उसावरील रोगांचे असे करा नियंत्रण

शेती

उसावरील रोगांचे असे करा नियंत्रण

महाराष्ट्रात ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक असून राज्याच्या कृषी आणि सहकार अर्थव्यवस्थेचा तो कणा मानला जातो. मात्र बुरशी, विषाणू, मायकोप्लाझ्मा तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विविध रोगांमुळे उसाच्या उत्पादनात आणि साखरेच्या उताऱ्यात मोठी घट होऊ शकते. रोगांची सुरुवातीची लक्षणे वेळेवर ओळखून योग्य प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना केल्यास मोठे नुकसान टाळता येते. या लेखात उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ, गाभा रंगणे (लाल कांडी), मर, पोक्का बोईंग, पायनापल (अननस रोग), केवडा (लोह कमतरता) आणि तांबेरा या प्रमुख रोगांची लक्षणे, प्रसाराची कारणे आणि शिफारस केलेल्या नियंत्रण उपायांची सविस्तर माहिती दिली आहे.

विलास जाधव ऊस विकास अधिकारी, क्रांती साखर कारखाना, कुंडल 17 Jul 2026 5 मिनिटे वाचन 297 views
Facebook WhatsApp X

चाबूक काणी

चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी या बुरशीमुळे होतो. हा रोग उसाच्या को-७४० या जातीवर जास्त प्रमाणात आढळतो. ऊस पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. रोगग्रस्त उसाच्या शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. पुढे त्यावरील चंदेरी आवरण फाटून काळे बीजाणू बाहेर पडतात. हे बीजाणू हवेद्वारे पसरून निरोगी उसाच्या डोळ्यांवर पडतात आणि रोगाचा प्रसार होतो. या रोगामुळे ऊस बारीक होतो, वाढ खुंटते, पाने लहान व अरुंद होतात आणि उत्पादनात घट येते. खोडव्यात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो.

नियंत्रणाचे उपाय

  • रोगग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये.
  • निरोगी व रोगमुक्त बेणे वापरावे.
  • प्रादुर्भाव ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास खोडवा घेऊ नये.
  • ३ ते ४ वर्षांनी बेणे बदलावे.
  • रोगग्रस्त बेट मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे.
  • लागवडीपूर्वी १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे.
  • कोव्हीएसआर-९८०५ सारख्या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.

गवताळ वाढ

हा रोग मायकोप्लाझ्मामुळे होतो. बुंध्याकडील डोळ्यांमधून असंख्य पिवळसर-पांढरे फुटवे येऊन उसाला गवतासारखे स्वरूप प्राप्त होते. पाने अरुंद व लहान राहतात. रोगाचा प्रसार बेणे, कोयता आणि मावा किडीद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय

  • निरोगी बेण्याचा वापर करावा.
  • उष्णजल किंवा बाष्पउष्ण हवा प्रक्रिया केलेले बेणे वापरावे.
  • रोगग्रस्त खोडवा ठेवू नये.
  • मावा किडीचे नियंत्रण करावे.
  • रोगट बेटे मुळासकट काढून नष्ट करावीत.
  • लागवडीपूर्वी बेणे ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीन द्रावणात बुडवावे.
  • कोव्हीएसआर-९८०५ आणि कोव्हीएसआर-४९४ या जातींची लागवड करावी.

गाभा रंगणे (लाल कांडी)

हा रोग कोलेटोट्रायकम फालकॅटम या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला रोग ओळखणे कठीण असते. शेंड्याकडील तिसरे किंवा चौथे पान वाळते. ऊस उभा कापल्यास गाभा लाल दिसतो आणि त्यावर पांढरे पट्टे आढळतात. पुढे ऊस पोकळ होतो, सालीवर सुरकुत्या पडतात आणि अल्कोहोलसारखा वास येतो.

नियंत्रणाचे उपाय

  • निरोगी बेणे वापरावे.
  • उष्णजल प्रक्रिया केलेले बेणे वापरावे.
  • कार्बेन्डॅझिम द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवावे.
  • कापणीची अवजारे निर्जंतुक करावीत.
  • रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.
  • पिकांची फेरपालट करावी.
  • शेतातील अवशेष जाळून नष्ट करावेत.
  • पाणी नियंत्रित प्रमाणात द्यावे.
  • रोगग्रस्त भागात ३ ते ४ वर्षे ऊस घेऊ नये.
  • को-७३१४ आणि को-५७६७ जातींची लागवड करावी.

मर

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉर्मी आणि सेफॅलोस्पोरियम सॅकरी या बुरशीमुळे होतो. देठ पोखरणारी अळी किंवा मुळे पोखरणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावानंतर हा रोग वाढतो. पाने पिवळी पडतात, ऊस वाळतो, मुळे कुजतात आणि कांड्याचा आतील भाग करडा व लालसर दिसतो.

पोक्का बोईंग (पोंगा कुजणे)

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉर्मी या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला पोंग्याजवळील पाने पिवळी पडतात. पुढे पाने सुरकुततात, शेंडा कुजतो आणि उसाची वाढ खुंटते.

नियंत्रणाचे उपाय

  • २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • एप्रिल-मे महिन्यात उशिरा लागवड टाळावी.

पायनापल (अननस रोग)

हा रोग सेरॅटोसिस्टिस पॅराडॉक्सा या बुरशीमुळे होतो. जमिनीतून रोगाचा प्रसार होतो. रोगग्रस्त बेणे उगवत नाही. कांडी करडी, हलकी आणि कुजलेली दिसते. आतील भाग लाल-काळा होऊन अननसासारखा वास येतो.

नियंत्रणाचे उपाय

  • निरोगी बेणे वापरावे.
  • लागवडीपूर्वी कार्बेन्डॅझिम किंवा बेलेटॉन द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवावे.
  • खोल लागवड टाळावी.
  • निचऱ्याची योग्य व्यवस्था असलेली जमीन निवडावी.

केवडा (लोह कमतरता)

लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा विकार होतो. सुरुवातीला शेंड्याकडील पाने पिवळी पडतात. पुढे संपूर्ण पाने पांढरट होऊन केवड्याच्या पानांसारखी दिसतात.

नियंत्रणाचे उपाय

  • हिरवळीची पिके घ्यावीत.
  • गंधकयुक्त खतांचा वापर करावा.
  • चुनखडीयुक्त जमिनीत लागवड टाळावी.
  • २.५ किलो फेरस सल्फेट ५०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
  • लागवडीपूर्वी १० किलो फेरस सल्फेट शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे.

तांबेरा

हा रोग पकसिनिया या बुरशीमुळे होतो. हिवाळ्यात पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात आणि त्यातून लालसर भुकटी बाहेर पडते.

नियंत्रणाचे उपाय

  • पाणी बेताने द्यावे.
  • रोगग्रस्त पिकाचा खोडवा घेऊ नये.
  • को-६३१९८ आणि को-७२१९ या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.

विलास जाधव, ऊस विकास अधिकारी, क्रांती साखर कारखाना, कुंडल