कर्मवीरांचे बोट धरून चाललेले डॉ. एन. डी. पाटील

फीचर्स

कर्मवीरांचे बोट धरून चाललेले डॉ. एन. डी. पाटील

कर्मवीर अण्णांचा वैचारिक वारसा आयुष्यभर जपणाऱ्या कष्टकरी जनतेच्या लढवय्या नेत्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

एकनाथ पाटील, इस्लामपूर 15 Jul 2026 5 मिनिटे वाचन 1 views
Facebook WhatsApp X
१५ जुलै हा ज्येष्ठ सामाजिक विचारवंत, कष्टकरी जनतेचे लढाऊ नेते, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. नारायण (एन. डी.) पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकचळवळींच्या इतिहासात डॉ. एन. डी. पाटील हे नाव तत्त्वनिष्ठ नेतृत्व, निःस्वार्थ सेवा आणि संघर्षशील लोकनेतृत्वाचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी असलेले त्यांचे गुरु-शिष्य नाते आणि त्यांनी जपलेला वैचारिक वारसा पुन्हा उजाळा देण्याचा हा प्रयत्न.आज सुमारे सदुसष्ट वर्षांपूर्वीची घटना. सन १९५९ चा मे महिना. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि थोर शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. ही बातमी मुंबईतील कामगार चळवळीत कार्यरत असलेल्या शेकापचे तरुण नेते प्रा. एन. डी. पाटील यांना समजताच ते तातडीने पुण्याला रवाना झाले.रुग्णालयात अण्णांना भेटल्यानंतर त्यांच्या मनाची घालमेल झाली. अण्णांना त्यांच्याशी काही अत्यंत महत्त्वाचे बोलायचे होते. मात्र सभोवती लोकांची गर्दी असल्याने त्यांनी एवढेच सांगितले, "नारायण, चार दिवसांनी सवड काढून भेटायला ये. मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे." एन. डी. पाटील यांनी होकार दिला; पण नियतीला ते मान्य नव्हते. अवघ्या काही दिवसांतच, ९ मे १९५९ रोजी कर्मवीर अण्णांचे निधन झाले आणि तो संवाद कायमचा अपूर्ण राहिला.अण्णांच्या निधनानंतर रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत अण्णांनी मृत्यूपूर्वी लिहिलेले शेवटचे पत्र उघडण्यात आले. त्यांच्या हस्ताक्षरातील त्या ऐतिहासिक पत्रात केवळ एकच सूचना होती— "चि. नारायणला रयत शिक्षण संस्थेचे मेंबर करून घ्यावे."अण्णांचा हा अखेरचा विश्वासाचा ठेवा होता. अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी एन. डी. पाटील यांच्या पाठीवर हात ठेवत सांगितले, "एनडी, तुम्ही भाग्यवान आहात." त्या क्षणी त्यांना अण्णांनी सोपविलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. आयुष्यभर त्यांनी त्या विश्वासाशी प्रामाणिक राहून रयतच्या मूल्यांचे रक्षण केले.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णांच्या इच्छेनुसार एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि वसतिगृह अधीक्षक म्हणून काम सुरू केले. मात्र समाजातील विषमता, अन्याय आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या त्यांच्या मनाला सामाजिक संघर्षाचे आवाहन खुणावत होते.याच काळात भाई दाजीबा देसाई यांनी एका रात्री त्यांच्या मनाला थेट स्पर्श करणारे शब्द उच्चारले. त्यांनी म्हटले, "तू मास्तरकी कर, पैसे कमव. मी वकिली करतो. लोकांच्या प्रश्नांचं काय व्हायचं ते होईल." या शब्दांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा गाठला.दुसऱ्याच दिवशी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. दोन जोड कपडे, पुस्तकांची ट्रंक आणि अंथरुणाची वळकटी एवढेच सामान घेऊन ते मुंबईला रवाना झाले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यासाठी आणि कामगार चळवळीत स्वतःला पूर्णपणे वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा निर्णय कर्मवीर अण्णांच्या इच्छेविरुद्ध होता. काही काळ अण्णांनी त्यांच्याशी अबोलाही धरला. तरीही त्यांच्या मनात नारायणबद्दल अपार प्रेम आणि अभिमान कायम राहिला.यशवंतराव चव्हाण यांना अण्णा अनेकदा मिश्कीलपणे म्हणत, "तुमच्या सत्ताधाऱ्यांची जिरवायला मी माझा वाळव्याचा वाघ मुंबईत मोकळा सोडला आहे." या एका वाक्यात अण्णांचा आपल्या शिष्यावरील विश्वास स्पष्ट दिसून येतो.एन. डी. पाटील यांनी हा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत जपला. रयत शिक्षण संस्थेची मूल्यव्यवस्था तसूभरही ढळू नये म्हणून त्यांनी आयुष्यभर जागरूकपणे काम केले. संस्थेच्या कामासाठी महाराष्ट्रभर त्यांनी अविरत दौरे केले; मात्र संस्थेच्या नावावर एक रुपयाचाही वैयक्तिक खर्च दाखवला नाही. आमदार म्हणून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातून ते स्वतःचा प्रवासखर्च भागवत असत.त्यांचे सार्वजनिक जीवन म्हणजे निःस्वार्थ सेवा, पारदर्शकता आणि नैतिकतेचा आदर्श होता. त्यांनी कधीही सत्ता, पद, पैसा किंवा प्रतिष्ठेच्या मोहाला बळी पडले नाही. लोकांचे प्रश्न हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्र होते.एकदा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. "तुमच्या टॅलेंटचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे," असे सांगितले. पण एन. डी. पाटील यांनी ती ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारली. नंतर एका कार्यक्रमात एका नेत्याने म्हटले की, "एनडी साहेब काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते." यावर त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या स्वभावाचे खरे प्रतिबिंब होते—"तुम्हाला कुणी सांगितलं आम्ही दुःखात आहोत? ज्याचं याड त्याला गोड. आजही आम्ही सुखातच आहोत."संपूर्ण आयुष्यभर त्यांनी शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, शिक्षक, विद्यार्थी आणि वंचित समाजासाठी असंख्य लढे उभारले. त्यांच्या नेतृत्वात जात, धर्म, प्रदेश किंवा पक्षीय सीमारेषा कधीच आड आल्या नाहीत. त्यांचे नेतृत्व लोकांच्या विश्वासातून उभे राहिले होते.त्यांच्या लढ्यांची खरी शस्त्रे होती - सत्याचा आग्रह, तत्त्वनिष्ठा, नैतिकता, अभ्यास, निःस्वार्थ वृत्ती आणि लोकांवरील अपार विश्वास. त्यांनी समाजाला शिकवले की नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे राहून बलाढ्य व्यवस्थेलाही आव्हान देता येते.मूल्यांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचे वैचारिक शिष्य डॉ. एन. डी. पाटील ही महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी परंपरेतील अखंड साखळी आहे.आजच्या सत्ताकेंद्रित आणि स्वार्थी राजकारणाच्या काळात डॉ. एन. डी. पाटील यांचे आयुष्य हे विचार, नैतिकता आणि जनसंघर्षाचे प्रेरणादायी विद्यापीठ आहे. त्यांनी आयुष्यभर कर्मवीर अण्णांचे बोट सोडले नाही. त्यांनी जपलेली मूल्ये, लोकशाहीवरील विश्वास आणि समाजासाठीची निष्ठा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल.१५ जुलै, त्यांच्या जयंतीदिनी, या असामान्य लोकनेत्याच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन.एकनाथ पाटील, इस्लामपूर