाव्या प्रकारात वरीलपैकी कोणतीही लक्षणे अधेमधे आळीपाळीने येत जात राहतात. नात्यांमध्ये अशा रितीने विकारांचा उदय होणे यामागे असंख्य वेगवेगळी कारणे आजअखेर आढळून आलेली आहेत. सून-सासू संबंध, मुलगा-वडील संबंध, सून-सासरा संबंध, बॉस आणि त्याचे अरेरावीपण, सहकारी आणि त्याचे राजकारण, जवळच्या आपुलकीच्या व्यक्तीचा मृत्यू होणे, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, आर्थिक नुकसान, आयुष्यभर छळणारे रोग, प्रेमभंग, नोकरी जाणे किंवा व्यवसाय बुडणे, आई-वडिलांचे वेगळे होणे, शाळा-कॉलेजात निर्माण होणाऱ्या समस्या, लैंगिक संबंध संपणे, वगैरे वगैरे.  अशी असंख्य कारणे जरी असली तरीही त्या कारणांचा निरास होणे जर घडले नाही तर नात्यातील विकृत ताण हा आयुष्यभर छळत राहतो. या कारणांचा समाचार घेऊन त्यांना व्यवस्थित हाताळणे ज्यांना जमते ते परिस्थितीला जुळवून घेतात आणि नातं वाचवतात.

  • जेव्हा जुळवून घेता येत नाही...  

नातं जुळवून घेऊ शकलो नाही या निराशेपोटी आत्महत्या होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खास करून उमलत्या वयात जेव्हा असे घडते तेव्हा जवळपास २५% आत्महत्या या वयात घडतात. त्याचे कारण त्यांना नेमक्या कोणत्या ताणांच्या विषयाने घेरले आहे हे लक्षात येत नाही. आणि त्याला तोंड कसे द्यायचे याविषयी तोडकी माहिती असते.  जेव्हा परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही तेव्हा व्यसनाच्या आहारी जाणे घडते. विशेष करून दारू पिणे, गुटखा-मावा खाणे, आणि ड्रग्ज घेणे हे आज कॉमन बनलेले आहे. याशिवाय संतापणे, आणि काहीही शिकण्याची इच्छा नाहीशी होणे, वगैरे अनेक प्रश्न घेरतात. आपल्याला न जुळवून घेण्याचा विकार झालेला आहे का यासाठी निदान करणे आवश्यक असते व हे काम डायग्नोस्टिक व स्टॅटिस्टिकल मॅन्युअल किंवा डीएसएम या निदान करण्याच्या वैद्यकीय पुस्तकाचा आधार घेऊन करता येते.