हटके
समाज बदलला, मुलंही बिघडली
आजची मुलं बिघडली आहेत, अशी तक्रार ऐकू येते. आपली मुलं काही अचानक बिघडलेली नाहीत; त्यांना घडवणारा समाजच झपाट्यानं बदललाय. मुलांच्या वर्तनामागील सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक वास्तवाचा वेध घेणारा लेख.
Krantiwave
17 Jul 2026
5 मिनिटे वाचन
नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दाखला मागण्याच्या निमित्ताने मुख्याध्यापकांच्या दालनात येऊन आणि शिक्षकावर असलेल्या रागाचा बदला घेत धारदार चाकूने मुख्याध्यापिकांच्या दालनात शिक्षकावर वार केला. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये संभाजीनगर येथील शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. शाळेचे व्यवस्थापन या घटनेने हादरून गेले. गेल्या काही वर्षांत शाळकरी विद्यार्थ्यांमधील बंडखोर स्वभाव, हिंसक वर्तन, आक्रमकता, विध्वंसक वृत्ती आणि समाजविघातक प्रवृत्तींचे प्रमाण वाढतच चालले आहे. आता तर ही केवळ शिक्षणक्षेत्रासमोरील समस्या राहिलेली नसून, ती समाजासमोरील मोठे गंभीर आव्हान बनून उभी राहिली आहे. समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन यातून घडते.किरकोळ कारणांवरून टोळ्या करणे, मारामाऱ्या करणे, शिस्तशीर वागण्याचा आग्रह धरणाऱ्या शिक्षकांना धमकावणे, शाळेत धारदार शस्त्रे घेऊन येणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा गुन्हेगारीकडे आकर्षित होणे या घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत. प्रश्न एवढाच आहे की आपण या घटना पाहून हादरतो का, की त्या आपल्या संवेदनाहीन समाजात हळूहळू ‘न्यू नॉर्मल' होत चालल्यात?एकेकाळी ‘अभ्यास एके अभ्यास' असे विद्यार्थीदशेचे स्वरूप आणि सूत्र असायचे. शाळेचे वेळापत्रक, गृहपाठ, परीक्षा आणि अभ्यास हेच शाळकरी विद्यार्थ्यांचे भावविश्व असायचे. आज मात्र अनेक मुलांसाठी मोबाईल, सोशल मीडिया, ओटीटीवरील वेब सिरीज आणि इंटरनेटमुळे पुढ्यात आलेलं आभासी जग हेच वास्तव बनत चालले आहे. पडद्यावर दाखवली जाणारी भाईगिरी, हिंसा, दादागिरी, आणि उदात्तीकरण केलेल्या गुन्हेगारीचे ग्लॅमर, तसेच व्यसनांचे उदात्तीकरण अनेक किशोरवयीन मुलांना आकर्षित करत आहे. यात दोष केवळ माध्यमांचा किंवा गॅजेट्सचा नाहीये. समाज म्हणून आपण कुठे चुकलो आहोत, हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन गेली आहे.मूल प्राथमिक शाळेत असताना घरचा अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून शिक्षकांनी जाब विचारला, डोळे वटारले तर काही पालक मुलांची बाजू घेतात. शाळेत भेटून किंवा फोनवरून मुलांच्या लंगड्या कृतीचे समर्थन करत सवलत मागतात. गैरहजर राहिल्यास मुलांची ढाल बनून सामोरे जातात. कित्येक ‘लाडक्या' मुलांचे पालक अभ्यास, शिस्त या गोष्टींवरून मुलांना दोष देण्याऐवजी, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याऐवजी शिक्षकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू लागतात. यातून मुले शेफारतात. बालपणात प्रत्येक चुकीवर पांघरूण घालणारे पालक पुढे किशोरवयात ‘मुलं आमचं ऐकत नाहीत' अशी तक्रार करतात. पण याची बीजं आधीच पडलेली असतात. ‘जे पेरले तेच उगवते' हे लक्षात घेतलं पाहिजे.लहानपणी कठोर होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडले नाही, संस्कार आणि शिस्त यावर लक्ष दिले नाही, नकार पचवायला शिकवले नाही, पराभव स्वीकारायला शिकवले नाही आणि मर्यादा समजावून सांगितल्या नाहीत, तर मोठेपणी अपयश आल्यावर हिंसा आणि आक्रमकता हे जवळचे पर्याय वाटू लागतात. यातूनच दहावी-बारावीच्या परीक्षेत ‘कॉपी करून पास होऊ द्या' अशी मानसिकता वाढत चाललीय. समाजात परिश्रम, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या मूल्यांचे स्थान गौण बनत चालले आहे. आजचं समाजातलं प्रदूषित वातावरण मुलांपर्यंत पोहोचतं. त्याचेही परिणाम होतात. सगळी मुलं असं वागतात असा दावा नाही. मात्र शिक्षणावरले लक्ष पांगलेल्यांची संख्या वाढत चालली आहे ही गंभीर काळजीची बाब आहे. शालेय शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि घसरलेली मूल्यव्यवस्था हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण हा आपल्या समाजाच्या प्राधान्यक्रम नाही. किंबहुना हा चर्चाविश्वाचा, चिंतनाचा आणि चिंतेचाही विषय राहिलेला नाही.मोबाईलच्या अनियंत्रित वापराने परिस्थिती आणखीनच गंभीर बनत चालली आहे, हे खेदाने नमूद करावे लागते. वयाला न साजेशी स्फोटक सामग्री, अश्लीलता, हिंसा आणि आभासी जगातील विकृत आदर्श यांच्या सततच्या संपर्कामुळे मुलांचे भावविश्व बदलत गेले आहे. प्रौढांनी मुलांकडून अभ्यासातील सातत्य, सचोटी आणि प्रामाणिकपणा अशा योग्य गोष्टींचा आग्रह धरला, तर राग येतो, आदळआपट सुरू होते, संयम ठेवता येत नाही आणि तात्काळ समाधान तसेच तात्काळ परिणाम अपेक्षित असतात. तंत्रज्ञानाच्या वापरात वेगाने पुढे जाणारी आजची पिढी व्यवहारिक जीवनातील अनेक साध्या गोष्टींमध्ये अपेक्षेइतकी सक्षम दिसत नाही. आजूबाजूच्या घटना, परिस्थिती आणि मानवी संबंधांचे सूक्ष्म भान कमी होत चालल्याची जाणीव अनेकदा होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या साध्या तोंडी सूचनांचे आकलन होण्यासाठी अधिक वेळ लागतो. दुसरीकडे संवादात तुच्छता आणि उर्मटपणाकडे झुकणारी वागणूक काही प्रमाणात वाढताना दिसते. तांत्रिक प्रगतीसोबतच संवेदनशीलता, संवादकौशल्य आणि समाजभान यांचाही विकास तितकाच महत्त्वाचा असतो. मात्र भौतिक, शारीरिक वाढ आणि मानसिक विकास यांचे संतुलन कुठं तरी बिघडलं आहे.शिक्षण हक्क कायद्याने बालकस्नेही शिक्षणाचा पुरस्कार केला. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देण्यावर बंदी घालणे हा योग्य आणि आवश्यक निर्णय होता. मारकुट्या शिक्षकांच्या मनमानी वागण्याला त्यामुळे चाप बसला. मात्र दुसरीकडे शिस्तीची साधने काढून घेतल्यानंतर शिक्षकांना पर्यायी अधिकार, पालकांचे सहकार्य आणि व्यवस्थेचा पाठिंबा देण्यात आपण कमी पडलो. आज अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना कठोर शब्दांत समज देतानाही दहा वेळा विचार करतात. कारण शिस्तीच्या प्रयत्नालाच अनेकदा छळाचे स्वरूप दिले जाते. शिक्षक भ्यालेले आणि विद्यार्थी शेफारलेले असे चित्र निर्माण झाले आहे. काही बोलायला जावं तर टोकाचं पाऊल उचलायला पोरं मागं पुढं बघत नाहीत. हल्ली हल्ली पालक पोरांना घाबरून असतात. जुन्या काळातील कठोर शिक्षा आणि ती शिक्षणपद्धती परत आणण्याचा दुराग्रह आमच्या मनात नाही. मात्र शिस्त, जबाबदारी, मर्यादा, मूल्ये, संस्कार, आदर, आपुलकी आणि कर्तव्यभावना यांची पुनर्स्थापना करण्याची गरज नक्कीच आहे.आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे समाज मुलांना सर्व काही शिकवत आहे; पण स्वतःवर नियंत्रण ठेवणे, नकार पचवणे, संयम बाळगणे आणि दुसऱ्यांचा आदर करणे या जीवनमूल्यांचे शिक्षण आणि संस्कार देण्यात मात्र कमी पडत आहे. या सगळ्या कोलाहलात मुलांची मनं हळूहळू विझून चालली आहेत. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिगरबाज वृत्ती कमी होत आहे. मुलं वाचत नाहीत अशी तक्रार करणारे शिक्षक आणि पालक वर्षभरात स्वतः किती पुस्तके वाचतात? मुलांनी मोबाईलवर रील्स पाहत बसू नये, अशी अपेक्षा मुलांकडून केली जाते; मात्र मोठी माणसं आपल्या वागण्यातून मुलांसमोर असा काही आदर्श ठेवतात का? मुलांनी रागावर नियंत्रण ठेवावे, मात्र मोठ्यांनी मनाविरुद्ध घडले की आदळआपट करावी, भांडण-तंटे करावेत, मोठ्या आवाजात बोलावे? आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम केले पाहिजेत, सातत्याने अभ्यास केला पाहिजे, अशा अपेक्षा मुलांकडून करायच्या आणि मोठ्यांनी मात्र त्याच्या विपरीत वागायचे? सचोटी आणि प्रामाणिकपणाने वागण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवायची आणि संधी मिळेल तेव्हा मोठ्या माणसांनी इतरांना ओरबाडायचे? फसवायचे, असे कसे चालेल?बेरोजगारीमुळे वाढत चाललेले नैराश्य, सामाजिक अस्थिरता आणि कुटुंबव्यवस्थेतील बदल यांचाही मोठा वाटा आहे. घरातील मोठी माणसे स्वतः दिशाहीन, अस्थिर किंवा निष्क्रिय असतील, तर मुलांसमोर ती कोणता आदर्श ठेवणार? समाज मुलांकडून शिस्त, संवेदनशीलता आणि जबाबदारीची अपेक्षा करतो; पण त्यांना ते शिकवण्यासाठी आवश्यक वातावरण आपण निर्माण करत आहोत का? अशावेळी शाळेबाहेरच्या जगातील ‘मूल्ये' मुलं चटकन अंगीकारतात.आजची मुलं बिघडली आहेत, अशी तक्रार शिक्षक आणि पालकांमधून सामान्यपणे ऐकू येते. मात्र आपली मुलं अचानक बदललेली नाहीत. त्यांना घडवणारा समाज बदलला आहे. कुटुंबव्यवस्था बदलली आहे. आजच्या समाजातील एकूण मूल्यव्यवस्था बदलली आहे. समस्यांचे उपाय केवळ शाळांमध्ये शोधून चालणार नाहीत. शाळांनी उपाय शोधले तरी ते तकलादू ठरतील. एक मात्र निश्चित आहे, ते म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि भावनिक सुरक्षिततेसाठी समुपदेशक नेमण्याची आवश्यकता आहे. पालक, शिक्षक, समाज, शासन, माध्यमे आणि तंत्रज्ञान क्षेत्र या सर्वांनी मिळून या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा आज शाळांमध्ये दिसणारी हिंसा आणि असंवेदनशीलता उद्या समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसू लागेल.