फीचर्स
का वागताहेत ही मुलं अशी?
आई-वडील आणि मुलांमधील बदलते नाते, स्वातंत्र्य व जबाबदारीचा समतोल, कौटुंबिक संवाद आणि कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित करणारा डॉ. स्वाती गानू यांचा विचारप्रवर्तक लेख.
Krantiwave
14 Jul 2026
5 मिनिटे वाचन
1 views
आजकाल प्रत्येक घरात एक प्रश्न आई-बाबांच्या मनाला सतावत असतो...का वागताहेत ही मुलं अशी??? मुलांना आई-बाबांशी बोलायला वेळ नसतो... त्यांच्यासोबत लग्न, वाढदिवस, समारंभ किंवा छोट्या सहलीलाही जायचा कंटाळा येतो... त्यांच्या प्रश्नांची उत्तरं फक्त "हं...", "नाही...", "माहीत नाही..." एवढीच... चेहऱ्यावर कायम नाराजी... पण मित्रांचा एक फोन आला की चेहरा खुलतो. एका मेसेजवर क्षणात तयारी सुरू होते. पार्टी, फंक्शन, ट्रिप, सेल्फी, मॅचिंग कपडे, शूज, पर्स, दागिने... सगळ्यासाठी उत्साह ओसंडून वाहतो.ज्यांनी आयुष्य दिलं, त्यांच्यासाठी वेळ नाही... आणि जे आयुष्यात काही वर्षांपूर्वी आले, त्यांच्यासाठी सगळं काही?हा फक्त वागण्यातला बदल नाही तर हा नात्यांच्या प्राधान्यक्रमात झालेला बदल आहे.आजकाल जेव्हा जेव्हा मुलांच्या वागण्याबद्दल चर्चा होते, तेव्हा सल्ले मात्र फक्त पालकांनाच दिले जातात."मुलांना वेळ द्या..." "त्यांच्याशी मैत्री करा..." "त्यांना समजून घ्या..." "त्यांना स्पेस द्या..." "त्यांच्यावर ओरडू नका..." हे सगळं योग्यच आहे. पण आज एक प्रश्न तरुणांनाही विचारायला हवा...नातं जपण्याची जबाबदारी फक्त आई-बाबांचीच आहे का?पालकांनीच नेहमी समजून घ्यायचं? पालकांनीच नेहमी माघार घ्यायची? पालकांनीच नेहमी बदलायचं?मुलांची काहीच जबाबदारी नाही का?नातं एका बाजूने टिकत नाही. दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावे लागतात.पालक मुलांसाठी काय करत नाहीत?मुलाच्या जन्मापासून त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतात. झोपेचा त्याग करतात. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. शिक्षणासाठी कर्ज काढतात. आजारपणात रात्रभर जागतात. त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी धडपडतात. त्याबदल्यात त्यांना फार काही नको असतं. महागड्या भेटवस्तू नाहीत...फक्त दोन प्रेमाचे शब्द... थोडा आदर... आणि मुलांनी आनंदाने म्हणावं..."आई, मी तुझ्यासोबत येतो." "बाबा, चला आपण एकत्र जाऊया." इतकंच.मग मुलांच्या वागण्यात असा बदल का होतो? कारण किशोरवय हा बदलांचा काळ असतो. या वयात स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू असते. मित्रांचं मत खूप महत्त्वाचं वाटू लागतं. त्यांच्याकडून स्वीकारलं जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व वाटू लागतं. हे मानसशास्त्र आहे. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट घडते...जे प्रेम रोज मिळतं, त्याची किंमत अनेकदा कमी वाटू लागते."आई तर आहेच..." "बाबा पैसे देणारच..." "घर आहेच..." "चूक झाली तरी ते माफ करणारच..." आणि इथूनच कृतज्ञतेची भावना हळूहळू कमी होऊ लागते.काही वेळा पालकही नकळत चुका करतात.प्रत्येक मागणी पूर्ण करणे... "नाही" म्हणण्याची भीती... गरज आणि हट्ट यातील फरक न समजावणे... अतिरिक्त पॉकेटमनी... महागडे मोबाईल... बाइक... पूर्ण स्वातंत्र्य...पण त्याबरोबर जबाबदारी शिकवलीच जात नाही.अधिकार दिले... पण कर्तव्य शिकवलं नाही.आज अनेक मुलांना सुविधा "प्रेम" वाटत नाहीत, तर "हक्क" वाटू लागतात.हा विचार बदलला पाहिजे. पण या चित्राची दुसरी बाजूही आहे. काही घरांमध्ये संवाद हरवलेला असतो. पालक फक्त अभ्यास, गुण, करिअर, तुलना आणि सूचना याच विषयांवर बोलतात. मुलांचं मन ऐकून घेण्यासाठी वेळच नसतो. मग मुलं मित्रांमध्ये आधार शोधतात. म्हणून दोष एका बाजूचा नसतो. पण जबाबदारी दोन्ही बाजूंनी असते.पालकांनी काय करावं? मुलांवर भरपूर प्रेम करा. पण प्रेम म्हणजे प्रत्येक हट्ट पूर्ण करणं नाही. स्वातंत्र्य द्या. पण त्याबरोबर जबाबदारीही द्या.पॉकेटमनी द्या. पण पैशाची किंमतही शिकवा. मोबाईल द्या. पण संवाद हरवू देऊ नका. बाइक द्या. पण विश्वासाबरोबर शिस्तही द्या. घरातील छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांना द्या. स्वतःची खोली आवरणे... घरातील एखादं काम करणे... वडिलधाऱ्यांची चौकशी करणे... कुटुंबासोबत वेळ घालवणे... या छोट्या सवयी उद्या त्यांना मोठा माणूस बनवतील. आणि सर्वात महत्त्वाचं... मुलांना प्रत्येक वेळी वाचवू नका.त्यांना त्यांच्या छोट्या चुका, त्यांचे परिणाम आणि जबाबदाऱ्या अनुभवू द्या.कारण जीवनात प्रत्येक वेळी आई-बाबा सोबत नसणार आहेत.मुलांना एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते...मित्रांसोबत हसा... फिरा... आनंद घ्या...पण घरातही हसून बोला. आईच्या चेहऱ्यावरचा थकवा कधीतरी शांतपणे पाहा.बाबांच्या मनातील काळजी शब्दांशिवाय समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या एका हसऱ्या उत्तराने... एका मिठीने... एका "धन्यवाद" ने... एका "सॉरी" ने...त्यांचा संपूर्ण दिवस बदलू शकतो.ज्यांनी तुमचं बोट धरून चालायला शिकवलं... आज त्यांच्यासोबत चालायला तुम्हाला लाज का वाटते? लक्षात ठेवा...मित्र आयुष्य सुंदर बनवतात.पण आई-वडील आयुष्य घडवतात.तुमच्या यशावर मित्र टाळ्या वाजवतील.पण तुमच्या अपयशात शांतपणे तुमच्या पाठीशी उभे राहणारे फक्त आई-बाबा असतील. आज तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढत नाही... पण एक दिवस असा येईल, जेव्हा वेळ असेल... आठवणी असतील... पश्चात्तापही असेल... पण कदाचित आई-बाबा नसतील. त्या दिवसाची वाट पाहू नका.आजच त्यांच्याजवळ बसा. दोन प्रेमाचे शब्द बोला. त्यांच्यासोबत एखाद्या कार्यक्रमाला आनंदाने जा.कारण...घरातला तुमचा हसरा चेहरा हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो.पालकांनी प्रेमासोबत मर्यादा द्याव्यात, आणि मुलांनी स्वातंत्र्यासोबत जबाबदारी स्वीकारावी. नाती जपण्यासाठी फक्त पालकांनी बदलून चालणार नाही; तरुणांनीही स्वतःला बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्यभर जगतात. त्यांच्या आयुष्याच्या उरलेल्या प्रवासात त्यांना तुमच्या वेळेची, आदराची आणि प्रेमाची गरज आहे.यशस्वी होणं महत्त्वाचं आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञ, जबाबदार आणि संवेदनशील मुलगा किंवा मुलगी होणं. कारण शेवटी माणसाचं यश त्याच्या पदाने नाही, तर त्याने जपलेल्या नात्यांनी मोजलं जातं."समाजाने पालकांना मुलं कशी वाढवायची हे खूप शिकवलं... आता वेळ आली आहे, मुलांनाही आई-वडिलांशी कसं वागायचं हे शिकवण्याची." "हक्कांची भाषा प्रत्येकाला शिकवली जाते; पण कर्तव्यांची जाणीव करून देणारे आवाज दिवसेंदिवस कमी होत आहेत." "स्वातंत्र्य मागण्यापूर्वी जबाबदारी स्वीकारायला शिकणं, हीच खर्या प्रगल्भतेची सुरुवात आहे." "ज्या घरात 'धन्यवाद' आणि 'माफ करा' हे शब्द आई-वडिलांसाठीही वापरले जातात, त्या घरातील नाती कधी गरीब होत नाहीत." "मित्र तुमचा आजचा आनंद असू शकतात; पण आई-वडील तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आधार असतात.""पालकांना प्रेमाची गरज नसते असं नाही; ते फक्त प्रेम मागत नाहीत.""मुलं लहान असताना पालक त्यांना चालायला शिकवतात; मोठी झाल्यावर मुलांनी पालकांना एकटं पडू द्यायचं नसतं.""प्रत्येक वेळी पालकांना बदलायला सांगण्यापेक्षा, कधी तरी मुलांनाही स्वतःकडे पाहायला शिकवू या... कारण सुदृढ कुटुंबाची जबाबदारी एका पिढीची नसते, ती दोन्ही पिढ्यांची असते."हक्कांसोबत कर्तव्य, स्वातंत्र्यासोबत जबाबदारी आणि प्रेमासोबत सहवेदना." डॉ. स्वाती गानू, मानसोपचार तज्ञ, मुंबई