खाशाबा जाधव हे भारतीय क्रीडा इतिहासातील सोनेरी पान आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन भारतातील हजारो मल्लांनी आखाड्यात घाम गाळला. खाशाबांनी हयातीत बरीच उपेक्षा सहन केली. समाजानेही त्यांना दीर्घकाळ विस्मृतीत ढकलले होते. मात्र गेल्या दीड-दोन दशकांत त्यांच्या कार्याचा पुनश्च गौरव होऊ लागला आहे. देश स्वतंत्र झाला त्या काळात खाशाबांनी कुस्तीत ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. त्या कामगिरीची कल्पना जरी केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. गावच्या आखाड्यातून ऑलिम्पिकच्या मॅटपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. नागराज मंजुळे हा चरित्रपट साकारत असल्याने या चित्रपटाकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. मराठीत भालजी पेंढारकर यांच्या तांबडी मातीपासून ते हिंदीतील दंगलपर्यंत कुस्तीवर आधारित अनेक चित्रपट आले. प्रत्येकाने कुस्तीचा वेगळा पैलू मांडला; मात्र कुस्ती परंपरेतील तांत्रिक अचूकता आणि वास्तववादी सादरीकरण मर्यादितच राहिले. कुस्तीचे चित्रीकरण हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. त्यातील डावपेच, शरीराची हालचाल आणि मानसिक संघर्ष प्रभावीपणे मांडणे सोपे नसते. नागराज मंजुळे यांनी हे मोठे आव्हान स्वीकारले आहे.
खाशाबांचा संघर्षमय जीवनप्रवास
खाशाबांच्या आयुष्यात अनेक टप्पे आले. भारत पारतंत्र्यात असताना त्यांनी कुस्तीचे बाळकडू घेतले. कोल्हापुरात शिक्षण घेत असतानाच त्यांनी आखाड्यात स्वतःला घडवले. स्वातंत्र्यानंतर भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले. त्यानंतर पोलिस खात्यात नोकरी केली. पुढे अपघातात त्यांचे निधन झाले. दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही. आता नागराज मंजुळे त्यांच्या जीवनातील कोणते पैलू पडद्यावर आणतात, याची उत्सुकता आहे.
मंजुळे यांची वास्तववादी चित्रपटशैली
फँड्री, सैराट आणि झुंड या चित्रपटांमधून नागराज मंजुळे यांनी वास्तववादी कथनशैलीची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पात्रांचे नैसर्गिक अभिनय, मूळ लोकेशन्स, सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण आणि साधेपणातून निर्माण होणारी ताकद ही त्यांच्या सिनेमाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे खाशाबा हाही चरित्रपट ते वास्तववादी पद्धतीने साकारतील, अशी अपेक्षा आहे. मंजुळे यांचा कुस्तीशी जवळचा संबंध आहे. ते ज्या जेऊर-करमाळा परिसरातून आले आहेत, त्या भागाला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यांच्या कुटुंबाचाही कुस्तीशी संबंध राहिला आहे. त्यामुळे तांबड्या मातीचा गंध, तालमी, फड आणि पैलवानकीचे बारकावे त्यांना जवळून माहीत आहेत. हा अनुभव चित्रपटाला अधिक वास्तववादी बनवू शकतो.
कास्टिंग आणि वास्तवाचा शोध
या चित्रपटाच्या कलाकार निवडीसाठी नागराज मंजुळे यांना त्यांच्या बंधूंची मदत झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक आखाड्यांमधून कुस्तीपटूंची निवड करण्यात आली आहे. टीझरमध्ये नायकाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. मंजुळेंच्या चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटात एखादा नवा चेहरा प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. खाशाबा जाधव हे पन्नास-साठ किलो वजनाचे, किरकोळ देहयष्टीचे मल्ल होते. त्यांची चपळता, वेग, डावपेच आणि मानसिक एकाग्रता ही त्यांच्या कुस्तीची खरी ताकद होती. त्या काळातील आखाडे, ग्रामीण जीवन, सामाजिक वातावरण आणि कुस्तीची परंपरा पडद्यावर तितक्याच नैसर्गिकतेने उभी करणे हे चित्रपटासमोरील मोठे आव्हान आहे.
सिनेमॅटिक लिबर्टी आणि ऐतिहासिक सत्य
चरित्रपट हा इतिहासाची पुनर्रचना असतो. त्यामुळे दिग्दर्शकाला काही प्रमाणात सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते. मात्र ती घेताना ऐतिहासिक सत्य, व्यक्तिमत्त्वाचा गाभा आणि त्या काळाचा सामाजिक संदर्भ अबाधित ठेवणे आवश्यक असते. जुन्या तालमी, कुस्त्यांचे फड, घरांची रचना, लोकजीवन आणि तत्कालीन वातावरण किती विश्वासार्हपणे साकारले जाते, यावर चित्रपटाची गुणवत्ता अवलंबून असेल.
केवळ चरित्रपट नव्हे, तर प्रेरणादायी दस्तऐवज
खाशाबा हा केवळ एका खेळाडूचा चरित्रपट नाही; तर भारतीय क्रीडा इतिहास, राष्ट्रनिर्मिती आणि एका सामान्य ग्रामीण युवकाच्या असामान्य संघर्षाची कथा आहे. त्यामुळे हा चित्रपट वैयक्तिक यशाच्या पलीकडे जाऊन सामूहिक स्मृतीचा भाग बनू शकतो. फँड्रीमधील जब्या, सैराटमधील परश्या आणि झुंडमधील बाबू यांसारखी लक्षात राहणारी पात्रे साकारताना मंजुळे यांनी नवोदित कलाकारांवर विश्वास दाखवला. नैसर्गिक अभिनय घडवून आणण्यात त्यांचे कौशल्य सिद्ध झाले आहे. त्यामुळे खाशाबाचा नायकही तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर उभा राहील, अशी अपेक्षा आहे.
तर चित्रपट मैलाचा दगड ठरेल
या चित्रपटाचे यश केवळ योग्य अभिनेत्याच्या निवडीवर अवलंबून नसेल; तर तो अभिनेता खाशाबांच्या देहबोली, कुस्तीतील चपळता, मानसिक जिद्द आणि संयम कितपत आत्मसात करतो, यावर अधिक अवलंबून असेल. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामूहिक स्मृती जतन करण्याचे प्रभावी साधन आहे. अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे समाजाला पुस्तकांपेक्षा चित्रपटातून अधिक परिचित होतात. खाशाबा हा चित्रपट नव्या पिढीसमोर विस्मृतीत गेलेल्या महान ऑलिम्पिक पदक विजेत्याचा पुनर्परिचय करून देऊ शकतो. भारतीय कुस्ती परंपरा, ग्रामीण महाराष्ट्राची सांस्कृतिक स्मृती आणि संघर्षातून घडलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी दस्तऐवज म्हणून हा चित्रपट उभा राहिला, तर तो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल.
– मतीन शेख
पत्रकार, कुस्तीपटू, कोल्हापूर