अलीकडे विद्यार्थी करिअर कौन्सिलिंगसाठी येतात, तेव्हा त्यांना स्वाभाविकपणे विचारला जाणारा प्रश्न असतो – "मोठेपणी काय बनायचं आहे?’ पूर्वीची उत्तरं असायची – डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस अधिकारी किंवा उद्योजक. पण आता काही विद्यार्थ्यांकडून वेगळीच उत्तरं ऐकायला मिळतात – "मला रीलस्टार व्हायचंय!’, "मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय!’, "माझे लाखो फॉलोअर्स असतील!’ रील्सच्या युगात वाढणाऱ्या पिढीसाठी हे आश्चर्यकारक नाही. कारण रील्स हे आता केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही; ते अनेक मुलांच्या स्वप्नांचा अविभाज्य भाग बनलं आहे. डॉक्टर होण्यासाठी आठ-दहा वर्षे घालवावी लागतात. अभियंता होण्यासाठी पाच-सहा वर्षे मेहनत घ्यावी लागते. उद्योजक होण्यासाठी जोखीम स्वीकारावी लागते. पण रील्स बनवण्यासाठी तुलनेने कमी वेळ लागतो आणि प्रसिद्धी झटपट मिळाल्याचा भास निर्माण होतो.
क्षणिक प्रसिद्धीचे आकर्षणरील्स लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा अल्प कालावधी. काही सेकंदांत विनोद, नृत्य, माहिती, भावना किंवा संदेश पोहोचतो. आजच्या वेगवान जीवनशैलीत ही शैली मुलांना सहज आकर्षित करते. याशिवाय हे पूर्णपणे ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम आहे. डोळ्यांना दिसणारं, कानांना ऐकू येणारं आणि सतत बदलणारं कंटेंट मेंदूला पटकन आवडतं. पुस्तक वाचण्यासाठी किंवा एखादं कौशल्य आत्मसात करण्यासाठी संयम लागतो; पण रील्स पाहण्यासाठी बोटाचा फक्त एक स्पर्श पुरेसा असतो.
‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन' चा सापळायेथे एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय मुद्दा लक्षात घ्यायला हवा - इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजेच तात्काळ समाधान. व्हिडिओ तयार केला आणि काही तासांत हजारो व्ह्यूज आले, लाईक्स मिळाले, कमेंट्स आल्या की मेंदूला त्वरित आनंदाची अनुभूती मिळते. मेहनत, प्रतीक्षा आणि सातत्याशिवाय प्रसिद्धी मिळाल्याचा भास निर्माण होतो.हळूहळू अनेक विद्यार्थ्यांना वाटू लागतं की यश म्हणजे फॉलोअर्स, लोकप्रियता म्हणजे व्ह्यूज आणि ओळख म्हणजे लाईक्स.
लोकप्रियता आणि यश यातला मूलभूत फरकपण इथेच खरी फसगत सुरू होते. रील्समधून मिळणारी लोकप्रियता आणि वास्तविक आयुष्यातील यश या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. काही मोजके लोक या क्षेत्रात खरोखर यशस्वी होतात. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, सर्जनशीलता, कौशल्य, नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोन असतो. पण लाखो मुलांना फक्त यशाचा चमकदार भाग दिसतो; त्यामागचा संघर्ष दिसत नाही.
विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे इशारेकाही गोष्टी वेळेवर ओळखणे आवश्यक आहे. सतत फक्त व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्सबद्दल विचार करणं.अभ्यास, खेळ, छंद आणि कुटुंबापेक्षा मोबाईलवरील प्रसिद्धी महत्त्वाची वाटणं. स्वतःची तुलना सतत इतर इन्फ्लुएन्सर्सशी करणं. व्हायरल होण्यासाठी धोकादायक स्टंट किंवा वादग्रस्त वर्तन स्वीकारणं. या गोष्टी आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात.
सर्वात मोठा धोका – स्वतःची ओळख हरवणंजेव्हा एखादी व्यक्ती सतत इतरांना प्रभावित करण्यासाठी जगू लागते, तेव्हा ती स्वतःचं मूळ व्यक्तिमत्त्व विसरू लागते. विद्यार्थीदशा ही स्वतःला घडवण्याची वेळ असते. कौशल्य विकसित करण्याची, विचार प्रगल्भ करण्याची आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असते. जर हा काळ फक्त व्हायरल होण्याच्या मागे खर्च झाला, तर पुढे मोठी पोकळी निर्माण होऊ शकते.
सोशल मीडिया वापरण्याची पद्धत महत्त्वाचीयाचा अर्थ सोशल मीडिया वाईट आहे किंवा रील्स बनवणं चुकीचं आहे, असा अजिबात नाही. उलट, योग्य वापर केला तर हे ज्ञान देण्यासाठी, कला सादर करण्यासाठी, सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी, उद्योजकता वाढवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्यासपीठ ठरू शकतं. मात्र प्रश्न रील्सचा नाही. प्रश्न एवढाच आहे- तुम्ही रील्स वापरत आहात की रील्स तुम्हाला वापरत आहेत?
स्वतःला हे ५ प्रश्न विचारा
माझ्याकडे एखादं खरं कौशल्य आहे का?प्रसिद्धी नसली तरी मी हे काम आनंदाने करेन का?सोशल मीडियाशिवाय माझी वेगळी ओळख काय आहे?माझा अभ्यास, करिअर आणि मानसिक आरोग्य यावर परिणाम होत नाही ना?मी फक्त ट्रेंडचा पाठलाग करतोय की काही मूल्य निर्माण करतोय?लक्षात ठेवा : "व्हायरल होणं ही घटना असते; पण विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व घडवणं ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असते.
- डॉ. स्वाती गानू, मानसोपचार तज्ज्ञ, मुंबई