नैराश्याचा मानसिक चक्रव्यूह : 'न जगता येतं, न सोडता येतं' या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग.

फीचर्स

नैराश्याचा मानसिक चक्रव्यूह : 'न जगता येतं, न सोडता येतं' या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग.

'न जगता येतं, न सोडता येतं' या मानसिक कोंडीतून नैराश्य कसे निर्माण होते, आत्महत्येचे विचार का येतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंब, समाज व तज्ज्ञांची भूमिका काय असते, यावरील मार्गदर्शक लेख.

Krantiwave 13 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
दोन दिवसांपूर्वी मी एक रील पाहिली. त्यामध्ये नैराश्य (Depression) आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट एका वाक्यात सांगितली होती. "जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाणीव होते की, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात जगताही येत नाही आणि ती परिस्थिती सोडूनही जाता येत नाही, तेव्हा नैराश्य जन्माला येते."जेव्हा माणसाच्या आयुष्यात अशा दोन भिंती उभ्या राहतात, ज्यांच्या मधोमध तो पूर्णपणे अडकतो, तेव्हा त्याच्या मनात अंधार दाटून येतो. मानसशास्त्रात या अवस्थेला Psychological Entrapment (मानसिक चक्रव्यूह) असे म्हणतात. 'न जगता येतं, न सोडता येतं' – काही उदाहरणे१. रेसिडंट डॉक्टर किंवा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थीवर्षानुवर्षे मेहनत करून किंवा मोठे कर्ज काढून एखाद्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. मात्र सततचा मानसिक ताण, छळ किंवा सलग ३० तासांची ड्युटी आता सहन होत नाही. पण अभ्यासक्रम सोडला तर पालकांचे पैसे, करिअर, बॉण्ड आणि समाजात अपयशाची भीती यामुळे तो निर्णयही घेता येत नाही.२. विषारी किंवा हिंसक वैवाहिक नातेएका महिलेला रोज मानसिक किंवा शारीरिक छळ सहन करावा लागतो. त्या नात्यात राहणे असह्य झालेले असते.परंतु आर्थिक परावलंबित्व, मुलांचे भविष्य आणि 'समाज काय म्हणेल?' या भीतीमुळे ती ते नाते सोडू शकत नाही. अनेकदा माहेरचाही आधार मिळत नाही.३. कर्जाचा डोंगर आणि नोकरीमोठे कर्ज असल्यामुळे अपमानास्पद किंवा असह्य ताणाच्या नोकरीत काम करावे लागते. नोकरी सोडली तर कर्जाचे हप्ते कसे भरायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या प्रश्नांमुळे ती नोकरीही सोडता येत नाही. अशी कोंडी जितकी दीर्घकाळ टिकते, तितका नैराश्य आणि आत्महत्येचा धोका वाढत जातो.ही कोंडी आत्महत्येपर्यंत का पोहोचवते?अशा अवस्थेत व्यक्तीच्या विचारक्षमतेवर Tunnel Vision म्हणजेच संकुचित विचारांचा प्रभाव पडतो. त्याला सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटू लागतात. त्याला जगायचे नसते असे नसते; त्याला त्या असह्य वेदनांसह जगायचे नसते. जेव्हा परिस्थिती बदलण्याचा किंवा त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसेनासा होतो, तेव्हा आशा संपल्याची भावना निर्माण होते. अशावेळी मेंदू चुकीचा निष्कर्ष काढतो—"या असह्य वेदनेतून सुटका मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला संपवणे." म्हणून आत्महत्या ही अनेकदा मरण्याची इच्छा नसून, असह्य मानसिक कोंडीतून सुटण्याचा आंधळा प्रयत्न असतो.आपण काय करू शकतो?१. कुटुंब आणि मित्र
  • आपल्या माणसाला सांगा, "तुझा जीव कोणत्याही पदवी, नात्या किंवा पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे."
  • त्यांना मन मोकळे करण्यासाठी सुरक्षित वातावरण द्या.
  • गरज वाटल्यास शिक्षण, नोकरी किंवा नाते सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना भावनिक आधार द्या.
२. संस्था आणि कार्यस्थळे
  • कामाचे आणि अभ्यासाचे मानवी नियम असावेत.
  • कोर्स किंवा नोकरी सोडण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध असावेत.
  • मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारी कार्यसंस्कृती विकसित करावी.
३. समाज
  • घटस्फोट, शिक्षण अर्धवट सोडणे किंवा व्यवसायात अपयश येणे म्हणजे आयुष्य संपले, असा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
  • "लोक काय म्हणतील?" या भीतीपेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, हे समाजाने स्वीकारले पाहिजे.
  • प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
४. मानसिक आरोग्य तज्ज्ञ
  • मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञ व्यक्तीला 'टनेल व्हिजन'मधून बाहेर पडण्यास मदत करतात.
  • नैराश्याचे मूळ कारण शोधून योग्य उपचार आणि समुपदेशन दिल्यास परिस्थितीतून मार्ग नक्कीच सापडू शकतो.                                  ५ माझा संदेश
  • जर तुम्ही आज अशाच कोणत्याही मानसिक कोंडीत अडकले असाल, तर कृपया स्वतःला इजा करण्याचा किंवा आत्महत्येचा विचार करू नका.
  • परिस्थिती कितीही कठीण असली, तरी ती बदलता येते किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येतो.
  • तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेल्या वेदनांना शब्द द्या. जिवलग व्यक्तींशी बोला, मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा हेल्पलाइनची मदत घ्या.
  • कारण तुमचा जीव बहुमोल आहे.
– डॉ. प्रिया प्रभू, मिरजटीप : सर्वच नैराश्याच्या (Depression) केसेस परिस्थितीजन्य असतात, असे नाही. नैराश्याची कारणे जैविक, आनुवंशिक, मानसिक आणि सामाजिक अशा अनेक घटकांशी संबंधित असू शकतात.