भरभरून दिलं...आता फक्त माणुसकीची अपेक्षा!
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांना किमान आता तरी ‘पद्मश्री’ मिळायलाच हवा
आमचा काळ माणुसकीचा होता...आज माणसांकडे सगळं आहे; पण माणूस मात्र हरवत चालला आहे. ९२ वर्षांचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे बोलत होते, सांगत होते, #शब्द शांत होते; पण..... प्रत्येक वाक्यामागे आयुष्यभर समाजासाठी जगलेल्या एका #ऋषितुल्य साहित्यिकाची वेदना दडलेली होती. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाला शब्दांची ओंजळ देणारा हा लेखक.
तब्बल १०१ कादंबऱ्या असंख्य कथा, ललित लेखन, हजारो विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात #शिक्षण संस्था उभारणारा समाजधुरीण...आयुष्यभर देतच राहिला; पण आज उतारवयात ते म्हणतात, ज्यांच्यासाठी धावलो. त्यांनी किमान विसरू नये. हे केवळ एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकाचे दु:ख नाही, तर समाजाच्या स्मरणशक्तीवर पडलेला प्रश्न आहे, वेदनेची जखम आहे. प्रा. नलगे यांनी साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र जगासमोर उभा केला. त्यांच्या शब्दांत मातीचा सुगंध आहे.
शेतकऱ्यांचे अश्रू आहेत, माणुसकीचा स्पर्श आहे. ‘चंद्रबनातल्या सावल्या’, ‘अंगाई’ आणि इतर साहित्यकृतींनी लाखो वाचकांच्या मनात घर केले. त्यांचे ‘रातवा’ हे आत्मचरित्र तर एका समाजजीवनाच्या असंख्य घटनांनी भरलेला पट आहे. त्यांच्या साहित्यावर सहा #चित्रपट निर्माण झाले. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला; पण आजही त्यांच्या नावापुढे पद्मश्री’ नाही, ही खंत अनेक साहित्यप्रेमींच्या मनात आहे. त्यांनी कोल्हापुरातून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना केली. या कार्यक्रमास तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांचा ज्येष्ठ नेते शरद पवारांशी स्नेह आहे. ते म्हणाले, नव्या पिढीने सार्वजनिक कामात झोकून दिले पाहिजे. आमचा काळ माणुसकी आणि जगण्याच्या श्रीमंतीने समृद्ध होता. आजच्या काळाची चिंता वाटते.
माणसाने आपुलकी आणि जिव्हाळा जपला तरच समाज निकोप राहील. आजही त्यांची बुद्धी तल्लख आहे, विचार स्पष्ट आहेत. समाज सर्व स्तरांवर सुखी आणि संपन्न झाला पाहिजे, ही त्यांची भावना बोलताना प्रत्येक शब्दातून उमटत होती. १९७८-८० च्या सुमारास काँग्रेसकडून विधान परिषदेवर जाण्याची संधी चालून आली होती; मात्र तत्त्वांशी तडजोड न करता त्यांनी ती नाकारली. याबाबत स्मित हास्य करत ते म्हणाले, बहुतेक ती आमदारकी स्वीकारायला हवी होती. कारण राजकारणाच्या व्यासपीठावरून समाजाचे आणखी भले करता आले असते. त्यांच्या शब्दात थोडा पश्चाताप जाणवला;
पण माझी जीवनमूल्ये मला याची परवानगी देत नव्हती, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आज शाहूवाडीत शिकलेल्या अनेक पिढ्या देशविदेशात मोठ्या पदांवर आहेत. त्या शिक्षणाची बीजे पेरणाऱ्या व्यक्तीचे नाव मात्र नव्या पिढीला माहीत नसणे, ही समाजाची #शोकांतिका आहे हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिले.
सध्या ते कोल्हापूरपन्हाळा रोडवरील #कोतोली फाटा येथे त्यांचा मुलगा सून आणि नातवंडे यांच्यासमवेत राहतात. प्रा. चंद्रकुमार नलगे यांचे साहित्य, शिक्षण आणि समाजकारणातील योगदान हे केवळ कोल्हापूर किंवा शाहूवाडीपुरते मर्यादित नाही; ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. १०१ कादंबऱ्या, सहा चित्रपट, शिक्षण संस्था, हजारो विद्यार्थी आणि असंख्य सामाजिक उपक्रम असे #बहुआयामी योगदान देणाऱ्या या साहित्यिकाचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव होणे, ही केवळ त्यांची नव्हे, तर महाराष्ट्राच्या साहित्यविश्वाची अपेक्षा आहे.
अशी माणसं जपणं ही समाजाची जबाबदारी...काही व्यक्ती केवळ स्वत:साठी जगत नाहीत;त्या संपूर्ण समाजासाठी आयुष्य खर्च करतात. प्रा. #चंद्रकुमार नलगे हे त्यापैकीच एक. अशी माणसं वृद्धापकाळात सन्मानाने, माणुसकीच्या उबेत जगली पाहिजेत. त्यांना पुरस्कार मिळणे महत्त्वाचे आहेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कार्याची आठवण समाजाने जिवंत ठेवणे. कारण अशी माणसं रोज जन्माला येत नाहीत; ती अनेक दशकांतून एकदाच घडतात.०००००००@विजय पाटील, कोल्हापूर ९८२३२०२१२१००००००
फीचर्स
भरभरून दिलं...आता फक्त माणुसकीची अपेक्षा! ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांना किमान आता तरी ‘पद्मश्री’ मिळायलाच हवा
आमचा काळ माणुसकीचा होता... आज माणसांकडे सगळं आहे; पण माणूस मात्र हरवत चालला आहे. ९२ वर्षांचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे बोलत होते, सांगत होते, #शब्द शांत होते; पण..... प्रत्येक वाक्यामागे आयुष्यभर समाजासाठी जगलेल्या एका #ऋषितुल्य साहित्यिकाची वेदना दडलेली होती. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाला शब्दांची ओंजळ देणारा हा लेखक.
विजय पाटील
12 Jul 2026
5 मिनिटे वाचन
1 views