आप्पासाहेब खोत हे मराठी साहित्यात प्रामुख्याने सिद्धहस्त कथाकार म्हणून सुपरिचित आहेत. आठ कथासंग्रह, सहा कादंबऱ्या आणि तीन ललित लेखसंग्रह अशी त्यांची दर्जेदार साहित्यसंपदा प्रकाशित आहे; तर ‘वाघाचा डोंगर’ ही त्यांची सातवी आणि तितकीच महत्त्वाची कादंबरी ठरते. शब्द शिवार प्रकाशन (मंगळवेढा) यांनी प्रकाशित केलेली ही कादंबरी समकालीन मराठी साहित्यात पर्यावरण आणि मानवी संस्कृतीच्या ऱ्हासावर भाष्य करणारी एक महत्त्वाची कलाकृती म्हणून समोर येते. २९ भागात आणि २२१ पृष्ठांत विस्तारलेली ही कादंबरी केवळ एक कथा नसून, उत्तर-आधुनिकतेच्या नावाखाली निसर्गाचा आणि मानवी मूल्यांचा बळी देणाऱ्या व्यवस्थेचे विदारक वास्तव मांडणारे एक जळजळीत संचित आहे.
‘वाघाचा डोंगर’ ही कादंबरी प्रारंभापासूनच मानवी स्वभाव, बदलती ग्रामीण संस्कृती, राजकीय डावपेच आणि निसर्गाचा प्रकोप यांचा एक अत्यंत प्रभावी ताळेबंद मांडते. ही कादंबरी केवळ एका गावाची कथा सांगत नाही, तर विकासाच्या नावाखाली ग्रामीण भागाचे होणारे शोषण आणि परंपरा विरुद्ध आधुनिकता यांच्यातील संघर्षावर भाष्य करते. दा. गो. काळे कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहितात, “आप्पासाहेब खोत हे कथाकथनकार, कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बऱ्याच कथासंग्रहानंतर ‘वाघाचा डोंगर’ ही त्यांची कादंबरी आलेली आहे. ही कादंबरी म्हणजे समकालीन वास्तवात निसर्गाला ओलांडून जाणाऱ्या पिढीची आहे. प्राचिन काळापासून निसर्ग संवेदनांना साद-प्रतिसाद देणारा माणूस, त्याच माणसांच्या आत नांदणाऱ्या भ्रष्टतेची गोष्ट आहे. त्यात सर्व बाजूंनी आपल्या असतेपणाच्या खूणा मिटवणारा भावनाशून्य राक्षसीवृत्ती प्रवृत्तीच्या माणसांचा कळप. आपल्याला उत्तर आधुनिकतेची स्वप्न दाखवणारे त्यांचे कार्पोरेट जग त्याच अवकाशात आपल्या अस्तित्वाला प्राणपणाने जपण्यासाठी झटणारी माणसं, आणि मानवी घडणीतील हा असमतोल पेलू न शकणाऱ्या निसर्गाचा कोसळ आहे. ह्याच कोसळात समकालीन परिस्थितीच्या अधोगतीची बीजं रूजलेली आहेत. त्याचे प्रत्यंतर आजही आपल्याला ऐरोवली पर्वतरांगासाठी चाललेल्या विद्ध्वंसात तर तपोवनात होत असलेल्या वृक्षतोडीची साक्ष देतात. हे दृष्टचक्र थांबणारे नाही. अशा प्रकारचे सूचन ही कादंबरी करताना दिसते”.
कादंबरीची सुरुवात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘डोंगरवाडी’ (नंतरचे वाघवाडी) या निसर्गरम्य आणि शांत गावाने होते. गावाची रचना, हेमाडपंथीय भैरोबाचे मंदिर, वाघजाई देवीची रानजाई आणि त्याभोवती गुण्यागोविंदाने राहणारे गावकरी असा एक आदर्श ग्रामीण पट लेखकाने सुरुवातीला उभा केला आहे. गावाचे ‘वाघवाडी’ हे नाव पडण्यामागे असलेला शौर्याचा इतिहास, ज्यामध्ये ‘भालंवाला सावंत’ याने राजाचा जीव वाचवण्यासाठी वाघाचा जबडा फाडला आणि बक्षीस म्हणून मिळालेल्या डोंगरामुळे त्याचे घराणे ‘वाघसावंत’ (इनामदार) म्हणून ओळखू लागले. हा भाग गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मजबूत करतो.
कादंबरीकाराने निसर्गाच्या आणि प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विनाश अत्यंत ताकदीने मांडला आहे. सुरुंगाचे आवाज झाल्यानंतर प्राण्यांची होणारी तगमग, मेंढ्यांचे भिणे, कुत्र्यांचे रडणे, वानरांच्या नवजात पिल्लाचा उंचावरून पडून झालेला मृत्यू आणि चिमणीच्या पिल्लाला बोक्याने घेऊन जाणे. हे प्रसंग केवळ प्राण्यांचे दुःख दाखवत नाहीत, तर निसर्गाच्या अन्नसाखळीवर आणि शांततेवर माणसाने केलेला क्रूर आघात दर्शवतात. सुरुंगाच्या धुराने काळवंडलेले आकाश हे पर्यावरणाच्या विनाशाचे जिवंत प्रतीक आहे. कादंबरीत वापरलेली प्रतीके कथेला वैचारिक खोली देतात. जयसिंगराव इनामदार (दादासाहेब) यांच्या खुंटीवरील ‘इनामदारी टोपी’ खाली पडणे आणि त्यांच्या वडिलांचा (आबाजींचा) फोटो फुटणे, हे जुनी सरंजामशाही, गावातील नैतिक नेतृत्व आणि स्वाभिमान यांचा अंत झाल्याचे प्रतीक आहे. सुरुंगाच्या आवाजाने घाबरून मुलांनी खेळण्यातले सैनिक टाकून पळणे, हे भविष्यातील पिढीच्या सुरक्षिततेचा आणि धैर्याचा झालेला पराभव दर्शवते. गावातील कुत्र्यांचे रडणे हे गावाला लागणाऱ्या ग्रहण किंवा विनाशाचा पूर्वसंकेत ठरतो.
मात्र, कादंबरीचा उत्तरार्ध आणि शेवट अत्यंत शोकांतिक आहे. रेल्वे लाईन येणार या अफवेच्या आधारे राजकारणी आणि भांडवलदार कसा डाव खेळतात, गावची एकजूट कशी तोडतात आणि शेवटी डोंगर विकायला भाग पाडून कसा तिचा सत्यानाश करतात, हे कथानकाचे मुख्य केंद्र आहे. शेवटी झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण वाघांची खोरी चिखलमातीने भरून जाते आणि गावाचा पोशिंदा, स्वाभिमानी जयसिंगराव (दादासाहेब) आत्मबलिदान देतो.
कादंबरीच्या सुरुवातीला जो डोंगर गावकऱ्यांना दूधदुभतं देणारा आणि पाठीशी उभा राहणारा रक्षक वाटत होता, तोच डोंगर शेवटी कोसळतो (भूस्कलन होते). हा निसर्गाचा प्रकोप जितका नैसर्गिक होता, तितकाच तो मानवी हस्तक्षेपाचा आणि हावेचा परिणाम होता. स्टोन क्रशरच्या धंद्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी निसर्गाशी केलेली छेडछाड शेवटी काळरात्र बनून कशी येते, याचे भयानक वास्तव लेखकाने चितारले आहे.
माजी आमदार खंडेराव बापू हे ग्रामीण राजकारणातील धूर्त प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. आपल्या मावसभावाला (दादा कापसे) स्टोन क्रशरसाठी डोंगर विकत घेता यावा म्हणून ते सरकारी यंत्रणेचा आणि अफवांचा अत्यंत हुशारीने वापर करतात. ‘सखाराम सावंत’ आणि ‘महादेव जाधव’ यांसारख्या गावातील चमच्यांचा वापर करून गावात फूट पाडणे, पोलिसांची भीती दाखवणे आणि नंतर स्वतःच तारणहार बनून येणे, हा राजकीय डावपेच लेखकाने अत्यंत जिवंतपणे मांडला आहे. शेतकऱ्यांचे अज्ञान आणि भीतीचा फायदा घेऊन त्यांची पिढ्यानपिढ्यांची जमीन कशी हडप केली जाते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
वाघसावंत घराण्याला पंचक्रोशीत मोठा मान होता. स्वाभिमान आणि तत्त्व जपणारे हे घराणे होते. मात्र, नव्या पिढीतील मधू हा दारूच्या आहारी जाऊन संपूर्ण घराण्याच्या अब्रूला आणि गावाच्या दुःखाला काळिमा फासतो. ज्या दिवशी संपूर्ण गाव निसर्गाच्या कोपामुळे उद्ध्वस्त झाले आहे, त्याच दिवशी तो दारू पिऊन बेफिकीरपणे येतो. हा जुन्या पिढीच्या नैतिक मूल्यांचा आणि नव्या पिढीच्या वैचारिक पोकळीचा संघर्ष आहे.
जयसिंगराव वाघ (दादासाहेब) हे पात्र गावाच्या जुन्या, स्वाभिमानी आणि इमानदार संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. पंचक्रोशीचे कुलदैवत आणि अग्रपूजेचा मान असलेले दादासाहेब केवळ नावाचे इनामदार नव्हते, तर ते गावकऱ्यांचे संकटमोचक होते. मात्र, मुलाचे वागणे आणि डोळ्यादेखत झालेल्या शिवाराच्या नाशामुळे ते मनाने पूर्णपणे खचतात आणि शेवटी स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आत्महत्या करतात. माधुरी (सूनबाई) कादंबरीतील हे सर्वात सशक्त आणि पुरोगामी पात्र ठरते. संपूर्ण गावाच्या आणि सासऱ्यांच्या समोर दारू पिऊन तोल जाणाऱ्या आपल्या पतीच्या (मधूच्या) मुस्काडात मारण्याचे धाडस ती दाखवते. ती केवळ सोसणारी सून नाही, तर अन्यायाविरुद्ध आणि बेफिकीर प्रवृत्तीविरुद्ध पेटून उठणारी स्त्री आहे. तिचा हा बाणा वाघसावंतांच्या मूळ ‘वाघ’ असण्याची आठवण करून देतो. शंकरनाना आणि सदा मास्तर हे दोघे गावातील शहाणपण जपणारे खांदे आहेत. शंकरनाना भावुक आहेत, तर सदा मास्तर हे सुशिक्षित, विचारी आणि समंजस पात्र आहे. दादासाहेबांच्या आत्महत्येला ‘हार्ट अटॅक’चे रूप देऊन घराण्याची आणि गावाची अब्रू वाचवण्याचा सदा मास्तरांचा निर्णय त्यांची प्रगल्भता दाखवतो. खंडेराव बापू आणि दादा कापसे हे दोघे व्यवस्था कशी शोषक असते, हे दाखवणारे खलनायक आहेत.
लेखकाने वापरलेली भाषा हे या कादंबरीचे सर्वात मोठे बलस्थान आहे. लेखकाची भाषा अत्यंत अस्सल, मातीतली आणि ग्रामीण ढंगाची आहे. संवादांमध्ये वापरलेली बोलीभाषा उदा. ‘ह्यो कसला वाघ, हे तर वाघरू!’, ‘तुझं हे आसलं बोलणं बरं न्हाई’ ‘व्हाऊन जात्याली’, ‘डोंगुर इकून वाटंचं भयानभंग केलसा’, ‘तोंड काळं करा’, ‘मढं भीताडासंग बसीवलं’ यांसारख्या अस्सल ग्रामीण आणि प्रादेशिक वातावरणाला जिवंत करते. तर ‘धडाडा खाली पडणे’, ‘धाड्-धाइ स्टोन क्रेशर सुरू होणे’, ‘कानठळ्या बसणारा आवाज’ या शब्दांमुळे दृश्याची दाहकता वाचकापर्यंत थेट पोहोचते. कादंबरीच्या शेवटच्या भागातील वातावरणनिर्मिती अप्रतिम आहे. ढगफुटीच्या पावसाचे वर्णन करताना लेखकाने वापरलेले शब्द, ‘पाणसापासारख्या वळचणी सांडत होत्या’, ‘वीज आभाळात दळण दळत होती’ अंगावर काटा आणतात. तो पाऊस केवळ पाण्याचा नव्हता, तर वाघवाडीचे नशीब धुवून नेणारा तो एक भयानक कालखंड होता, हे वाचकाला प्रकर्षाने जाणवते.कादंबरीचा शेवट अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दादासाहेबांची धगधगती चिता आणि त्याच वेळी सदा मास्तरांना मोबाईलवर मिळालेली बातमी की, ज्या डोंगरासाठी गावाने एवढा संघर्ष केला, तो विकून मिळालेला पैसा तर संपलाच, पण तो खरेदी करणारा भांडवलदार आता दुसरीकडे स्टोन क्रशर नेतोय आणि शेजारचा डोंगर पवनचक्क्यांसाठी विकला गेलाय. हे वास्तव आधुनिक विकासाचा क्रूर चेहरा समोर आणते. गावकऱ्यांनी डोंगर विकून ‘फटफटी आणि बंगले’ घेतले, पण निसर्गाने एका रात्रीत सर्वकाही हिरावून घेतले. ‘आता खायाचं काय आणि जगायचं कसं?’ हा शेवटचा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
ही कादंबरी आजच्या काळातील ग्रामीण भारताची शोकांतिका मांडते. जमिनीची विक्री, शेतीचे नुकसान, राजकारण्यांची फसवणूक आणि पर्यावरणाचा ऱ्हास या आजच्या अत्यंत गंभीर विषयांवर ही कादंबरी बोट ठेवते. प्रारंभ जितका उत्कट आणि वैभवाचा आहे, शेवट तितकाच अंतर्मुख करायला लावणारा आहे. ही कादंबरी वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जाते, यातच लेखकाचे सर्वात मोठे यश आहे......प्रा. डॉ. विनोद राठोड उपप्राचार्य, बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड, ता. शिराळा जि. सांगली.
हटके
'वाघाचा डोंगर’- निसर्ग आणि मानवी मूल्यांच्या ऱ्हासाचे चित्रण
‘वाघाचा डोंगर’ ही कादंबरी प्रारंभापासूनच मानवी स्वभाव, बदलती ग्रामीण संस्कृती, राजकीय डावपेच आणि निसर्गाचा प्रकोप यांचा एक अत्यंत प्रभावी ताळेबंद मांडते. ही कादंबरी केवळ एका गावाची कथा सांगत नाही, तर विकासाच्या नावाखाली ग्रामीण भागाचे होणारे शोषण आणि परंपरा विरुद्ध आधुनिकता यांच्यातील संघर्षावर भाष्य करते. ही कादंबरी केवळ एक कथा नसून, उत्तर-आधुनिकतेच्या नावाखाली निसर्गाचा आणि मानवी मूल्यांचा बळी देणाऱ्या व्यवस्थेचे विदारक वास्तव मांडणारे एक जळजळीत संचित आहे.
Krantiwave
16 Jul 2026
5 मिनिटे वाचन
18 views